असे म्हणतात की, राजकारणात कोणी कोणाचा फार काळ शत्रू अथवा मित्रही नसतो. राजकारणातही कधी फासे उलटतील, याचा नेम नाहीच. त्याचाच प्रत्यय महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळातही आला. त्यातच पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या संजय राऊत यांनीही नुकतेच एक विधान केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘2024 पर्यंत महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री असेल.’ खरंतर राऊतांचे आभाळाइतके राजकीय दावे-प्रतिदावे हाच स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरू शकतो. कारण, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ‘पुढचे अडीच वर्ष नाही, तर 50 वर्षं शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात असेल,’ असे विधान राऊतांनी केले आणि महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण होताच शिंदेंच्या बंडाने हे सरकार पत्त्यासारखे कोसळले. पण, राऊतांनी यंदा 10, 20 किंवा 50 वर्षांची नव्हे, तर जेमतेम उरलेल्या अडीच वर्षांपुरती काय ती राजकीय भविष्यवाणी केली. कारण, 2024 नंतर काय होईल, याची आज खुद्द राऊतही शाश्वती देऊ शकत नाहीत. त्यामुळे तुरुंगातून सुटल्यानंतर ‘पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल’ किंवा ‘उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील,’ यांसारख्या अतिरंजित दाव्यांचा मोह राऊतांनीही कुठे तरी टाळलेला दिसतो. त्याऐवजी ‘2024 पर्यंत महाविकास आघाडी सरकारचा मुख्यमंत्री होईल,’ या राऊतांच्या राजकीय तर्कामागची चाकरी आणि लाचारी समजून घ्यायला हवी. ‘महाविकास आघाडी’ नावाच्या प्रयोगात उत्साहाने सामील झालेल्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले. एका तुकड्याने सत्ता राखली, तर दुसर्या तुकड्याला आता सगळे पुन्हा जोडत बसायची वेळ आली. त्यामुळे अर्थोअर्थी ‘महाविकास आघाडी’ नावाच्या प्रयोगामुळे ठाकरेंची शिवसेना आता आयुष्यभर पवारांची चाकरीच करणार, हे निश्चित. कारण, एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याशी उभा डाव मांडल्यानंतर ठाकरेंना शिवसेना शून्यातून उभी करण्याचे आव्हान पेलावे लागेल. त्यामुळे सत्ता की संघटना दंद्वात ठाकरेंना संघटनेचा विचार करणे क्रमप्राप्त. कारण, सत्ता आणि संघटना या दोन्ही दगडांवर एकाच वेळी पाय ठेवला की, माणूस कसा तोंडावर आपटतो, त्याचा फटका ठाकरेंनाच बसला. त्यामुळे एकीकडे संघटनेची पुनर्बांधणी करताना सत्तेसाठी मात्र ‘मातोश्री’ला आता कायमच ‘सिल्व्हर ओक’चा टेकू हा हवाच!
ठाकरेंची लाचारी...
सिल्व्हर ओक’चा टेकू ‘मातोश्री’ला कसा आयुष्यभर लागेल, याची कायमस्वरुपी तजवीजच पवार साहेबांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने केली. साहजिकच संजय राऊतांच्या योगदानाशिवाय तर हे शक्य झालेच नसते म्हणा. ठाकरेंच्या शिवसेनेने अल्पकालीन लाभाला भुलून ‘महाविकास आघाडी’ नावाची लाचारी पत्करली. त्या लाचारीतून शिंदे गट सुखरुप बाहेर आला आणि सत्तेचा वाटेकरीही झाला. पण, पवारांच्या लाचारीला बांधील असलेले ठाकरे या जाळ्यात दिवसेंदिवस अधिकच गुरफटत गेले. आज तर ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था इतकी बिकट की, घर असूनही डोक्यावर छप्पर नाही, अशी स्थिती. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला आता पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि मरगळलेल्या काँग्रेसशिवाय म्हणा पर्यायच नाही.ठाकरेंनी यदाकदाचित शिंदेंशी कितीही जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेला पुन्हा एकसंध करण्यासाठी पाऊले उचलली, तरी ही पराकोटीची कटुता दोन्ही बाजूंच्या पार नसानसात भिनल्यामुळे शिवसेनेचा तुटलेला धनुष्य आणि बाण एकमेकांना जोडणे आता जवळपास अशक्यच! त्यात भाजप, फडणवीस यांना वेळोवेळी ठाकरेंनी अपमानित केल्यानंतर आता ते दरवाजेही बंद झाल्यातच जमा. कारण, ठाकरेंची शिवसेना ही मूळ शिवसेना नसून एकनाथ शिंदे हेच आता शिवसेनेचे सर्वेसर्वा, हे जनमत प्रस्थापित करून भाजपनेही शिवसेनेची दोन शकले उडवून चांगलाच वचपा काढला. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने आता कितीही हातपाय मारले, यात्रा काढल्या, बाहेरून नेते-कार्यकर्ते खोर्याने आयात केले तरी त्यांच्या माथ्यावरील लाचारीचा शिक्का पुसला जाणार नाहीच. त्यामुळे भविष्यातही ठाकरेंच्या शिल्लकसेनेचे नेतृत्व आदित्य ठाकरेंच्या हाती आले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काठीशिवाय यांना पर्याय तो काय? आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिथे जिथे काँग्रेसची फरफट तिथे तिथे, हे वेगळे सांगायला नकोच. शिवाय आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत गळाभेटी करून ‘घड्याळ’ घातलेल्या ‘हाता’तच यापुढे ‘मशाल’ पेटणार, हे प्रत्यक्ष कृतीनेदेखील सिद्ध केले. तेव्हा, ठाकरे, पवार घराण्यातले चेहरे जरी भविष्यात बदलले, एक पिढी जाऊन पुढची पिढी आली, तरी सत्तालोभामुळे ठाकरेंनी पत्करलेली पवार घराण्याची लाचारीची बेडी ही आता आयुष्यभराची सोबती असेल, अशीच चिन्हे!