रशिया-युक्रेनच्या युद्धाला आता अडीचशेपेक्षा अधिक दिवस उलटून गेले. पण, अजूनही हे युद्ध अधांतरी असून निर्णायक अवस्थेत पोहोचलेले नाही. युक्रेनची रशियन कोंडी सुरू असून आगामी काळातही ती थांबेल, याचीही सुतराम शक्यता नाही. त्यातच युक्रेनच्या चार प्रांतात कथित जनमत घेऊन ते रशियाच्या अधिपत्त्याखाली घेण्याच्या पुतीन यांच्या निर्णयानंतर तर जणू हे युद्ध रशियानेच जिंकल्यात जमा होते, असा एक समजही पसरविण्यात आला. परंतु, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे हार मानणार्यांपैकी नसून त्यांनी त्यांच्या सैन्याला वेळोवेळी रशियाविरोधातील लढ्यासाठी प्रोत्साहित केले.
युक्रेनच्या सैन्याला, झेलेन्स्कींच्या मनसुब्यांना धुळीस मिळवण्याची एकही नामी संधी पुतीन यांनी सोडली नाही. त्यातच युक्रेनसह पाश्चिमात्त्य देशांना पुतीन यांनी वारंवार अणुयुद्धाची धमकीही दिली. तसेच युक्रेनला मदतीचा हात देणार्या अमेरिका आणि मित्रराष्ट्रांवर आगपाखडही केली. पण, एवढ्या सगळ्या प्रयत्नांनंतरही युक्रेन माघार घेत नाही, गुडघे टेकत नाही म्हटल्यानंतर रशियाने आपला आक्रमकपणा कायम ठेवत युक्रेनचे अस्तित्वच संपुष्टात आणण्याचे उद्योग कायम ठेवले. म्हणूनच युक्रेनच्या ज्या चार प्रांतांचे ‘आपला भूभाग’ म्हणून रशियाने लचके तोडले होते, तिथे मोेठ्या संख्येने सैन्यतैनाती करून रशियाने स्थानिकांनाही दहशतीत ठेवले. एवढेच नाही, तर स्थानिकांवर अनन्वित अन्याय-अत्याचार करून युक्रेन समर्थकांची मुस्कटदाबीही केली. वीज, पाणी, इंटरनेटपासून या नागरिकांना वंचित ठेवत त्यांचा बाहेरच्या जगाशी अजिबात संबंध प्रस्थापित होणार नाही, यासाठी रशियन साम्राज्याने साम-दाम-दंड-भेद असे सर्व मार्ग अवलंबले.
अखेरीस काहीच दिवसांपूर्वी या चार प्रांतातील खुरासान या रशियन फौजांच्या ताब्यातील शहरावर युक्रेनच्या सैनिकांनी पुनश्च आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे आता रशियनव्याप्त एकेक गाव, शहर सैन्यमुक्त करण्यासाठी युक्रेनचे सैन्य सरसावले असून त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलायला सुरुवातही केलेली दिसते.युक्रेनच्या सैनिकांनी खुरासान शहरात आपला झेंडा फडकावताच स्थानिकांनीही एकच जल्लोष केला. निळे-पिवळे युक्रेनचे झेंडे घेऊन खुरासानचे नागरिकही रस्त्यांवर जल्लोष साजरा करण्यासाठी उतरले. आपले लोक, आपले सैन्य आपल्या मदतीसाठी जीवावर उदार होत धावून आले, या भावनेने त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. युक्रेनी सैनिकांबरोबर सेल्फी घेण्यापासून ते त्यांना एखाद्या घरी आलेल्या पाहुण्यासारखे आदरातिथ्य या मंडळींनी केले.
काहींनी तर अगदी उत्साहाने खुरासान शहराच्या भिंती निळ्या-पिवळ्या रंगात रंगवायला घेतल्या. युक्रेनी सैनिकांमध्येही आपल्या बंधू-भगिनींची रशियन सैन्याच्या तावडीतून सुटका करून एका वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास संचारला. पण, खुरासानला मुक्त करताना केवळ युक्रेनियन सैनिकच नव्हे, तर खुद्द राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीही तिथे प्रत्यक्ष हजर होते. तेथील नागरिकांना धीर देत, त्यांच्याशी हस्तांदोलन करीत झेलेन्स्कींनीही यावेळी बोलताना ‘चले चलो’चा कानमंत्र आपल्या सैनिकांना दिला.
खरंतर रशिया-युक्रेनसह उत्तर गोलार्धात रक्त गोठवणार्या थंडीचे दिवस आता सुरू झाले. त्यामुळे आगामी काळात जसजशी थंडी अधिक कडाक्याचे स्वरुप धारण करेल, तसतसे युक्रेन माघार घेऊन रशिया वरचढ ठरेल, असा एक सर्वसाधारण समज होता. परंतु, युक्रेनने रशियाच्या या समजाचा बर्फ पूर्णपणे तोडून काढला आणि खुरासान शहरावर आपले पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित केले. झेलेन्स्कींनी तर हा युद्ध समाप्तीचा प्रारंभ असल्याचे म्हणत ‘जी-20’ देशांच्या बैठकीला ऑनलाईन संबोधित करत हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, म्हणून सर्व देशांनी पुढाकार घेण्याच्या आवाहनाचाही पुनरुच्चार केला.
युक्रेनसुद्धा रशियाशी शांतता करार करण्यासाठी काही अटीशर्तींवर तयार आहेच. पण, हेकेखोर पुतीन यांना आता शांतता करार म्हणजे आपला पराजय, हे समीकरण रुढ होईल, म्हणून हे युद्ध संपवण्यात फारसा रस नाही. पण, या युद्धानिमित्ताने स्वत:ला बलाढ्य लष्करी शक्ती म्हणून मिरवणार्या रशियाचीही चहुबाजूने कोंडी झाली. रशियाचे नागरिक या युद्धाच्या विरोधात आहेत. रशियन सैनिकांनीही रक्तपात नकोय. पण, पुतीन आपल्या हट्टावर ठाम आहेत. परिणामी, इंडोनेशियाच्या ‘जी-20’ परिषदेतही आपला घातपात होईल, या भीतीने पुतीन गैरहजर राहिले.