गेली 25 वर्षे ठाकरे परिवाराने मुंबई महापालिकेत लूटमार केली

14 Nov 2022 17:44:12

pravin darekar
 
 
मुंबई : “मुंबई महापालिकेत ठाकरे परिवाराने मराठी माणसाच्या नावे सत्ता उपभोगत गेली 25 वर्ष लूटमार केली,” असा आरोप विधान परिषदेचे गटनेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्यावर करत त्यांचा हा धंदा बंद करायचा असल्याचे आवाहन उपस्थितांना केले. घाटकोपर येथे नुकतीच भाजपची ‘जागर मुंबईचा’ सभा पार पडली. या सभेला आ. प्रवीण दरेकर संबोधित करत होते.
 
 
 
आ. प्रवीण दरेकर म्हणाले की, “या सभेची आज गरज का लागली. मुंबईकरांना आज भाजपच्या माध्यमातून जागे करायला आलो आहोत. कारण, 25 वर्ष या महापालिकेवर आपण उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका त्यांच्या ताब्यामध्ये दिली आणि अक्षरशः या महापालिकेला लुटण्याचे काम भ्रष्टाचारच्या माध्यमातून या ठिकाणी ठाकरे परिवाराने केले हे मुंबईकरांनी पाहिलेले आहे. आम्ही मुंबईचे तेच प्रश्न घेऊन ‘जागर मुंबईचा’ करण्यासाठी आपल्यासमोर आलो आहोत,” असेही दरेकर म्हणाले.
 
 
 
 
उद्धव ठाकरे यांचे केवळ सत्तेसाठी लांगूलचालन करण्याचे काम!
“एका बाजूला आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मूळ विचार दिला. त्या विचाराशी प्रतारणा केली. भाजपच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी सत्ता आणली. हिंदुत्वाच्या नावावर त्या ठिकाणी मते मागितली. आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो लावून त्या ठिकाणी मते मागितली व निवडून आले. त्यानंतर सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर लाचारी करण्याचे काम या उद्धव ठाकरे यांनी केले. नवाब मलिक जेलमध्ये गेल्यावरही त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचे धाडस उद्धव ठाकरे यांनी दाखवले नाही. केवळ त्या ठिकाणी सत्तेसाठी लांगुलचालन करण्याचे काम उद्धव ठाकरे आपण त्या ठिकाणी केले,” असे दरेकर म्हणाले.
 
 
 
मुंबई महापालिकेच्या शाळा एकच्या दोन का झाल्या नाहीत?
“माझा या जागरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना सवाल आहे, ‘मातोश्री’ एकची दोन कशी झाली? मुंबई महापालिकेच्या शाळा एकच्या दोन का झाल्या नाहीत? आगामी पालिका निवडणुकीत याचा जाब मुंबईकर जनता तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. मराठी माणसाने घाम गाळायचा आणि लूटमार ठाकरे परिवाराने करायची हा धंदा बंद करायची जबाबदारी या जागरच्या माध्यमातून आपल्यावर सोडत आहे,” असेही दरेकर यांनी सांगितले.
 
मुंबईकरांना फडणवीसांच्या नेतृत्वाचा अभिमान
“अलीकडच्या काळात जास्तीचा वेळ देवेंद्रजी मुंबईत असतात व मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी जीव ओतून काम करत आहेत. पाच वर्षाच्या काळात मुंबईच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली होती. दोन-अडीच वर्ष मविआच्या काळात विकास ठप्प होता तो फडणवीस-शिंदे सरकारने तीन महिन्याच्या कालावधीत पूर्णत्वाकडे नेण्याचे त्यांचे काम सुरु आहे. त्यामुळे तमाम मुंबईकरांना त्यांच्या नेतृत्वाचा अभिमानच आहे,” असे दरेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच, “भविष्यात मुंबईकर त्यांच्या शब्दाचा सन्मान करत महापालिकेची सत्ता फडणवीस-शिंदे यांच्या ताब्यात देतील,” असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0