कालचक्राचा प्रवास

13 Nov 2022 20:47:14
nehru

समाजवाद उद्ध्वस्त करायला कुठली बाहेरची शक्ती लागली नाही, ते काम काँग्रेसनेच आपल्या हाताने केले. काळ असा सूड घेत असतो. काल तुम्ही चूक केली, तीच पुढे रेटत नेली आणि मग काळाचा दणका असा येतो की, ती चूक त्याच लोकांना दुरूस्त करावी लागते.
स्वकाळ आणि समुद्राच्या लाटा कुणाची वाट बघत थांबत नाहीत. काळ आपल्या गतीने पुढे सरकत असतो. समुद्राच्या लाटा एकामागून एक उसळत असतात. या दोघांना कुणीही थांबवू शकत नाही. भारतीय संसदेने कायदा केला, तरीही त्या कायद्याने काळ थांबणार नाही आणि समुद्राच्या लाटाही थांबणार नाहीत. काळाविषयी असे म्हटले जाते की, तो अनंत आहे. आईनस्टाईन यांच्या सिद्धांताप्रमाणे काळ ही सापेक्ष कल्पना आहे, म्हणजे दुसर्‍या कशाच्यातरी संदर्भात आपण काळ मोजतो आणि स्टिफन हॉकिन्स यांनी ‘काळाचा संक्षिप्त इतिहास’ या शीर्षकाचे एक पुस्तकही लिहिले आहे.


वाचकांना असा प्रश्न पडेल की, काळाचे पुराण कशासाठी? निश्चितच, आईनस्टाईन आणि हॉकिन्स यांचे सिद्धांत समजावून सांगण्यासाठी या लेखाचा प्रपंच नाही. काळ अतिशय वेगाने पुढे सरकतो. त्यामुळे 30-40 वर्षांपूर्वी काय घडले, हे नव्या पिढीला जर सांगितले नाही, तर समजणार नाही. महाराष्ट्रात आज हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आहे, केंद्रातदेखील हिंदुत्ववादी सरकार सत्तेवर आहे. आपला देश लोकशाहीप्रधान देश असल्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील शासन एकाच पक्षाच्या हाती राहील, असे छातीठोकपणे कुणीही सांगू शकत नाही. एक गोष्ट मात्र छातीठोकपणे सांगता येईल, ती म्हणजे ज्या कोणत्या पक्षाचे सरकार येईल त्याला पक्षाच्या परिभाषेत आम्हीदेखील हिंदुत्ववादी आहोत, हेच सांगावे लागेल. तो वेगळी भूमिका घेऊ शकत नाही, घेतली तर निवडून येण्याची शक्यता फार कमी राहील. ही गोष्ट या पिढीला सहजपणे प्राप्त झालेली आहे. पण त्याचा इतिहास तसा नाही.


देशाचा राजकीय इतिहास असा आहे की, 1947 साली भारतीयांचे शासन आले आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुका दि. 25 ऑक्टोबर, 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत झाल्या. त्यानंतर पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली शासन आले. नेहरू हिंदुत्ववादी नव्हते. हिंदू परंपरा, हिंदू मंदिरे, हिंदू सण-उत्सव, हिंदू तीर्थयात्रा, अशा हिंदूंच्या आस्था असणारे अनेक विषय आहेत, त्याबाबतीत ते उदासीन होते. हिंदू या देशात बहुसंख्य आहेत. त्यांनी शब्द दिला,‘बहुसंख्याकांचा सांप्रदायिक वाद.’ स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी त्यांना खूप घृणा होती. हिंदू संघटनाचे काम करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 1948साली त्यांनी बंदी घातली, ती जवळजवळ 19 महिने होती.



पं. नेहरू यांच्या धोरणामुळे हिंदुत्ववादी असणे, हा या देशात गुन्हा झाला. सगळे हिंदुत्ववादी मुख्यधारेच्या दृष्टीने अस्पृश्य झाले. त्यांच्या संघटना, त्यांचे नेते, त्यांचे कार्यक्रम, याकडे समाजातील तथाकथित विचारवंत, राजकीय नेते, सामाजिक नेते, काही प्रमाणात धार्मिक नेते या सर्वांनी पाठ फिरवली. पं. नेहरू यांचे म्हणणे असे होते की, आपल्याला नवीन भारत घडवायचा आहे. या नवीन भारताचे दोन पायाभूत सिद्धांत असतील. 1. सेक्युलॅरिझम आणि 2. समाजवाद. ‘समाजवादी समाजरचना’ हे भारताचे आर्थिक धोरण ठरले. खासगी उद्योगांवर पं. नेहरूंनी खूप बंधने घातली. सार्वजनिक उद्योग सुरू केले. नोकरशाहीचे प्राबल्य प्रमाणाबाहेर वाढले. त्यामुळे भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. राजकीय नेता आहे आणि भ्रष्टाचार करीत नाही हे कसे शक्य आहे, हे समीकरण झाले.

हिंदुत्व विचाराच्या दृष्टीने पं. नेहरू यांचा कालखंड वाळवंटाचा कालखंड होता. त्यानंतर त्यांची कन्या इंदिरा गांधी सत्तेवर आल्या. त्या पं. नेहरूंइतक्या कडव्या हिंदुत्वविरोधी नव्हत्या. परंतु, त्या काँग्रेसमध्ये घुसलेल्या कम्युनिस्टांच्या गराड्यात सापडल्या होत्या. यामुळे कम्युनिस्टांनी सरकारी बौद्धिक संस्थावर आपला ताबा मिळविला. भारताचा इतिहास त्यांनी सांगायला सुरूवात केली. बुद्धीभ्रमित करणारे युक्तिवाद करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. कला, साहित्य, चित्रपट, अशा जनमानसावर प्रभाव गाजविणार्‍या अनेक माध्यमांवर त्यांनी आपली पकड निर्माण केली. त्यांनी स्वत:पुरते नाव घेतले, ‘डावी विचारसरणी.’





डाव्या विचारसरणीच्या प्रभावामुळे साहित्यिक पुरस्काराला ते पात्र ठरू लागले, जे आपल्या सनातन विचारांवर विकृत लिहितील, अशा विकृतानंद साहित्यकारांना वेगवेगळे पुरस्कार प्राप्त होऊ लागले. त्यांची एक गँग तयार झाली. मोठा सरकारी पुरस्कार मिळाला की, त्यामुळे समाजात मिरविता येते, आपण म्हणजे कुणीतरी विशेष आहोत हे दाखविता येते. ‘पद्म पुरस्कार’सुद्धा अशाच मंडळींच्या गळ्यात पडू लागले. दुसर्‍या भाषेत सन्मान आणि सत्कार कुणाचा तर जो स्वतःला हिंदुत्ववादी विचारापासून शेकडो दूर ठेवील, त्याचा.


अशा विपरित परिस्थितीत हिंदू विचार जीवंत ठेवण्याचे कार्य या देशात अनेक संस्थांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य हे संघटित व देशव्यापी झाले. संघ कार्यकर्त्यांनी स्वत:ला सवय लावून घेतली की, आपल्याला शासनाकडून काही मिळणार नाही, मिळाल्याच तर शिव्याच मिळतील. त्यामुळे शासनाकडून कसलीही अपेक्षा ठेवायची नाही. शासनाच्या आशीर्वादाशिवाय आपले काम उभे करायचे, जनता जे देईल त्यावरच भागवायचे. या काळातील संघ प्रचारक आणि प्रवासी कार्यकर्ते अनेकवेळा पायी प्रवास करीत, कधी सायकलवरून प्रवास करीत, कधी बैलगाडीतूनही जात. तिसर्‍या वर्गाचे रेल्वेचे तिकीट काढून प्रवास करीत (आता तिसरा वर्ग दुसरा वर्ग झाला आहे, म्हणजे फक्त नाव बदलले) ‘एसी’चा प्रवास तेव्हा अशक्य होता. विमान फक्त आकाशात बघण्याची वस्तू होती.


वेगवेगळ्या धार्मिक संघटनादेखील आपापल्या क्षेत्रात हिंदू भावजागरणाचे कार्य करीत राहिले. ‘रामकृष्ण मिशन’, ‘आर्य समाज’, ‘गायत्री समाज’ इत्यादी अनेक धार्मिक संस्थांची नावे घ्यावी लागतील. नेहरूंच्या वाळवंटात या सर्वांनी हिंदुत्वाचे रोपटे जीवंत ठेवले. त्याला स्वकष्टाचे पाणी घातले आणि वाढविले. हिंदूविचारांच्या आधारे हिंदू समाजात काम करणे तसे अवघड नाही. नेहरू जरी निधर्मी झाले, तरी जनता काही निधर्मी झाली नाही, ती होणेदेखील शक्य नव्हते. पारंपरिक सण-उत्सव, यात्रा, राम, कृष्ण, शिव यांचे स्मरण चालूच होते. आपल्या कष्टाने संघ कार्यकर्त्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला. संघ विचारातूनच जनसंघाचा जन्म झाला. जनसंघाचे सगळेच कार्यकर्ते संघमुशीतून तयार झालेले कार्यकर्ते होते. त्यांनी राजकीय क्षेत्रात नेहरू विचारधारेला आव्हान देईल, अशी विचारधारा विकसित केली आणि हळूहळू ती प्रभावित बनवत नेली.


पं. नेहरू यांचे समाजवादी मॉडेल 1990 साली कोसळले. ते स्वत:च्या वजनाने आणि अंतर्गत विरोधाने कोसळले. समाजवादी विचारधारा ही अत्यंत चुकीच्या सिद्धांतावर उभी होती. पायाच चुकीचा असल्यामुळे इमारत आज न उद्या कोसळणारच होती. तसे भाकित श्रीगुरूजींनीही केले, दत्तोपंत ठेंगडी, पं. दीनदयाळ उपाध्याय इत्यादी मंडळींनीही केले होते. समाजवादी मॉडेल मोडित काढण्याचे श्रेय नरसिंह राव यांना द्यावे लागते. नेहरू विचारधारेत वाढलेले ते काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान होते. समाजवाद उद्ध्वस्त करायला कुठली बाहेरची शक्ती लागली नाही, ते काम काँग्रेसनेच आपल्या हाताने केले.





काळ असा सूड घेत असतो. काल तुम्ही चूक केली, तीच पुढे रेटत नेली आणि मग काळाचा दणका असा येतो की, ती चूक त्याच लोकांना दुरूस्त करावी लागते. विचारधारेचा विचार करता काँग्रेस विचारधारेचा एक स्तंभ समाजवाद या शब्दाने व्यक्त होत होता, तो कोसळला. दुसरा शब्द ‘सेक्युलॅरिझम’ याचा अंतदेखील पुढे दोन-तीन वर्षांतच झाला. आणि ऐतिहासिक कार्य रामभक्त संस्कृतीनिष्ठ, सनातन भारताचा अभिमान असणार्‍या भारतीय जनतेने केले. तिचे नेतृत्व संघ विचारधारेने केले. हा इतिहासदेखील अतिशय बोधप्रत आहे, म्हणून तो बघावा लागेल. पुढील लेखात तो पाहूया. (क्रमशः)



Powered By Sangraha 9.0