मुंबई(प्रतिनिधी): उत्तर मुंबईत असलेल्या आरे दुग्ध वसाहतीतील आदर्श नगर येथे शुक्रवारी दि. ११ नव्हेंबर रोजी सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. महिलेच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी तिला किमान तीन दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी परतत असलेल्या संगीता तुकाराम गुरव या ३२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. आरे कॉलनीत काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शिनी सांगितले की ही महिल बसमधून उतरून आदर्श नगर येथील तिच्या घराकडे जात होती. रस्त्यावर पूर्ण अंधार असल्यामुळे बिबट्याची चाहूल सुद्धा महिलेला नव्हती. रस्त्याच्या कडेने चालत असलेल्या संगीता समोर अचानक बिबट्या आला. त्याने तिच्यावर उडी मारली. तेवढ्यात मागून बेस्ट बस आली आणि त्या वजने बिबट्या तिथून पसार झाला.स्थानिकांनी वन विभागास कळवले आणि या महिलेला वनविभागाच्या वाहनातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.
या महिलेच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्या कारणाने डॉक्टरांनी त्यांना किमान तीन दिवस रुग्णालयात राहण्याचा सल्ला दिला आहे. हल्ला करण्यापूर्वी त्यांना आरेमध्ये बिबट्याने शेळी मारल्याचा फोनही आला होता. परंतु ही कहाणी खोटी असल्याचे प्रार्थमिक तपासात समोर आले. या पूर्वी ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी एका दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला झाला होता. आरे येथे युनिट क्रमांक 15 येथील घराजवळ तिचा मृत्यू झाला होता.त्या पूर्वी दि. ४ ऑक्टोबर रोजी हिमांशू यादव या नऊ वर्षांच्या मुलावर गरबा पाहायला जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला होता.गेल्या पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. दि. ६ नोव्हेंबर रोजी गोठ्यात काम करणारे राम यादव यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला होता, मात्र तो किरकोळ जखमी होऊन बचावला होता.