अभूतपूर्व अराजकाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान...

10 Nov 2022 21:35:53

पाकिस्तान 
 
  
 
 
इमरान खान विरुद्ध लष्कर-‘आयएसआय’ हा पाकिस्तानात उफाळून आलेला संघर्ष खान यांच्यावरील हल्ल्यानंतर एका वेगळ्याच वळणावर पोहोचला. परिणामी, आगामी काळात इमरान खान यांनी पेटवलेला हा राजकीय वणवा पाकिस्तानच्या लष्करासह संपूर्ण देशालाही उद्ध्वस्त करुन सोडेल, यात शंका नाही.
 
 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि ‘तेहरिक-ए- इन्साफ’ पक्षाचे नेते इमरान खान यांच्यावर राजधानी इस्लामाबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला जिल्ह्यातील वजीराबादमध्ये काही दिवसांपूर्वीच जीवघेणा हल्ला झाला. यावेळी त्यांच्या पायावर गोळ्या लागल्या. त्यातच गुजरांवाला जिल्ह्यात गुन्हेगारी प्रकरणांच्या तपासाबाबत आधीच प्रचंड उदासीनता. म्हणूनच तर देशाच्या सर्वशक्तिमान संरक्षण आस्थापनेचा विश्वास गमावून सात महिन्यांपूर्वी ज्यांचे सरकार कोसळले, त्या इमरान खान यांच्यावर अशाप्रकारे हल्ला करण्यात आला. त्यामुळे लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी खान यांना हरतर्‍हेने रोखण्याचे अथक प्रयत्न अयशस्वी ठरत असल्यामुळेच इमरान खान यांच्यावर असा भ्याड हल्ला करण्यात आल्याची चर्चा सध्या पाकिस्तानात रंगली आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’चा या सगळ्या प्रकरणात हस्तक्षेप असून त्यांनी शाहबाज शरीफ यांचे कठपुतळी सरकार स्थापन करून आधीच कमकुवत असलेल्या तेथील लोकशाहीला आणखीन कमजोर करण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो.
 
 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना गैरवर्तन प्रकरणात सार्वजनिक पदावर राहण्यास काही दिवसांपूर्वीच अपात्र ठरवण्यात आले आहे आणि पुढील निर्णय होईपर्यंत त्यांचे राजकीय भवितव्य अधांतरीच म्हणावे लागेल. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, इमरान खान यांच्यावर बेकायदेशीरपणे सरकारी भेटवस्तू विकल्याचाही आरोप आहे.
 
 
एप्रिलमध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यापासून, इमरान खान यांनी पाकिस्तानच्या सर्वात शक्तिशाली संस्थेचे नेतृत्व करणार्‍या प्रमुख ‘जनरल्स’च्या विरोधात सार्वजनिक समर्थन मिळविण्यासाठी धोकादायक मोहीम सुरू केली. पण, इमरान खान यांनी आपले पद गमावल्यापासून सध्याच्या शरीफ सरकारच्या अंगावर काटा आला आहे. पाकिस्तानचे आर्थिक संकट, आकाशाला भिडलेली महागाई आणि या वर्षी देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली नेणार्‍या विनाशकारी पुराला तोंड देण्यास असमर्थता, यांसारख्या मुद्द्यांवरून खान यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली होती.
 
 
त्यामुळे खान यांच्यावर झालेल्या या हल्ल्याची वेळही तितकीच महत्त्वाची म्हणावी लागेल. खान त्यांच्या समर्थकांसह निषेध मोर्चात सहभागी होत असताना एका बंदुकधारीने खान आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात खान यांच्या एका समर्थकाचा मृत्यू झाला, तर खान यांच्या पायात तीन गोळ्या लागल्याचेही सांगण्यात येत आहे. यानंतर इमरान खान पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करत असल्यामुळे त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला,असा युक्तिवाद बंदुकधार्‍याने केला.
 
 
परंतु, इमरान खान आणि त्यांच्या समर्थकांचे असे मत आहे की, हे प्रकरण जेवढे सांगितले जाते तितके साधे-सरळ आणि सोपे नक्कीच नाही. या हल्ल्याच्या कटात पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्लाह आणि ‘आयएसआय’चे वरिष्ठ अधिकारी मेजर जनरल फैसल नसीर यांचाही हात असल्याचा आरोप खान यांनी केला आणि आता या हल्ल्याविरोधात ‘एफआयआर’ही नोंदवला जात नाही. इमरान खान यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांमार्फत संदेश जारी केला की, या तिघांना त्यांच्या पदांवरुन तत्काळ हटवले नाही तर देशात यापुढे जे काही घडेल, त्याला सर्वस्वी शरीफ सरकारच जबाबदार असेल.
 
 
प्रत्युत्तरादाखल गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी खान यांच्यावरील हल्ल्याच्या कथित कटाचे आरोप फेटाळून लावले आणि ते म्हणाले की, “आम्ही इमरान खानला आमचा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून जरुर पाहतो, शत्रू म्हणून नाही. पण, इमरान खान हेच आपल्या राजकीय विरोधकांना शत्रू मानतात.”
 
 
 
 
पाकिस्तान
 
 
 
इमरान खान यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील एकूणच कमकुवतपणामुळे झालेला हा हल्ला यामागे व्यापक कट असल्याचे सूचित करतो. पाकिस्तानातील राजकीय नेतृत्वाला नेहमीच घातपात, हत्येचा प्रयत्न आणि हद्दपारीच्या धमक्या येत असतात. ही परंपरा अगदी देशाचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या हत्येपासून सुरू झाली आणि पुढे झुल्फिकार अली भुट्टो आणि बेनझीर भुट्टो यांनाही या संघर्षात आपले प्राण गमवावे लागले. राष्ट्रीय पातळीपेक्षा तेथील प्रादेशिक पातळीवर ही आकडेवारी तर अधिक चिंताजनक आहे.
 
 
इमरान खान या जीवघेण्या हल्ल्यातून बचावले असले, तरी त्यांच्या जीवाला धोका कायम आहे. खरंतर गेल्या निवडणुकीत ते लष्कराचा आवडता चेहरा होते, तसेच कट्टरपंथी दहशतवादी संघटनांशी त्यांची जवळीक होती, हे त्यांच्या ‘तालिबान खान’ या विशेषणावरून स्पष्ट होते. त्यांचा लष्कराशी असलेला जवळचा संबंध झुल्फिकार अली भुट्टोंच्या काळाची आठवण करून देणारा आहे. भुट्टो हेसुद्धा त्यांच्या प्रारंभीच्या काळात लष्कराच्या गळ्यातील ताईत होते. पण, 1970च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर त्यांनी भुट्टो आणि त्यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रतिनिधी म्हणून अवामी लीगच्या विरोधात भुट्टोंना उभे केले. परिणामी, पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगलादेश हा नवा देश नकाशावर आला. 1971च्या या युद्धाने आणि त्याच्या परिणामांमुळे पाकिस्तानच्या मूळ द्विराष्ट्र सिद्धांताचा पुरता धुव्वा उडाला आणि आपल्या स्थापनेतून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानने नव्या धोरणाकडे वाटचाल केली. त्यापैकीच एक म्हणजे राजकारणावर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लष्कराची नवी शक्ती आणि याच रणनीतीला पाकिस्तानचे सर्वच राजकीय पक्ष, नेते अगदी आजही चिकटून आहेत.
 
 
आणि या नवीन रणनीतीअंतर्गत, देशाचा नवा नेता, झुल्फिकार अली भुट्टो, ज्यांना सैन्याने छद्म-लोकशाही मुखवटा म्हणून सादर केले होते, त्यांनी 1973 मध्ये अहमदी तसेच बलुच राष्ट्रवादींवर बळजबरी केली आणि सैन्यासोबत हातमिळवणी करत सर्व मर्यादा ओलांडल्या. पण, नंतर जेव्हा झुल्फिकार अली भुट्टो आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे सैन्याच्या मार्गात अडसर ठरु लागले, तेव्हा शेवटी भुट्टोंनाच लष्कराच्या हातून आपला जीव गमवावा लागला.
 
 
इमरान खान यांनी भुट्टोंप्रमाणेच लष्करासाठी आपली उपयुक्तताही बहुधा ओलांडली आहे आणि ज्या प्रकारे ते लष्कराच्या विरोधात वारंवार आघाडी उघडत आहेत, त्यावरून संभाव्य परिणामांची त्यांनाही नक्कीच कल्पना असेल. त्याचवेळी इमरान खान यांच्यावरील हा हल्ला पाकिस्तानातील लोकशाहीच्या दुर्दशेचा दाखला आहे की, अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे पाकिस्तानात केवळ नाममात्र स्वरूपात अस्तित्वात आहे. स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षातही पाकिस्तान खरोखरच त्याच्या ‘डीप स्टेट’च्या गुलामगिरीतून अद्याप मुक्त होऊ शकलेला नाही, ज्याने लोकशाही आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरच नव्हे, तर धार्मिक, सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक व्यवस्थेवरही विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानची वाटचाल नेमकी कुणीकडे होणार, ते पाहावे लागेल.
 
 
 
(अनुवाद : विजय कुलकर्णी)
 
 
 
Powered By Sangraha 9.0