मुंबई: महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांची महिन्याभरात श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. श्वेतपत्रिका काढण्याचे आदेश फडणवीस शिंदे सरकारने दिले आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आम्ही अल्ट्रा मेगा प्रकल्प आम्ही आणत आहोत, त्याप्रमाणे सध्या मेगा खोटं बोलण्याचा प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ३१ ऑक्टो. रोजी महाराष्ट्रातील उद्योगांबाबतची शासनाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे आजच्या माझ्या पत्रकार परिषदेत कोणाची बाजू खोडून काढण्याचा प्रयत्न नाही. कारण गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रात उद्योजकांच्या बाबतीत नकारात्मक वातावरण तयार केलं जात आहे." असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
यावेळी विद्यमान सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला वळवले असा आरोप केला होता. यालाच सामंत यांनी प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्योजक महाराष्ट्रात येतील, उद्योगपूरक महाराष्ट्रात वातावरण असावं, अशी आज स्थिती आहे. मात्र विरोधकांकडून कुठेतरी सरकारची बदनामी केली जात आहे. माझ्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी केली आहे. माझा राजीनामा मागणं सोपं आहे. मात्र त्यांनी सांगावं की, दावोसला जाऊन आपण किती उद्योग आणले, किती पैसा खर्च केला याचा हिशोब द्या, असे वक्तव्य सामंत यांनी केले.
सॅफ्रन प्रकल्पाबाबत बोलताना पुढे ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार घडला. दीड दोन महिन्यांत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्या खोडण्याचं काम तसेच संबंधीत कंपनी गेल्याचं सांगून त्याचं खापर आमच्यावर फोडण्याचं काम काही लोक करत आहेत. त्यामुळे वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन, सिनारमस या प्रकल्पांची खरी वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरात श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. या श्वेतपत्रिकेत महाराष्ट्र शासनानं उद्योगांबाबत केलेला पत्रव्यवहार, बैठका तसेच याचे रेकॉर्डचा पुरावा आम्ही महाराष्ट्राला देणार आहोत." अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
प्रकल्प महाराष्ट्रात यायला सुरुवात झाली आहे. कालच दोन प्रकल्प महाराष्ट्रात येण्यास इच्छुक आहे.परंतु या प्रकल्पाबाबत जो काही गैरसमज आहे तो मी राज ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांची भेट घेऊन दूर करणार आहे. सोबतच अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी जरी माहिती मागीतली तरी त्यांना मी देण्यास तयार आहे. अशी भूमिका सामंत यांनी मांडली.