बेशिस्तपणे वाहने पार्क करताय, सावधान ... !

01 Nov 2022 20:55:59

Park vehicles recklessly
 
 
 
 
ठाणे : खड्डेमय रस्ते आणि वाहतुक कोंडीमुळे त्रासलेल्या ठाणेकरांना आता टोईंगच्या टोलधाडीचाही सामना करावा लागणार आहे. गेल्या वर्षभरापासुन बंद असलेली ठाणे शहर वाहतुक शाखेची उचलेगिरी पुन्हा सुरु होणार असुन रस्तोरस्ती बेशिस्तपणे वाहने पार्क करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत वाहतुक शाखेच्या अधिकाऱ्यानी दिले.या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टोईंग व्हॅन तैनात केली जाणार आहे.यासाठी दोन दिवस भोंगा लावुन " नो पार्किंग क्षेत्रात वाहने पार्क करू नका " अशा उदघोषणा द्वारे नागरिकाना सुचना केल्या जात आहेत.
 
 
 
ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते कल्याण, बदलापूर,उल्हासनगरआणि भिवंडी पर्यत शहर वाहतुक शाखेचे १८ वाहतुक कक्ष आहेत.या क्षेत्रात बेकायदा पार्क केलेल्या वाहनावर टोईंगद्वारे होणाऱ्या कारवाईमुळे अनेकदा त्या टोइंगवरील कर्मचारी आणि दुचाकी चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते. मध्यंतरी न्यायालयीन दट्यामुळे सुमारे वर्षभरापासून बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनांवरील टोईंगची कारवाई बंद झाली होती. त्यामुळे वाहने उभी करण्यास मनाई असलेल्या ठिकाणी कारवाईसाठी पोलिसांकडून मोबाईलद्वारे फोटो काढला जात होता. परंतु पोलिसांना प्रत्येकवेळी प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन कारवाई करावी लागत असल्याने वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवणे आणि कारवाई करताना पोलीस कर्मचाऱ्यांची बरीच तारांबळ उडत होती. त्यामुळे, हव्या त्या प्रमाणात कारवाई देखील होत नव्हती.
 
 
 
तेव्हा, टोईंगवरील कारवाई पु्न्हा सुरू करण्यासाठी ठाणे पोलिसांकडून मागील चार ते पाच महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रासाठी १८ नविन टोईंग वाहने दाखल झाली आहेत. आयुक्तालय क्षेत्रातील सर्व १८ कक्षांना कारवाईसाठी प्रत्येकी एक वाहन देण्यात आले असुन लवकरच टोईंग वाहनाद्वारे कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, नागरिकांना या टोईग कारवाईबाबत अवलोकन व्हावे, यासाठी वाहतुक पोलिसांकडुन सध्या शहरांमध्ये उद्घोषणा केली जात आहे, त्यांनंतर पुढील एक - दोन दिवसांत प्रत्यक्ष कारवाई सुरू होईल. अशी माहिती वाहतुक शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांना दिला.
 
 
 
टोईंग कारवाईचा भूर्दंड झाला दुप्पट
 
रस्त्यावर बेशिस्तपणे वाहन पार्क करून वाहतुकीस अडथळा करणाऱ्या गाड्यांवर टोईंग वाहनांद्वारे कारवाई केली जाते. यात प्रामुख्याने दुचाकींवरच सर्वाधिक कारवाई केली जाते. सध्या रस्त्याकडेला किंवा वाहन उभी करण्यास प्रतिबंधित ठिकाणी दुचाकी उभी केल्यास २०० रुपयांचा दंड आकारला जातो. त्यात आता टोईंगच्या अतिरिक्त २०० रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे पकडलेल्या दुचाकी सोडविण्यासाठी ४०० रुपयांचा भूर्दंड भरावा लागणार आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0