पार्ल्यातील बाबासाहेब गावडे रुग्णालयाला ७ लाखांचा दंड

मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून अखेर दंडाची कारवाई

    01-Nov-2022
Total Views |
 
Gavde Hospital, Vile Parle
 
 
मुंबई तरुण भारत इम्पॅक्ट न्यूज
 
 
मुंबई : विलेपार्ले येथील महात्मा गांधी मार्गावरील बाबासाहेब गावडे रुग्णालयातील कथित अनियमिततांवर अखेर काही प्रमाणात अंकुश लावण्यात आला आहे. गावडे रुग्णालयाच्या बाबतीत करण्यात आलेल्या असंख्य तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखेर मुंबई महापालिकेतर्फे रुग्णालयावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून रुग्णालयाला आर्थिक दंड ठोठावण्यात आला असून या प्रकरणी तक्रारदारांनी 'मुंबई तरुण भारत'चे आभार मानले आहेत. 'मुंबई तरुण भारत'ने सातत्याने गावडे रुग्णालय प्रकरणातील बाबींना प्रसिद्धी झोतात आणण्याचे प्रयत्न केले होते. अखेरीस महापालिकेने या प्रकरणी कारवाई करून गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पाऊल उचलले आहे.
 
 
मालमत्ता विभागाकडून अखेर दंडात्मक कारवाई
 
रुग्णालयाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरकारचे विशेष कार्यकारी अधिकारी सदानंद साटम यांनी गंभीर आरोप केले होते. 'बाबासाहेब गावडे रुग्णालयाचे बांधकाम सुरु होण्यापूर्वीच या ठिकाणी २ दुकाने बांधण्यात आली होती. मागील २० वर्षांपासून या इमारतीतील तळमजल्यावर औषधी विक्री दुकानाच्या जागेवर एक व्यावसायिक गाळा असून तो पूर्णतः बेकायदेशीररीत्या उभा आहे. मात्र बेकायदेशीररीत्या उभारलेल्या या गाळ्याचे भाडे कुणाकडे जाते ? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. तसेच रुग्णालयाकडून सुविधा पुरविण्यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम उकलण्यात आहे,' असे अनेक गंभीर आरोप साटम यांनी केले होते.
 
 
या प्रकरणी साटम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पत्र लिहून तक्रार केली होती. अखेरीस मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून गावडे रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ६ लाख ७९ हजार २०० मुळ दंड आणि दंडाची रक्कम वेळेत न भरल्याची शिक्षा म्हणून अतिरिक्त ३० हजार ८०० रुपये असा एकूण ७ लाख १० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
 
 
मुंबई तरुण भारतच्या पाठपुराव्याचेही मोठे यश !
 
विलेपार्ले पूर्व मधील पालिकेच्या राखीव भूखंडावर उभे असलेले बाबासाहेब गावडे रुग्णालय काही खासगी संस्थांच्या घशात घालण्यासाठी हे प्रकार सुरु झाले होते. रुग्णालय आणि महापालिका प्रशासन यांच्यात झालेल्या करारातील नियम आणि अटींचे सर्रास उल्लंघन करण्यात येत होते. काही खासगी विकासक आणि घटकांना हे रुग्णालय देण्याचा प्रयत्न केला जात होताच. मात्र, आम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे आणि मुंबई तरुण भारतच्या पाठपुराव्यामुळे हे प्रयत्न हाणून पाडण्यात यश आहे आहे,' अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरकारचे विशेष कार्यकारी अधिकारी सदानंद साटम यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.