तुम्हाला काय वाटतं? जर आपली पृथ्वी फक्त दोन अंश सेल्सिअसने गरम झाली, तर आपण विचलित व्हायची गरज आहे का? आज आपण बघणार आहोत, हा 1.5 ते 2.0 अंश सेल्सिअसचा फरक हा इतका महत्त्वाचा आहे का? जाणून घेऊया त्याचबद्दल...
जागतिक तापमानात होणार बदल रोखण्यासाठी, संयुक्त राष्ट्राच्या सदस्यांनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केली. हा मतैक्य असलेला एक आंतरराष्ट्रीय करार आहे, ज्याची रचना जागतिक तापमानपूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा दोन अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी केला गेलेला संयुक्त प्रयत्न आहे. या चाच अर्थ, औद्योगिक क्रांतीच्या आधी, कारखान्यांनी हवेत हरितगृह वायू सोडण्यास सुरुवात करायच्या आधीच्या काळात पृथ्वी कशी होती, ती पातळी गाठण्यासाठी प्रयत्न करणे, ही या कराराचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. गेल्या 20 वर्षांमध्ये, या दोन-अंशाच्या उंबरठ्याचा संदर्भ युरोपियन युनियन, ‘जी-8 समिट’ (आता जी 7) आणि अधिकाधिक धोरणांमध्ये आणि करारांमध्ये दिला गेला आढळतो. पण मग हा दोन अंश तापमानात वाढ इतकी महत्त्वाची कशामुळे? या ची सुरुवात 1975 मध्ये झाली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा विचार सर्वात प्रथम एका ’इकोनॉमिस्ट’ने जगासमोर मांडला. डॉ. विल्यम नॉर्डहास, या अर्थशास्त्रज्ञाने पृथ्वीची तापमानवाढ ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोका आहे, असे पाहिल्यांदा सिद्ध केले. त्यांनी ’इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाईड सिस्टीम्स अॅनालिसिस’ अर्थात आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून वैज्ञानिक शोधांना प्रोत्साहन देणार्या गटामधील त्यांच्या सहकार्यांना विचारले की, मानव कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन नियंत्रित करू शकतो का? नॉर्डहास यांच्या मते, जागतिक सरासरी तापमान मानवनिर्मित कार्बन डायॉक्साईडमुळे फक्त दोन डिग्री सेल्सिअस वाढल्यास आपल्या हवामानात गेल्या काही लाख वर्षांमध्येदेखील न पाहिलेले बदल होतील. नॉर्डहास यांचा हा निष्कर्ष फक्त गृहीत धरलेला नसून विज्ञानावर आधारित सिद्धांत आहे.
कार्बन डायॉक्साईड ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या प्रक्रियेद्वारे पृथ्वी गरम करत आहे, हे त्यांना माहीत असल्यामुळे, नॉर्डहासने वातावरणातील या वायूचे प्रमाण दुप्पट झाल्यास काय होईल, याची गणना केली ही गणना जागतिक स्तरावर दोन अंशांच्या तापमान वाढीस समतुल्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी असेही भाकीत केले की, तत्कालीन दरांनुसार, आपण 2030 च्या आसपास दोन सेल्सिअसच्या पुढे असलेल्या धोक्याच्या क्षेत्रात प्रवेश करू. त्यानंतरच्या 20 वर्षांमध्ये, अनेक शास्त्रज्ञांनी मानवनिर्मित हरितगृह परिणामामुळे तापमानवाढ होण्याच्या धोक्यांविषयी धोक्याचा इशारा दिला. 1992 मध्ये, हवामानातील धोकादायक मानवी हस्तक्षेप थांबवण्यासाठी ‘युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेंट चेंज’ची स्थापना करण्यात आली. परंतु, उत्सर्जन किंवा वाढत्या जागतिक तापमानावर कोणतीही ठोस मर्यादा ठेवली गेली नाही. जागतिक पातळीवर कागदपत्रांमध्ये या दोन डिग्रीचा उल्लेख व्हायला आणखी चार वर्षे लागली आणि हा उल्लेख पर्यावरणासाठीच्या युरोपियन कौन्सिलकडून आला. संयुक्त राष्ट्रांनी अखेरीस 2016मध्ये पॅरिस करारामध्ये दोन अंशांच्या मर्यादेला मान्यता दिली. नॉर्डहासने प्रथम चर्चा केल्यानंतर तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ लोटला होता.
फक्त दोन अंश तापमानात वाढ फारशी वाटत नाहीना? आपल्या रोजच्या दिवसांत आपल्याला कदाचित दोन अंशातील चढ-उतार लक्षात येणार नाही. परंतु, हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढदीर्घकालीन विचार आहे. विसाव्या शतकात, सरासरी जागतिक तापमान सुमारे 14 डिग्री सेल्सिअस होते. 1880 पासूनची नोंद बघता, जग जवळजवळ एका अंशाने गरम झाले आहे. परंतु, त्यामध्ये दोन-तृतीयांशपेक्षा जास्त वाढ 1975 नंतर झाली आहे आणि सन 2000 नंतरची वर्ष आतापर्यंतच्या ‘विक्रमी-20’ सर्वांत उष्ण वर्षांमध्ये गणले गेले आहे. तब्बल 11 हजार वर्षांपूर्वी पृथ्वी इतकी गरम होती.
आपल्या ग्रहाचा 70 टक्के भाग महासागरांनी व्यापलेला आहे आणि इतके पाणी गरम करण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते आणि एकदा हे पाणी तापलं की, आख्या पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. त्यामुळे सरासरी जागतिक तापमानात दोन अंशांच्या वाढीचा अर्थ असा होतो की, जागतिक स्तरावर ठिकठिकाणी तापमानात वाढ दोन सेल्सिअसपेक्षा खूप जास्त आहे. आपल्याला आपल्या कृतीचे परिणाम जाणवत आहेत व म्हणूनच हवामान पूर्वीपेक्षा विचित्र जाणवू लागले आहे. भारतातदेखील चक्रीवादळ, अतिवृष्टी आणि ढगफुटीचे प्रमाणदेखील वाढलेले दिसतेच, तसेच दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटादेखील तीव्र झाल्या आहेत.
जर दोन डिग्रीने तापमान वाढवले, तर जग अजून कोरडे होईल व याचा परिणाम अर्थव्यवस्था, शेती, पायाभूत सुविधा आणि हवामान पद्धतींवर तीव्रतेने दिसून येईल. लंडनमधली आताच झालेली उष्णतेची लाट व त्याने कोलमडलेली अर्थव्यवस्था ही या परिणामांचे जागतिक उदाहरण आहे. या परिणामांपासून कोणीही वाचू शकत नाही. वाढत्या तापमानामुळे प्रवाळ खडक आणि आर्क्टिक क्षेत्रांसह जागतिक पर्यावरणाचे आणि परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नसलेल्या अनेक प्रजातींचे अतोनात नुकसान होईल. ग्रीनलॅण्ड बर्फाचे आवरण आणि आर्क्टिकमधला बर्फ वेगाने वितळल्यामुळे समुद्राची पातळी वाढल्याने सखल किनारपट्टीचे प्रदेश आणि जगभरातील लहान बेटे नष्ट होतील. सोबत असलेल्या ‘गुगल अर्थ व्होएजेर’च्या वापराने बनवलेल्या छायाचित्रात, दोन डिग्री आणि चार डिग्री तापमानवाढीने मुंबईचे काय होईल, तेदेखील बघा. फक्त दोन अंश सेल्सिअसची वाढ संपूर्ण राष्ट्राचे भविष्य ठरवू शकते.
‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ ही हवामान बदलाची कारणे आणि परिणामांवर राष्ट्रांना सल्ला देणारी संस्था आता सरासरी तापमान तीन अंश, चार अंश किंवा त्याहून अधिक वाढल्यास जग कसे असेल, याचा अभ्यास करत आहे. यामुळे जगाच्या बर्याच भागांत जागतिक आणि प्रादेशिक अन्नसुरक्षेसाठी मोठे धोके निर्माण होणार आहेत आणि हवामानाच्या बदलांमुळे भयंकर हानी होणे नक्कीच शक्य आहे, असे कळते आहे. पृथ्वीवर काही ठिकाणी राहणे किंवा बाहेर काम करणे अशक्यदेखील होऊ शकेल, असे संशोधन सांगते.
हे भविष्य भयंकर आहे. ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’च्या ‘डेटा’वर आधारित अभ्यास सांगतो की, 2100पर्यंत आपण दोन ‘ओसी’ पार करण्याची 95 टक्के शक्यता आहे आणि हवामान बदलाचे हानिकारक परिणाम अटळ असू शकतात. यासाठी प्रत्येकाने पाऊल उचलण्याची गरज आहे. कारण, संपूर्ण मानव जातीकडची वेळ संपत चालली आहे. अजून 80 वर्षांनी होणार्या गोष्टींची काळजी आम्ही का करावी, हा विचार आपण प्रत्येकाने सोडायची गरज आहे. प्रत्येकाने हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, मुंबईत आज तुम्ही जिथे राहत आहात, ज्या जागेवर बसून हा लेख वाचत आहात, ती जागा काही दशकांतच पाण्याखाली असू शकते, याहून भयंकर ते काय?