स्वप्नपूर्तीसाठी परिश्रम घेणार्‍या प्राची

09 Oct 2022 20:27:23
prachi damle
 
 
 
‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड’मध्ये अंधांसाठी ‘ऑडिओ बुक रेकॉर्डिंग’ तयार करणे, प्रसंगोचित ललितलेखन करणे, मराठी संस्थांसाठी अभिवाचन करणार्‍या डॉ. प्राची दामले यांच्याविषयी...
 
 
कौटिल्यीय अर्थशास्त्राच्या विशिष्ट भागावर पीएच. डी करण्याचा निर्णय डॉ. प्राची शैलेश दामले यांनी घेतला. पीएच.डी पदवी संपादन केल्यानंतर त्यांची पावलं नव्या वाटेवर चालू लागली. ‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड’मध्ये अंधांसाठी ‘ऑडिओ बुक रेकॉर्डिंग’ तयार करणे, प्रसंगोचित ललितलेखन करणे, मराठी संस्थांसाठी अभिवाचन करण्याचे ही त्यांनी काम केले. त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
 
 
‘क्षणश: कणश्चैव विद्यार्मथच साधयेत्। क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम्॥’ जीवनातील जबाबदार्‍या सांभाळताना, आत्मभान जपण्याचा प्रयत्न करीत असताना आणि समाजाचं ऋण अंशत: तरी फेडण्यासाठी स्वकौशल्याचा आधार घेताना प्राची यांनी वरील सुभाषिताचं सूत्र अंगीकारलेलं आहे. प्राची यांनी पदव्युत्तर पदवीकरिता कौटिल्यीय अर्थशास्त्र हा विशेष विषय घेतला होता. त्यामुळे कौटिल्यीय अर्थशास्त्रातील विशिष्ट विभागावर पीएच.डी करण्याचं त्यांनी ठरविले. त्यांच्या या विषयाला मार्गदर्शक डॉ. ललिता नामजोशी यांनी अनुमोदन दिले आहे. प्राची यांनी ‘कौटिल्यीय अर्थशास्त्रातील युद्धशास्त्राचे ऐतिहासिक समीक्षणात्मक अध्ययन’ हा विषय निवडला होता. हल्ली राजकारणात ‘चाणक्यनीती’ हा शब्दप्रयोग वारंवार केला जातो.
 
 
प्राची यांच्यासाठीदेखील पीएच.डी करणे ही गोष्ट आव्हानात्मक होती. कारण, वाणिज्य शाखेची मुंबई विद्यापीठाची पदवी, संस्कृत विषयात मुंबई विद्यापीठाच्या द्विपदवीधर असताना त्यांना आता संशोधनाच्या क्षेत्रात काम सुरू करायचे होते. वाणिज्य शाखेत पदवीधर असताना विवाहानंतर त्यांनी आवडीच्या संस्कृत विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्याचे ठरवले. तेव्हा दहावीनंतर एकदम अनेक वर्षांनी संस्कृतमध्ये स्नातकोत्तर शिक्षण घेणं अवघड जाईल, म्हणून मार्गदर्शनासाठी त्यांनी संस्कृतमधील ज्ञानाने ज्येष्ठ असलेल्या एका गृहस्थांची भेट घेतली. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ऐकल्यावर त्यांनी मदत करण्यास नकार दिला. व्यं. रा. जामखेडकर यांनी कोणत्याही शंका न घेता प्राची यांना संस्कृत शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक संशोधक किंवा अभ्यासक कसा असावा, याचाही संस्कार केला. हाच आश्वासक पाठिंबा व मार्गदर्शन पुढे डॉ. ललिता नामजोशी यांनी दिला.
 
 
डॉक्टरेट करीत असताना अनेक कठीण प्रसंगही त्यांच्या आयुष्यात आले. गृहकर्तव्य, प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या चिमुरड्याच्या वेगवेगळ्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेणं अशा विविध बाजू सांभाळून मग स्वअभ्यास करावा लागत असे. बहुतेक वेळा त्यांना संस्कृतसाठी दुपारीच वेळ मिळत असे. कारण, सकाळी पोटापाण्याचा उद्योग, त्यानंतर लेकीला शाळेत सोडून मगच त्या संस्कृतपीठात जात असत. पुन्हा शाळा सुटण्याच्या वेळेआधी ट्रेन पकडण्यासाठी धावपळ करावी लागत असे. मधल्या वेळेत जमेल तशी मार्गदर्शकाशी चर्चा करणे, संदर्भ ग्रंथ शोधणे, स्वत:मधील पत्नी व आईशी तडजोड न करता आपल्याला ‘डॉक्टरेट’चा पल्ला गाठायचा आहे, ही सर्व कसरत करीत त्यांनी ‘पीएच.डी’चा प्रवास केला. स्वप्नांच्या पूर्ततेसाठी असा किंवा याहूनही जास्त संघर्ष प्रत्येकाला बहुधा करावाच लागतो, तरच अपेक्षित यशाचं मोल समजते, असे प्राची सांगतात.
 
 
प्राची यांचे माहेर म्हणजे मूळचे कशेळीचे. राजापूरचे पाध्ये-गुर्जर घराणं. पण गेल्या तीन पिढ्या मुंबईत वास्तव्य करीत आहेत. त्यांचे आई-वडील पदवीधर होते. आई ए. जी. ऑफीसमध्ये ‘सीनियर ऑडिटर’ म्हणून, तर वडील ‘टाटा ग्रुप’च्या ‘फोर्ब्स कंपनी’त कार्यरत होते. प्राची या जन्मापासून डोंबिवली येथे वास्तव्य करीत आहेत. त्यांच्या आई-वडिलांना शिक्षण व वाचन, भ्रमंती यांची आवड होती. त्यामुळे घरात चैनीच्या वस्तू आणण्यापेक्षा सणासुदीला किंवा एरवीही पुस्तकांची खरेदी किंवा पर्यटनाचा बेत होत असे. अभ्यासानुकूल वातावरणात लहानपण गेल्यामुळेच शाळेतील आदर्श विद्यार्थिनी म्हणून ते आजतागायत संयमपूर्वक ध्येयाचा पाठपुरावा करू शकलो, असे प्राची यांनी सांगितले.
 
 
प्राची यांच्या स्वप्नपूर्तीच्या प्रयत्नांना समर्थ साथ लाभली ती जोडीदाराची. शैलेश दामले हे एका बँकेत उच्चपदावर कार्यरत आहेत. पत्नीने फक्त पोटार्थी न होता, आपल्या क्षमतांची पारख करून त्यांनी योग्य दिशा देणे हा शैलेश यांचा आग्रह होता. म्हणूनच डॉक्टरेट झाल्यावर प्राची यांनी नव्या वाटांवर चालण्यास सुरुवात केली आहे. डॉ. विजया वाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्र कन्याकोशा’साठी संपादन, लेखन इत्यादी करण्याचा अनुभव मिळाला. वरळीच्या ‘एनएबी स्टुडिओ’त ‘साऊंड’, ‘एडिटिंग’, ‘रेकॉर्डिंग’ वगैरे गोष्टी शिकायला मिळाल्या. ‘एनएबी’मध्ये अभिवाचनासाठी ‘व्हाईस टेस्ट’ करण्यासाठी त्यांच्या मनात विचार आला. कारण, काही वर्षांपूर्वी त्यांची आकाशवाणी केंद्रात वृत्तनिवेदनासाठी निवड झाली होती. तेव्हाच आवाजातील खुबीचा परिचय झाला होता. काही चांगल्या व प्रसिद्ध अभिवाचकांची इथेच ओळख झाली. त्यांनी ‘पं. दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रतिष्ठान’तर्फे ‘एकात्म मानव दर्शन संकल्पना कोशा’मध्ये लेखन, नंतर तत्संबंधी अनुवादही त्यांनी केला आहे.
 
 
मधल्या काळात त्यांना इतिहासात रूची निर्माण झाली. ‘इतिहास संकलन समिती’ या इतिहासविषयक समाजजागृती करणार्‍या राष्ट्रीय स्तरांवरील संस्थेशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले. बर्‍याच संस्थांमध्ये सूत्रसंचालन करण्याचे कामही त्यांनी केले आहे. ‘राष्ट्रपुरुष स्मृती जागरण समिती’च्या काही उपक्रमात माहितीपर भाषणेही त्यांनी दिली आहेत. ‘विवेकानंद सेवा मंडळां’शी त्या एक शिक्षिका म्हणून संलग्न असून वनवासी भागातील मुलांना शिकवण्यात सहभागी होत असतात. कौटिल्यीय अर्थशास्त्राशी संबंधित विषयावर विविध ठिकाणी त्या व्याख्यानेही देत असतात. ‘पुस्तकदर्पण’ हे त्यांचे युट्यूब चॅनेल आहे. अनुवाद क्षेत्रात काही काम करण्याचा मानस आहे. अशा वेगवेगळ्या प्रांतात वावरत असताना अनुभव विश्व समृद्ध होते. एक नवीन ऊर्जा मिळते आणि आपण आपल्याला नव्याने गवसतो, असे प्राची सांगतात. अशा या व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!
 
 
 
Powered By Sangraha 9.0