"राजराजा चोळ हा हिंदू नव्हता?" कमल हसनचा दावा किती खरा?

    07-Oct-2022
Total Views |


Raja Raj Chola
 
राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी राजा चोल हा हिंदू राजा नव्हता, असे विधान केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यात आता अभिनेते कमल हासन यांनीही उडी मारली आहे. दिग्दर्शक वेत्रीमारन यांनी केलेल्या विधानाचे कमल हासन यांनी समर्थन करुन त्यांची बाजू मांडली आहे. त्यामुळे राजा चोल यांच्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
 
 
भारताचा प्राचीन इतिहास हा केवळ मानवाच्या उत्क्रांतीचा, त्याच्या बुद्धिमत्तेनुरूप त्याने निर्मित केलेल्या संस्कृतीचा लेखाजोखा मांडत नाही तर त्याचबरोबर त्याने त्याच्या महत्त्वाकांक्षेकरिता, आपल्या पराक्रमाने घडवून आणलेल्या बर्‍याच तात्कालिक घडामोडींचा ऊहापोहही करतो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या अमलाखाली असलेला भारत हा देश राजकीयदृष्ट्या एकसंध नव्हता. असंख्य छोट्या-मोठ्या संस्थानांचा देश, अशी भारताची ओळख होती. इंग्रजांनी आपली सत्ता निरंकुश चालवता यावी म्हणून ही संस्थाने खालसा केली.
 
 
त्यातून आजचा भारत अस्तित्वात आला. प्राचीन काळापासून अशी बरीच राजघराणी होती, ज्यांची संस्थाने होती, त्यांच्यावर फक्त त्यांचा आणि त्यांचाच अंमल चालत असे. सर्वात जास्त सामर्थ्यवान असे मौर्य साम्राज्याचे नाव पराक्रमी आणि अनेक वर्ष राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांमध्ये गणले जाते. मौर्यांच्या नंतर आपल्या प्रचंड पराक्रमाने आणि कुशल प्रशासनाने आणि आगळ्यावेगळ्या स्थापत्यशैलीने इतिहासात नोंदले गेलेले साम्राज्य म्हणजे चोळ साम्राज्य.
 
 
दक्षिण भारताच्या इतिहासात चोळ साम्राज्य अतिशय बलशाली साम्राज्य मानले जाते. चोळ साम्राज्याचा उल्लेख इसवी सन तिसर्‍या शतकात सम्राट अशोकाच्या काळातील साहित्यात आढळतो. कावेरी नदीच्या मुखाशी तीन साम्राज्ये होती. चेरा, पांड्या, पल्लवा. चोळ घराणे हे आधी पल्लवांच्या अमलाखाली जहागिरदारांचे घराणे असल्याचे इतिहासकार सांगतात. मात्र, चोळ साम्राज्याला लाभलेल्या पराक्रमी राजांनी आपले केवळ स्वतंत्र साम्राज्यच निर्माण केले नाही तर आपल्या साम्राज्याची अमिट छाप भारतीय इतिहासावर कोरली.
 
 
इतिहासात आठव्या शतकात चोल साम्राज्याचा पहिला राजा विजयालयाची कारकीर्द आढळते. चोळ हे मूळचे उरियरचे. विजयालया याने पल्लवा आणि पांड्या यांच्यातील अंतर्गत संघर्षाचा फायदा घेत मूत्तरयार संस्थानाकडून तंजावूर काबीज केले. कावेरी नदीलगतचा प्रदेश मिळवून तेथे एक मंदिर बांधले. जे या विजयालयाच्या नावावरून ’विजयालया चोलेस्वरम’ या नावाने ओळखले जाते. त्याने तंजावूर शहराची प्रशासनिक आखणी केली. हेच शहर पुढे चोळ साम्राज्याची राजधानी ठरले.
चोळ साम्राज्याचा दुसरा राजा आदित्य- प्रथमयाने पल्लवा आणि पांड्या वंशाची साम्राज्ये आपल्या अमलाखाली आणली. चोळ साम्राज्याची खरी ओळख निर्माण करणार्‍या राजांमध्ये राजाराज चोळ व राजेंद्र चोळ-प्रथमया शासकांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ते चांगले प्रशासक तर होतेच पण त्यांनी सर्वच आघाड्यांवर आपल्या साम्राज्याची भरभराट केली.
 
 
राजाराज चोळ हा पराक्रमी आणि अतिशय कुशल राजा तसेच प्रजाजनांच्या सोयीसुविधा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी योजना आखणारा राजा म्हणून लोकप्रिय होता. त्याने मदुराई, वेंगाय, मैसूर, श्रीलंका, मालदीव हा सर्व प्रदेश काबीज केला. त्यातील श्रीलंका जे पूर्वी ’सिलॉन’ या नावाने ओळखले जात असे, ते जवळपास ७५ वर्ष चोळ साम्राज्याच्या अमलाखाली होते. राजाराज पहिला आणि त्याचा मुलगा राजेंद्र चोळ-प्रथमयांचा कालखंड हा चोळ साम्राज्याचा सुवर्णकाळ मानला जातो. तंजावूर येथे बृहदिश्वर मंदिर हे या राजाच्या कालखंडात बांधले गेले कुशल प्रशासनाबरोबरच या राजांनी स्थापत्यकलेचे अत्युत्कृष्ट नमुने आपल्या कार्यकाळात निर्माण केले. जे आजही त्यांच्या बुद्धीसामर्थ्याचे तसेच उत्कृष्ट अंमलबजावणीचे द्योतक ठरतात. हे शैवपंंथीय असल्याने येथील बहुतांश मंदिरे ही शिवमंदिरे आहेत. तंजावूरमधील बृहदिश्वर मंदिर २१६ फूट उंच असलेले दहाव्या शतकातील अतिभव्य असे मंदिर आहे.
 
यात १२ फूट उंच शिवलिंग आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य हे की, ते पूर्ण मंदिर ग्रॅनाईट या अतिशय कठीण अशा दगडापासून बनविलेले आहे. या मंदिरासाठी एकूण १ लाख ३० हजार ग्रॅनाईट वापरले गेले. आश्चर्याची बाब ही की, तंजावूरपासून जवळजवळ ६० किमी. अंतरापर्यंत कुठेही ग्रॅनाईट दगडाची खाण नाही. त्यामुळे १०१० साली एवढे मोठे दगड इतक्या प्रमाणात इथपर्यंत कसे आणले गेले, हे अनाकलनीय आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराची रचना. आपण घर बांधताना सिमेंट-कॉंक्रिटचा उपयोग करतो, पण त्या काळात हे एवढे वजनदार दगड एकमेकांमध्ये केवळ अडकवलेे गेले आहेत. एकावर एक असे जवळपास १३ मजले (तामिळ भाषेत विमान) उंच अशी ही इमारत निर्माण केली गेली आहे आणि अद्याप ती सुरक्षित उभी आहे. विशेष म्हणजे या मंदिराचे बांधकामकरण्याकरिता पाया खणण्यात आला नव्हता तर हे मंदिर जमिनीवरच उभारण्यात आले आहे. तरीही आजतागायत ते उभे आहे. मंदिराच्या बाहेरील व आतील भागांवर सुंदर मूर्त्या कोरून त्यातून तामिळ पुराणातील दंतकथा दर्शविण्यात आल्या आहेत.
 
 
मंदिरातील तत्कालीन रंगीत दगडांपासून रंग बनवून त्या नैसर्गिक रंगाचा उपयोग करण्यात आला आहे. आजच्या पेस्टल कलरच्या जमान्यात हे नैसर्गिक रंग मन मोहून घेतात. त्याकाळी ते कसे दिसत असतील याची कल्पनाही करणे अशक्य आहे. मंदिराच्या कळसावर एक ८० टन वजनाचा दगड बसविण्यात आला आहे, ज्याला तामिळमध्ये ’कुंभक’ असे म्हटले जाते. एवढा भलामोठा दगड २१६ फूट मंदिरावर कसा चढविला असेल, ते केवळ चोळच जाणे. या मंदिराचे शास्त्रज्ञांनाही आजपर्यंत न उलगडलेले कोडे म्हणजे या अतिभव्य अशा मंदिराची जमिनीवर सावली पडत नाही. आहे ना आश्चर्य? चोळ शासकांच्या कारकिर्दीत त्यांनी एकूण आठ मंदिरे निर्माण केली. या मंदिरांवर द्रविडी शिल्पकलेचा प्रभाव आहे. मंदिरे उभारताना ती केवळ देवालये न राहता आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांचे केंद्रस्थान होतील याकडे त्यांनी विशेष लक्ष पुरवले.
 
 
मंदिराच्या आवारातच गुरुकुल भरत असे. त्यात तत्कालीन शास्त्रांचा अभ्यास करवून घेतला जाई. तसेच या मंदिरांचे आवार एवढे मोठे असे की, आपत्कालीन परिस्थितीत प्रजाजनांना किंवा तीर्थयात्रा करणार्‍या यात्रेकरूंना थांबण्याची सोय तिथे केली जात असे. याच काळात मूर्तिकलेचा आणि धातूच्या तसेच दगडांच्या मूर्तिकलेचा विकास झाला. तत्कालीन धातू वा पाषाणमूर्त्यांमध्ये कमालीची सजीवता आढळून येते. तत्कालीन तांब्याच्या मूर्ती या प्रसिद्ध होत्या. चोळ कालातील सुवर्णमुद्रांना ’काशु’ म्हटले जाई. या काळातील शंकराची नटराजाची मूर्ती सर्वोत्कृष्ट मूर्तिकलेचे प्रमाण आहे. त्याचबरोबर तत्कालीन विष्णू, राम-सीता तसेच बाळकृष्णाच्या तांब्याच्या मूर्तींचा उल्लेख पुराणात आढळतो.
 
 
राजेंद्र चोळ-प्रथमया राजाने आपल्या सत्ताकाळात पार पाडलेल्या अनेक मोहिमांमुळे दक्षिणेतील कावेरी नदीच्या परिसरात उदयास आलेल्या या साम्राज्याचा विस्तार पार उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला. राजेंद्र चोळने लढाया करून प्रचंड मोठा भूभाग काबीज केला होता. त्याच्या काळात चोळ राजसत्ता अत्युच्च स्थानावर होती. पूर्वेकडील देशांमध्येही चोळ साम्राज्याची ख्याती पोहोचली होती. राजेंद्र चोळने उत्तर भारतात आपल्या साम्राज्याची ओळख म्हणून नवे शहर निर्माण केले जे ’गंगाईकोंड चोलापुरम’ या नावाने ओळखले जाते. या शहरात त्याने असे एक कुंड तयार केले होते, ज्यात गंगेचे पवित्र जल सुवर्णकलशातून आणून ओतण्यात आले होते. कालांतराने या कुंडाला ’गंगाईकोंड’ म्हटले जाऊ लागले.
 
 
चोळ साम्राज्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ठराविक एक असे राजधानीचे शहर नसे. ते कालांतराने बदलत असे. केवळ शहरे, प्रदेश काबीज न करता आपले सैन्यदल मजबूत कसे होईल याकडे या राजांचा कटाक्ष असे. चोळ साम्राज्यात सैन्याचे चार विभाग होते. पायदळ, गजदल, नौसेना, अश्वदल. त्याचबरोबर धनुर्धर, तसेच भाला फेकण्यात कुशल असणारे पथक तसेच तलवारबाजी करणारे पथक असे सर्वार्थाने सर्वच स्तरावर सुसज्ज असे सैन्य या शासकांचे होते. सेनेच्या तुकडीचे नेतृत्व करणार्‍याला ’महादंडनायक’ असे म्हटले जाई. चोळ सेनेत सेनापती बहुधा ब्राह्मण असत, ज्यांना ’ब्रह्माधिराज’ म्हटले जाई. असे हे प्रशासक केवळ चांगले राजेच नव्हते तर कलोपासकही होते. नृत्य, साहित्य, संगीत, नाट्य, चित्रकला, स्थापत्य, शिक्षण या सर्व कलांचा तो सुवर्णाध्याय होता. या सर्व कलांना तसेच कलाकारांना राजाश्रय आणि यथोचित गौरव या राजांनी दिला.
 
 
 
 
Raja Raj Chola
 
 
 
 
 
(चोळ राजांचे साम्राज्य )
 
 
चोळकाळातील अभिलेखावरून हे स्पष्ट होते की, त्यावेळी चोळ सम्राटांचे शासन सुसंघटित होते. राज्याचे सर्वाधिकार राजाकडे असत. तो आपल्या मंत्र्यांबरोबर तसेच राज्यातील अधिकार्‍यांबरोबर सल्लामसलत करून राज्याच्या हिताचे निर्णय घेत असे. साम्राज्यातील प्रत्येक प्रांताला ’मंडलम’ म्हटले जात असे. मंडलमची व्यवस्था राजकुमार पाहत असत. मंडलाला ’कोट्टम’मध्ये, कोट्टमला ’नाडू’ (जिल्हा) मध्ये तर नाडूला विविध ’कुर्रम’ (ग्रामसमूह) मध्ये विभाजित केले जाई. या सर्व स्तरांवर स्थानिक सभा भरवल्या जात. ग्रामसभेत सदस्यांची वयोमर्यादा ३५ ते ७० वर्ष असे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक ग्रामसभा असे. ग्रामसभेच्या सदस्यत्वाची महत्त्वपूर्ण अट म्हणजे त्या सदस्याची मालकीची कमीत कमी दीड एकर जमीन असली पाहिजे. ग्रामसभेला ’ऊर’ असे म्हटले जात असे. सभेतील सदस्यांचा कार्यकाल फक्त एक वर्षापुरता असे.
 
 
राज्याचा प्रमुख आर्थिक स्त्रोत हा भूमी कर असे. तत्कालीन अभिलेखांच्या नोंदीनुसार जमिनीवरील कर ठरविण्याआधी जमिनीचे मोजमाप घेतले जात असे. विशेष बाब म्हणजे राजाराज प्रथमयाच्या पायाचे माप हे जमिनीचे प्रमाणित माप समजले जाई. त्यानुसार जमीन मोजून त्यावर कर ठरविला जात असे. जमिनीवरील वार्षिक पिकाच्या उत्पन्नाच्या एक तृतीयांश हिस्सा हा भूमी कर असे. भूमी कराबरोबरच इतर अनेक कर हे राज्याचे आर्थिक स्त्रोत असत. उदा. उपयोगी वृक्षकर, सुपारीच्या बागांवरील कर, गृहकर, व्यापारिक प्रतिष्ठान, तेलघाणी कर, ग्रामसुरक्षा कर इ. सराफ, लोहार, कुंभार आदींना आपापल्या व्यवसायानुसार कर द्यावा लागत असे. करासाठी त्यावेळी हरै, वरि, मरून्पाडू, द्रंडमहे शब्द प्रचलित होते. कर हा धान्य स्वरूपात किंवा रोखीच्या रूपात स्वीकारला जाई. न्यायशासन हे राजाच्या अखत्यारित होते. राजा सर्वोच्च न्यायाधीश असे. राजा ब्राह्मण किंवा तत्समशास्त्रांचे ज्ञान असलेल्या विद्वानांच्या सल्ल्याने न्यायदान करीत असे. मात्र, मोठ्या गुन्ह्यांकरिता राजाच न्यायनिवाडा करीत असे. चोळ शासनकाळात दंडव्यवस्था म्हणजे गुन्हेगाराला आर्थिक दंड किंवा सामाजिक स्तरावर अपमान होईल, असा दंड असे. आर्थिक दंड सुवर्णमुद्रांच्या स्वरूपात असे.
 
 
स्थानिक चोळ शासकांनी आपल्या कार्यकाळात प्रचंड मोठे, विस्तीर्ण असे रस्ते, भवन, राजवाडे, अद्ययावत इस्पितळे बांधली. तसेच शेतीसाठी सिंचनाचीही सुविधा आपल्या प्रत्येक राज्यात निर्माण केली. स्त्रियांची स्थिती याआधीच्या काळापेक्षा चांगली होती. उच्च कुळातील स्त्रियांचा काही प्रमाणात प्रशासनाशी संबंध येत असे. मात्र, या काळात देवदासी, सतीची प्रथा सुरूच होती. तसेच दासप्रथाही होती.
 
 
 
 
Raja Raj Chola
 
 
 
(राजा विजयालया चोळ )
 
 
चोळ राज्यकर्त्यांचा काळ हा तामिळ साहित्याचाही सुवर्णकाळ ठरला. या शासनकर्त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे, तसेच त्यांची स्तुती करणारे अनेक ग्रंथ या काळात निर्माण झाले. त्यात जयगोंडारचे ’कलिगंत्तुपर्णि’ तसेच तिरुत्तक्कदेव यांच्या ’जीवक चिंतामणि’ या ग्रंथांना तामिळ महाकाव्यात अग्रस्थान आहे. कुलोत्तंग तृतीय या शासकाच्या काळात ’तामिळ रामायणा’ची निर्मिती झाली. जी त्याकाळच्या प्रसिद्ध कवी कंबन यांनी केली होती. याव्यतिरिक्त व्याकरणकोष, काव्यशास्त्र, छंद आदींविषयीही बरेचसे लिखाण या काळात झाले.
 
 
चोळ शासक हे शिवशंकराचे उपासक असले तरी ते धार्मिक सहिष्णुतावादी होते. त्यांनी वैष्णव, जैन तसेच बौद्ध धर्माच्या अनुयायांनाही सन्मान दिला. त्यांच्या धार्मिक प्रचारकार्याला कोणतीही आडकाठी केली नाही. चोळवंशाच्या अभिलेखावरून अशी माहिती मिळते की, त्यांनी संस्कृत भाषेच्या तसेच साहित्याच्या अभ्यासासाठी विद्यापीठे (ब्रह्मपुरी, घटिका)स्थापित केली होती. ती चालविण्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध केला गेला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या संस्कृत साहित्यात चोळ शासकांच्या साम्राज्याला अत्यल्प महत्त्व दिले गेले आहे. तरीही व्यंकट माधव यांचे ’ऋग्वेदा’वरील प्रसिद्ध भाष्य हे चोळ नरेश परांतक-प्रथमयाच्या कार्यकाळात निर्माण झालेले आहे.
 
 
तेराव्या शतकात चोळ शासक पूर्णपणे निर्बल झाले होते. आपलं साम्राज्य शत्रूराष्ट्रांपासून अबाधित ठेवण्यात ते असमर्थ ठरले. दक्षिणेत पांड्या, केरळ आणि श्रीलंकेसारख्या राज्यांमध्ये चोळ वंशाविरुद्ध विद्रोह सुरू झाला होता. समुद्रापार ज्या द्वीपकल्पांवर राजेंद्र दुसरा याने सत्ता स्थापित केली होती त्यांनीदेखील चोळ साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवले. चोळ शासकांच्या राजदरबारातील सामंतांचे कुटील डाव आणि शत्रूराष्ट्रांचे आक्रमण यामुळे अंतर्गत कलह आणि बाह्यशत्रूंकडून पराजित झालेले चोळ शासक हळूहळू नामशेष झाले पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गाजवलेले पराक्रम, बराच काळ असलेली त्यांची सुनियोजित सत्ता, लोकांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजना, साहित्य, संगीत, शिक्षण या सर्वांसाठी आणलेला भरभराटीचा काळ, त्यांचा उत्कर्ष यामुळे चोळ साम्राज्य भारतावर बराच काळ राज्य करणार्‍या काही ठराविक साम्राज्यांमध्ये आजही विशेष उल्लेखनीय आहे.
 
 
 
-रश्मी मर्चंडे