‘शिवतीर्थ’ आणि ‘बीकेसी’चा संदेश

07 Oct 2022 09:30:39
 
दसरा मेळावा 2022
 
 
 
तमाम शिवसैनिकांपुढे प्रश्न आहे, कुणाशी एकनिष्ठ राहायचे, उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहायचे की एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना करावा लागेल. हा निर्णय केवळ भावनेच्या आहारी जाऊन करणे चालणार नाही. निर्णयाच्या काही कसोट्या ठरवाव्या लागतील.
 
 
विजयादशमीचा शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा हा सर्व शिवसैनिकांच्या दृष्टीने वार्षिक वारकरी दिन असतो. जेव्हापासून हे मेळावे सुरू झाले, तेव्हापासून वाजतगाजत अत्यंत उत्साहाने तरूण आणि तरूणी मेळाव्याला जात असत आणि त्यातून एक घोषणा पुढे ‘आवाज कोणाचा......शिवसेनेचा’ आणि खरोखरच मुंबईत शिवसेनेचा आवाज निर्माण झाला. या आवाजाने एक संतुलन साधले. समाजात ज्या अनिष्ट प्रवृत्ती असतात. मग त्या धार्मिक असतील, जातीय असतील, त्यांना या आवाजाचा धाक निर्माण झाला. याचे सर्व श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना द्यावे लागते.
 
 
यंदाही शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. यावेळेला मात्र मेळाव्याची रया गेलेली होती. शिवसैनिकांचा तो उत्साह नव्हता. स्वखर्चाने प्रवासाचा त्रास करून घेण्याची मानसिकता नव्हती. शिवाजी पार्कवर ‘गर्दी’ होती, पण या गर्दीत ‘दर्दी’ लोक किती होते, याचा शोध घ्यायला पाहिजे. ‘आवाज कोणाचा,’ ही घोषणा आता ‘आवाज उद्धव ठाकरेंचा’ अशी झाली आहे आणि ही घोषणा कोणतीही ऊर्जा निर्माण करू शकत नाही. कोणताही उत्साह निर्माण करू शकत नाही आणि मुंबईत संतुलन राखण्यासाठी ही घोषणा काही कामाची नाही.
 
 
उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. मुख्यमंत्रिपद गेल्यापासून ते गेले तीन महिने सार्वजनिकरित्या रडतच असतात. तेच रडगाणे त्यांनी यावेळेला गायले. ‘जर कुण्या एका निष्ठावान शिवसैनिकाने आक्षेप घेतला तर मी हे शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडेन.’ हे विनोदी वाक्य झाले. 40 निष्ठावंत शिवसैनिक आमदारांनी आक्षेप घेतला उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने ते गद्दार झाले. ते खोकासूर झाले, एकनाथ शिंदे कटप्पा झाले...’ असे जे जे शिवसैनिक उद्धव ठाकरेंवर आक्षेप घेतील, ते ते गद्दार होतील. ‘मी पक्षप्रमुखपद सोडीन’ असे बोलायला काय जातं?
 
 
उद्धव ठाकरे यांचे ‘शिवतीर्था’वरील भाषण, पक्षाच्या सर्वोच्च नेत्याचे भाषण कसे असू नये, याचा आदर्शपाठ झाला. दुसर्‍याला ‘गद्दार’ म्हणताना, तीच तलवार आपल्या मानेवरही पडणार आहे, हेदेखील ज्यांना समजत नाही, त्यांना काय म्हणायचे? निवडणूक शिवसेना आणि भाजप म्हणून लढविली, जनतेने सत्तेवर बसण्याचा कौल दिला, जनतेशी गद्दारी करून म्हणजे शिवसैनिकांशी गद्दारी करून सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे उद्व ठाकरेंनी चरण धरले. ही गद्दारी ठाकरे परिवार विसरला, तरी जनता विसरणार नाही. सर्वोच्च राजकीय नेत्याने प्रतिपक्षावर टीका करीत असताना संयमित शब्दांचा वापर करावा लागतो. असभ्य भाषा वापरून चालत नाही. त्यातही एकेकाळी जे आपल्या बरोबर होते, आपल्या बरोबर उठले, बसले, जेवले, सुख-दु:खात सहभागी झाले, त्यांना ‘गद्दार’ म्हणणे, ‘खोकासूर’ म्हणणे, ‘कटप्पा’ म्हणणे, हे परिपक्व राजकीय नेत्याचे लक्षण नाही.
 
 
दसरा मेळाव्यात संभ्रमित शिवसैनिकांना भविष्यकालीन दिशा देण्याची गरज होती. पक्ष पुन्हा उभा करायचा आहे. नगरसेवक आणि आमदार निवडून आणायचे आहेत, त्यासाठी काय करावे लागेल, याचे दिशादर्शन आवश्यक होते. काळानुरूप घोषणा देण्याची आवश्यकता होती, याबाबतीत बाळासाहेब प्रतिभासंपन्न होते. ‘प्रारंभी मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी लढायचं आहे,’ ही घोषणा त्यांनी दिली. नंतर ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ ही घोषणा दिली आणि निवडणुकांच्या काळात घोषणा दिली, ‘विधानसभेवर भगवा फडकावयचा आहे.’ प्रत्येक घोषणेचा अर्थ शिवसैनिकाला समजला आणि तो विद्युतभारित होऊन कामाला लागला. बदलत्या परिस्थितीमध्ये शिवसैनिकांत ‘खोकासूर’, ‘कटप्पा’, ‘गद्दार’ हे शब्द कोणती चेतना निर्माण करणार?
 
 
याचवेळी ‘बीकेसी’ मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसरा शिवसेना दसरा मेळावा भरला होता. या दसरा मेळाव्यात शिवसेनेपेक्षा जास्त गर्दी होती. या मेळाव्यासाठी शिवसैनिक का आले, कसे आले, पैसे देऊन आणले का, यावर वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. अशीच टीका ‘शिवतीर्था’वरील गर्दीसंबंधीही करता येऊ शकते. उघड्याने नागड्याला नावे ठेवण्यात काही अर्थ नसतो.
 
 
या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे भाषण झाले. एकनाथ शिंदे हे वक्तृत्वसंपन्न राजनेते आहेत, असे कुणी म्हणत नाही. ते काम करणारे आणि कार्यकर्त्याला मायेने जवळ करणारे राजनेते आहेत. वक्तृत्वाची उधळण करणारे ‘शिवतीर्था’वर अनेकजण होते, एक भाडोत्री महिलादेखील होती. अशी भाषणे क्षणिक उत्तेजना निर्माण करतात. ती वडापावसारखी असतात, गरम आहे तोपर्यंतच त्याची चव. एकनाथ शिंदे यांचे भाषण ‘घणाघाती’, ‘मुलूखमैदानी’, उत्तेजना निर्माण करणारे वगैरे नव्हते, पण ऐकणार्‍याला विचार करायला लावणारे होते. ते वडापावी भाषण नव्हते, तर ते केशरसुगंधाचे भाषण होते. गद्दारी कोणी केली, कधी केली, कशासाठी केली, हे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब हे ‘किंगमेकर’ होते. उद्धव ठाकरे स्वत:च ‘किंग’ झाले. घराण्याचे अध:पतन झाले. हे एकनाथ शिंदे यांनी स्वच्छ शब्दांत मांडले.
 
 
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही कोरोना काळातील उद्धव ठाकरे यांची घोषणा होती. तेव्हा तिची खिल्ली उडवण्यात आली की, उद्धव ठाकरे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’च पार पाडीत आहेत. ते कधी मंत्रालयात येत नाहीत, कुणाला भेटत नाहीत, सहकार्‍यांशी कधी संवाद करीत नाहीत. ‘मी आणि माझे कुटुंबीय’ ही त्यांची कार्यशैली. एकनाथ शिंदे यांनी त्याची काही उदाहरणे दिली. शिवसेना ही काही ‘प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’ नाही, ती शिवसैनिकांची आहे, हेदेखील त्यांनी अधोरेखित केले.
एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर, त्यांची देहबोली पाहिल्यानंतर आणि त्यांच्या चेहर्‍यावरील भाव पाहिल्यानंतर कुठेतरी असे वाटून गेले की, हा माणूस प्रामाणिक आहे. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची त्यांना नको असे नाही. आयुष्य राजकारणात काढल्यानंतर कुणाही राजकीय नेत्याला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा असणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यात गैर काही नाही.
 
 
गैर फक्त एवढेच आहे की, मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी जे आपले वैचारिक मारेकरीच आहेत, त्यांच्याशी जर हातमिळवणी केली, तर ते काम गद्दारीचे ठरते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची विचारधारा समाजात धार्मिक कलह वाढविणारी, जातीय विद्वेष पसरविणारी, शेतकर्‍यांना आत्महत्या करायला लावणारी, स्त्री वर्गाला दुर्बळ करणारी आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांची साथ सोडण्याचा धाडसी निर्णय केला. राजकारणात धाडस केल्याशिवाय काही मिळत नाही. ‘मातोश्री’वर बसून आणि ‘शिवतीर्था’वर दोन हात पसरून केवळ देहबोलीने काहीही प्राप्त होत नाही. प्राप्त झालेले आमदारसुद्धा सोडून जातात.
जो आपला वैचारिक मित्र भाजप आहे, त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे यांनी युती केली, ही स्वाभाविक आणि नैसर्गिक युती आहे. राजकारण हे सत्ताकारण असते. सत्ताकारण स्पर्धेचे असते. ही स्पर्धा प्रत्येक मतदारसंघात असते. म्हणून युतीचा मार्ग ही अवघड आणि बिकट वाट असते. येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत या कसोटीतून या दोन्ही पक्षांना जावे लागेल. त्यात दोन्ही पक्ष किती लवचिकता दाखवितात, यावर महाराष्ट्रातील भावी राजकारण अवलंबून राहील. एकनाथ शिंदे यांनी धोका पत्करून आपला मार्ग ठरविला आहे.
 
 
तमाम शिवसैनिकांपुढे प्रश्न आहे, कुणाशी एकनिष्ठ राहायचे, उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहायचे की एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना करावा लागेल. हा निर्णय केवळ भावनेच्या आहारी जाऊन करणे चालणार नाही. निर्णयाच्या काही कसोट्या ठरवाव्या लागतील, त्या अशा -
 
 
बाळासाहेब ठाकरे एक व्यक्ती होते की विचार होते?
व्यक्तिनिष्ठा जोपासायची की विचारनिष्ठा जवळ करायची?
विचारांची बांधिलकी स्वीकारणारा नेता कोण आहे?
विचार सोडणारा नेता कोण आहे?
कार्यकर्त्यांना मायेने जवळ करणारा कोण आहे?
नको त्या चौकटीत सापडलेला नेता कोण आहे?
 
 
अशा सर्व कसोट्या लावून शिवसैनिकांनी निर्णय केला पाहिजे. ते जो काही निर्णय करतील, त्यावर महाराष्ट्र दाऊद गँगच्या मार्गाने जाणार की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने जाणार, याचा निर्णय लागेल. ‘शिवतीर्थ’ आणि ‘बीकेसी’ दसरा मेळाव्याचा हाच आपल्यासाठी संदेश आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0