अपघातात जायबंदी झाल्याने ढोलकी वाजवण्यास असमर्थ ठरलेल्या वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी लोककलेचा पाईक बनलेल्या तेजस मोरे या युवकाविषयी...
ठाणे शहरात दि. 15 डिसेंबर, 2003 रोजी जन्मलेला युवा ढोलकीपटू तेजस पुंडलिक मोरे याचे मूळगाव रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील हातोंड. तेजसचे वडील उत्तम ढोलकीपटू असल्याने घरात लोककलेचा वारसा परंपरेने चालत आला होता. तेजसचे बालपण तसे सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे आनंदात गेले. आई सुषमा पुंडलिक मोरे या एका खासगी रुग्णालयात नोकरी करतात. आईचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झालेले असल्याने तेजसच्या पुढील संगीत व शालेय शिक्षणासाठी ती सतत धडपडत असते. तेजसचा लहान भाऊ सौजस हादेखील कलेचा भोक्ता असून तो शास्त्रीय संगीत पं. कृष्णाजी बोंगाणे, महेश कंठे व भजनसम्राट पं. बाळासाहेब वाईकर यांच्याकडे शिक्षण घेत आहे. अशा प्रकारे संपूर्ण कुटुंबच कलेत रममाण झाले आहे.
बालपणीपासूनच ढोलकी, तबल्याचे सूर कानावर पडत असल्याने तेजसला तबला-ढोलकीचा वारसा वडिलांकडून मिळाला. वयाच्या 12व्या वर्षीपासून खर्या अर्थाने तेजसला ढोलकी वादनाची गोडी लागली. वडील नावाजलेले ढोलकीपटू, पण दुर्दैवाने एका अपघातात वडिलांच्या हाताला मार लागून ते जायबंदी झाले. वडिलांचे ढोलकी वाजविणे बंद झाले. ढोलकी समोर पाहिली की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असत. हे दृश्य शाळकरी मुलगा असलेल्या तेजसला अस्वस्थ करीत असे. यासाठी त्याने अश्रू गाळत न बसता वडिलांची ढोलकी वादनाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करून कला क्षेत्रात यशस्वी होण्याचा निर्धार केला. वडिलांनी दिलेले बाळकडू व ढोलकीचा वारसा सोबत असल्याने तेजसने या कलेत पारंगत होण्यासाठी मनाची तयारी केली आणि ‘रियाज’ सुरू ठेवून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. आपला मानस वडिलांजवळ बोलून दाखवताच त्यांनीही तेजसला प्रोत्साहन दिले.
कलेचे शास्त्रीय शिक्षण घेऊन पारंगत होण्यासाठी वडील तेजसला वर्तकनगर येथील पं. रमाकांत आंबवणे यांच्याकडे घेऊन गेले. त्यांच्याकडे तबलावादनाचे धडे घेत असतानाच सुप्रसिद्ध ढोलकीवादक कृष्णाजी मुसळे (मुंबई लोककला अकादमीमधील प्रशिक्षक) यांच्याकडे 2009 पासून ढोलकी शिक्षण सुरू केले ते आजतागायत सुरू आहे. त्याचबरोबर गेल्या सात वर्षांपासून तेजस तबलावादनाचे शिक्षण पं. पांडुरंग पवार यांच्याकडेही घेत आहे.
आज जो काही मी घडत आहे, त्याचे श्रेय आई-वडिलांसह, गुरुंनाही आहे. या गुरुजनांमुळे आणि माझ्या ढोलकीच्या थापेला शुभाशीर्वाद देणार्या मायबाप रसिकांमुळेच लोककलेची एक-एक शिखरे पादाक्रांत करीत असल्याचे तेजस अभिमानाने सांगतो.
वयाच्या बाराव्या वर्षी ढोलकीवर थाप पडल्यापासून गुरुजनांनी दिलेला आशीर्वाद हाच मोठा पुरस्कार आहे. तद्नंतर आजवर अनेक पुरस्कार मिळाल्याचे तेजस सांगतो. यात दै. ‘जनादेश गौरव पुरस्कार’, ‘रायगडभूषण पुरस्कार’, ‘ठाणे महापौर विशेष कला-क्रीडा पुरस्कार’, ‘सुधागडभूषण पुरस्कार’, ‘कोकण लोककला पुरस्कार’, ‘श्री संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा-आळंदी सन्मान’, ‘कोकण कलारत्न पुरस्कार’, ‘कुणबी समाज सन्मान’, सांगलीतील राज्यस्तरीय ढोलकी स्पर्धेत उपविजेता, चंद्रपुरात ’अजय-अतुल पुरस्कार’, ‘ठाणे महापौर भजन स्पर्धे’त तर सतत तीन वर्षे प्रथम क्रमांक पटकावला.
लोकनाट्य - पोवाडे, नमन, भारुड, ऑर्केस्ट्रामध्ये ढोलकी-तबल्याची साथ तसेच, चित्रपट क्षेत्रात अनेक गायकांना रेकॉर्डिंगमध्ये, आगरी-कोळी गीतांमध्ये ध्वनिमुद्रणात साथ, सह्याद्री वहिनीवर ‘ढोलकी झाली बोलकी’ मध्येही अव्वल सादरीकरण केल्याचे तेजस सांगतो.शांत व संयमी स्वभावाचा तेजस वारकरी आहे. घरात पूर्वापार चालत आलेली ही वारीची परंपरा जपणार्या तेजसच्या गळ्यातील तुळशीची माळा याची साक्ष देते. पोहणे, नवीन गाणी-संगीत ऐकणे, रेकॉर्ड करणे आदी छंद जोपासणार्या तेजसला सातासमुद्रापार जाऊन मायभूमीचे पांग फेडायचे आहेत. मराठमोळ्या ढोलकीचा आवाज सार्या विश्वात गुंजण्यासाठी तेजसला ढोलकी वादनात विशारद व्हायचे आहे. तसेच संगीत क्षेत्रात पीएच.डी करून संगीतकार होण्याची इच्छा आहे.
तेजसच्या वडिलांचा पिंड समाजसेवेचा असल्याने हा वारसाही तेजसने अंगीकारला असून रस्त्यावरच्या अनाथांनाही प्रेम मिळावे, यासाठी आपल्या प्रत्येक वाढदिवसाला तो त्यांना खाऊ व कपडे वाटतो. आपल्यासारख्या सामान्य कलाकाराला आई-वडील आणि गुरुजनांच्या शिकवणीमुळेच मानसन्मान मिळत आहे. तेव्हा, युवा पिढीनेही शिक्षणाबरोबर कलाक्षेत्रातील विविध संधींचा लाभ घेतला पाहिजे. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच आपला गाव, तालुका, जिल्हा किंबहुना आपल्या देशाचे नाव जगाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करून वाटचाल करा. असा मैत्रीपूर्ण उपदेश देणार्या युवा ढोलकीपटू तेजस मोरेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!