थोडा ‘सोशल ब्रेक’ हवाच!

05 Oct 2022 20:54:49
digital detox
 
‘4जी’ नंतर व्हिडिओनिर्मिती करणारा आणि तो पाहणारा ग्राहकवर्ग वृद्धिंगत होत गेला. रिल्स, युट्यूब, शॉर्ट्ससह अवघ्या 30 सेकंदात आशयनिर्मिती करण्याची स्पर्धा इतकी वाढली आणि त्यासोबत ग्राहकवर्गातही तितकीच वाढ झाली. इन्स्टाग्राम, ट्विटर, रेडीट, लिंक्डइन यापैकी कुठल्या ना कुठल्या अ‍ॅप्सचा वापर हल्ली प्रत्येक जण करतो. रिल्स-शॉर्ट्स पाहण्यात आणि तासन्तास कधी निघून जातात, त्याचा थांगपत्ताही लागत नाही. याचाच परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. मानसिक ताणतणाव, चिंता यासंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. या समस्यांवर औषधोपचार बाद ठरल्यानंतर आता नवी संकल्पना जन्माला येत आहे, ती म्हणजे ‘डिजिटल डिटॉक्स’!
 
 
नुकतेच इंग्लंड विद्यापीठाच्या बाथ येथील संशोधनात सोशल मीडियापासून एका आठवड्याचा ‘ब्रेक’ तुम्हाला या चिंतेपासून मुक्तता देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला जर ताणतणाव, चिंता सतावत असेल, तर एक आठवडा हा त्रास कमी करण्यासाठी लागू शकतो. पण, हे ‘डिटॉक्स’ म्हणजे नेमकं काय? ते आधी जाणून घेऊ. ज्याप्रमाणे नशा करणार्‍यांना दारू, सिगारेट आदींची व्यसने लागतात, त्याचप्रमाणे सोशल मीडियाद्वारे आभासी जगात वावरण्याचे व्यसन लागते. त्यानंतर ही सवय सुटता सुटेनाशी होते. अनेकदा सोशल मीडियाच्या आहारी गेलेली व्यक्ती पूर्णपणे जोखडातून सुटत नाही. या मायाजाळात अडकल्यानंतर अनेकदा आत्मविश्वास गमावल्याची भावना निर्माण होते. बर्‍याचदा अशावेळी ‘डिजिटल’ सुट्टीवर जाण्याचा सल्ला डॉक्टर किंवा समुपदेशकांकडून दिला जातो.
 
 
मानसिक तणावातून मुक्तता मिळावी, यासाठी सक्तीच्या ‘डिजिटल’ सुट्टीवर जाण्यालाच ‘डिजिटल डिटॉक्स’ म्हटले जाते. संशोधनकर्त्यांनी 18 ते 72 वर्षांच्या वयापर्यंतच्या 154 व्यक्तींचे सर्वेक्षण केले. त्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली. पहिल्या गटाला सोशल मीडिया वापरण्यास बंदी आणण्यात आली. दर दुसर्‍या गटाला नेहमीप्रमाणे सोशल मीडियाचा वापर करत राहण्यास सांगितले. प्रत्येक व्यक्तीने सरासरी आठ तास सोशल मीडियाचा वापर केला. दर आठवड्यानंतर प्रत्येकाच्या तीन चाचण्या करण्यात आल्या. त्यात नैराश्य आणि तणावासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. या प्रक्रियेत सोशल मीडियाचा वापर करणार्‍यांमध्ये प्रचंड परिणाम होत असल्याचे जाणवले.
 
 
‘वारविक-एडिनबर्ग मेंटल वेलबीईंग स्केल’वर निर्देशांक (मानसिक स्वास्थ्य चाचणीची पद्धत) 46 ते 55.93 पर्यंत पोहोचला. तसेच, नैराश्य चाचणीचा निर्देशांक 7.46 वरून थेट 4.84 पर्यंत घसरला. तसेच, चिंता करण्याचे प्रमाण हे 6.92 पासून 5.94 पर्यंत पोहोचले. याउलट स्थिती ही दुसर्‍या गटाची होती. सोशल मीडियावर सातत्याने वेळ घालवल्याचा फटका बसण्यामागे ही कारणे आहेत. वेळेचे नुकसान झालेच, पण त्याहूनही जास्त आरोग्याचे नुकसान झाले. या सगळ्यात विनाकारण आजारांना निमंत्रण आणि अशा आजारांबद्दल फारशी जनजागृतीही नसल्याने त्यावर उपचार आणि उपाययोजना करणार्‍यांचे प्रमाणही तितकेच कमी. याउलट प्रत्येक वयोगटात सोशल मीडियाचा वाढत चाललेला वापर आणि त्यातून जाणवणार्‍या मानसिक समस्या ही धोक्याची घंटा मानली आहे.
 
 
भारतासारख्या देशात जिथे युवावर्गाचा सोशल मीडियाकडे असलेला कल आणि मानसिक ताणतणाव आणि संबंधित आजारांबद्दल असलेली असाक्षरता, यामुळे एका महत्त्वाचा वयोगट या कात्रीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सोशल मीडियापासून लहानसा का होईना, पण सक्तीचा ‘ब्रेक’ घेणे आवश्यक आहे. हा मनाचा ‘ब्रेक’ उत्तम ‘ब्रेक’ ठरू शकतो. संशोधकांच्या मते, सोशल मीडियापासूनची किमान आठवड्याभराची फारकत ही फायदेशीर ठरते. भारतात एकूण लोकसंख्येच्या निम्मे लोक सोशल मीडियाचा वापर करतात. भविष्यात तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेेनुसार ही संभाव्य वाढ अधिकच आहे. एका सर्वेक्षणानुसार, 16 ते 44 वयोगटातील 70 टक्क्यांहून अधिक व्यक्ती सोशल मीडियाच्या आहारी गेल्याचे सर्वेक्षण आहे. ‘सोशल जाएंट’ कंपन्या भविष्यात दीर्घ मजकुरापेक्षा ‘स्क्रोल’ अवघ्या काही सेकंदात ‘स्क्रॉल’ करता येईल, असाच मजकूर निर्मिती करण्यावर भर आहे. हे कंपन्याही जाणून आहेत. व्हिडिओ ‘स्क्रोलिंग’मुळे सोशल मीडियाचा वापर वाढत आहे. या ‘स्क्रोलिंग’पासून मनाचा आणि उत्तम ‘ब्रेक’ घेणे, हेच केव्हाही चांगले, असे सर्वेक्षण यापूर्वीही बर्‍याच देशांमध्ये झालेले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0