अडीच वर्षात आदित्य ठाकरेंनी काय उद्योग केले?

31 Oct 2022 15:56:01
sujay vikhe patil
 
 
मुंबई : "महाराष्ट्रातून प्रकल्प गेले म्हणून बोंब ठोकणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आधी स्वतः अडीच वर्षात काय उद्योग केले, हे आधी सांगावे" अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे. साधे आपल्याही नवीन घर घ्यायचे असले तरी आपण कमीत कमी सहा महिन्यांपासून नियोजन करण्यास सुरुवात करतो, मग फडणवीस - शिंदे सरकार सत्तेत येऊन अवघे चारच महिने झाले असताना हे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले याला आताचे सरकार जबाबदार कसे? हे सर्व आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी महाविकास आघाडी आणि विशेषतः आदित्य ठाकरे आरोप करत आहेत असा आरोप सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
 
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात अनेक प्रकल्प येण्यास उत्सुक होते तरीपण महाविकास आघाडीने त्यांना काहीच प्रतिसाद दिला नाही. जेव्हा एखादा प्रकल्प कुठल्याही राज्यात येत असतो तेव्हा त्या प्रकल्पाच्या काही मागण्या असतात . त्यांना जमीन, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सोयी- सुविधा हव्या असतात. पण महाविकास आघाडीने यापैकी काहीच न देता या प्रकल्पांना राज्यात येऊच दिले नाही. आज ज्या प्रकल्पांच्या जाण्यावरून महाविकास आघाडी गदारोळ माजवत आहे ते सर्व प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातच महाराष्ट्रातून गेले आहेत. तेव्हा आपले अपयश झाकण्यासाठी फडणवीस - शिंदे सरकारवर टीका करणे बंद करावे अशी टीकाही सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0