‘नॅनो तंत्रज्ञाना’त संशोधन करणार्या, त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळालेल्या प्रा. डॉ. भोलानाथ तारकादास मुखर्जी यांच्याविषयी जाणून घेऊया...
नॅॅनो तंत्रज्ञान’ हा नव्या जगाचा मूलमंत्र आहे. प्रा. डॉ. भोलानाथ तारकादास मुखर्जी यांचे सर्व संशोधनकार्य या तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. त्यांना मुंबई विद्यापीठाने तीन लघु संशोधन प्रकल्प करण्यासाठी आणि केंद्र सरकारने एक मोठा संशोधन प्रकल्प करण्यासाठी अनुदान दिले होते. हे प्रकल्प मुखर्जी यांनी यशस्वीरीत्या पार पडले आहेत. त्यांच्या या सर्व प्रवासाविषयी जाणून घेऊया.
प्रा. डॉ. मुखर्जी यांचा जन्म प. बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील खरदाह नावाच्या एका लहान गावात झाला. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांची केंद्र सरकाराची नोकरी असल्याने त्यांची मुंबई येथे बदली झाली. वयाच्या नवव्या वर्षापर्यंत सर्व बालपण प. बंगालमध्ये गेल्याने तोपर्यंत त्यांना बंगाली व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेचा गंध नव्हता. म्हणून मुंबईत आल्यावरदेखील त्यांनी घरापासून दूर असलेल्या बंगाली शिक्षण संस्थेच्या दादरमधील शाळेत शिक्षण घेण्यास सुरूवात केली.
त्यामुळे लहान वयातच त्यांना ‘अॅन्टॉप हिल’मधील सरकारी कर्मचार्यांच्या वसाहतीपासून दादरपर्यंतचा प्रवास बसने दररोज करावा लागत होता. पुढे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी रुपारेल महाविद्यालयाची निवड केली. त्यांनी सेंद्रीय रसायनशास्त्रातील एम.एससी पदवी संपादन केली. त्यानंतर डोंबिवलीच्या के. वि. पेंढरकर महाविद्यालयात आधी लेक्चरर नंतर असोसिएट, प्रोफेसर आणि विभागप्रमुख म्हणून प्रदीर्घ कारकीर्द त्यांनी अनुभवली. पीएच.डी करण्याचे त्यांचे स्वप्न बराच काळ प्रत्यक्षात येत नव्हते. पण त्यांनी जिद्द सोडली नाही.
अखेर मुंबई ‘आयआयटी’चे प्रा. महेश्वर शरण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रबंध सादर केला. आणि पीएच.डी संशोधनाचे कार्य पूर्णत्वास नेले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवीदेखील मिळविलेली आहे. के. वि. पेंढरकर महाविद्यालयातील (आता स्वायत्त) रसायनशास्त्र आणि जैव तंत्रज्ञान विभागांच्या अभ्यास मंडळांवर ते काम करत आहेत. ‘इंडियन केमिकल सोसायटी’चे ते सहकारी आहेत.
अनेक संस्थांचे तहहयात सभासद आहेत. त्यात अनेक नामवंत संस्थांचा समावेश आहे. सोलापूरच्या ‘पी. ए. होळकर विद्यापीठा’ने त्यांची नेमणूक ‘नॅनो तंत्रज्ञान’ विषयाच्या अभ्यास मंडळांत केली आहे. डोंबिवलीच्या ‘वंदे मातरम्’ महाविद्यालयाच्या सल्लागार मंडळावर ही त्यांची नेमणूक झाली आहे. मुखर्जी यांचा संशोधनाच्या वाटेवरील प्रवास हादेखील सोपा नव्हता. मात्र, त्यांनी तो पार केला.
मुखर्जी हे अत्यंत विद्यार्थीप्रिय असलेले आणि विद्यार्थ्यांसाठी सदैव तत्पर असे शिक्षक आहेत. तसेच सहकार्यांसाठीदेखील मदतीचे हक्काचे ठिकाण असे आहेत. कोणीही कोणत्याही अडचणीत असो मुखर्जी नेहमी मदतीचा हात आणि सल्ला देण्याचे काम करतात. त्यांचा सल्ला अनेकांना उपयोगी पडलेला आहे. के. वि. पेंढरकर महाविद्यालयात झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे ते निमंत्रक होते. महाविद्यालयातील इतर अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केले आहे.
अभ्यासक्रम बनविणे, विषयतज्ज्ञ म्हणून, परीक्षक म्हणून काम करणो यासारखी अनेक कामे त्यांनी वेळोवेळी केलेली आहेत. त्यांना विविध क्षेत्रांत रस आहे. के. वि. पेंढरकर महाविद्यालयातील फिल्म सोसायटीत ‘द बायोस्कोप बग्स’ रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. डोंबिवली ते लेह खरदुंगला असा ६ हजार ३१४ किमी प्रवास त्यांनी मोटरसायकलवरून केला आहे. डोंबिवली ते दिल्ली १ हजार ६४० किमींच्या सायकल मोहिमेतदेखील ते सहभागी झाले होते. उल्हास नदीच्या पाण्याच्या दर्जासंदर्भात त्यांनी प्रदीर्घ काळ संशोधन केले आहे.
प्रा. डॉ. मुखर्जी यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर १६ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.विविध परिषदांमध्ये मार्गदर्शनपर अनेक भाषणे त्यांनी केली आहेत. मुंबई विद्यापीठाने तीन लघु संशोधन प्रकल्प करण्यासाठी आणि केंद्र सरकारने एक मोठा संशोधन प्रकल्प करण्यासाठी त्यांना अनुदान दिले होते. ते प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. वनस्पतीजन्य पदार्थांपासून नॅनोपदार्थ बनविण्याचे तंत्र हा त्यांच्या संशोधनाचा गाभा आहे.
हायड्रोजन ऊर्जेसंबंधी एका पेटंटकरिता त्यांनी अर्ज केलेला आहे. तब्बल ११ पुस्तकांचे ते सहलेखक आहेत, ज्यापैकी एक पुस्तक मुंबई विद्यापीठाने प्रसिद्ध केलेले आहे. ‘नॅनो’ पदार्थांची निर्मिती आणि उपयोग यासंदर्भातील एका पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. ‘मॅकग्रा हिल’ आणि ‘जॉन विली’ या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये काही प्रकरणे लिहिण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांचे अजून एक पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
संशोधन करत असताना लागणारी नवनवीन उपकरणे कल्पकतेने स्वत: अल्पखर्चात बनवण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच असतो. कार्बन नॅनो पदार्थ बनवत असताना लागणारी फर्नेस, हायड्रोजन किती प्रमाणात शोषला जातो, ते मोजण्यासाठीचे उपकरण आणि अन्य काही उपकरणे त्यांनी बनवली आहेत. सर्वसाधारणपणे अशी उपकरणे परदेशांतून आयात करावी लागतात आणि ती खूप खर्चिक असतात. मुखर्जी यांच्या एका विद्यार्थ्याने पीएच.
डीसाठीचे संशोधन पूर्ण केले आहे आणि अजून पाच विद्यार्थी संशोधन पूर्ण करण्याच्या वाटेवर आहेत. मुंबई विद्यापीठाने त्यांना नुकतेच ‘बेस्ट टीचर्स अवॉर्ड’ने सन्मानित केले आहे. कल्याण-डोंबिवलीत हा सन्मान मिळविणारे ते पहिले प्राध्यापक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!