ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो, त्याच अनुषंगाने जाणून घेऊया बेडूक या अनोख्या जीवांबद्दल. पावसाळ्याच्या दरम्यान दिसणारा आणि उरलेले सात-आठ महिने गायब असणारा जीव म्हणजे बेडूक... ओंगळवाणा वाटणारा हा बेडूक जीव सुमारे 300-350 दशलक्ष वर्षांपूर्वी निर्माण झाला. बेडकांची निर्मिती, त्यांची ध्वनिनिर्मिती आणि प्रजाती यांच्यावर प्रकाश टाकणारा हा लेख...
अनंत वर्षामागे अथांग पसरलेल्या या सूर्यमालेत सूर्यापासून बुध आणि शुक्र यानंतर असणार्या एका गोळ्यावर पर्यावरणाच्या आणि निसर्गाच्या चमत्कारातून जीवंत म्हणता येईल, अशा तोडक्या-मोडक्या एकपेशी सजीवाची निर्मिती झाली. या निर्मितीमागे 4.6 अब्ज वर्षांच्या रासायनिक आणि जैविक इतिहासाचा हातभार लागला. पृथ्वीवर असणार्या जैवविविधतेचा हा पहिला पूर्वज उत्क्रांतीच्या विविध क्लिष्ट प्रक्रियांमधून पुढे पुढे जाऊ लागला. या उत्क्रांतीमुळेच हा एका पेशीचा जीव अनेक पेशींचा बनू लागला. अनेक पेशींची निर्मिती मग वेगवेगळे काम करणार्या कार्यसंस्थांमध्ये होऊ लागली (Functioning system) आणि पृथ्वीवर पसरलेल्या अथांग समुद्रात शरीराला आकार म्हणता येईल, असे काही जीव तयार झाले.
श्वास घेण्यासाठी या प्राण्यांना आधी त्वचा आणि मग कल्ल्यांचा (Gills) वापर करावा लागला. वैज्ञानिक असा अंदाज लावतात की, साधारण 400 दशलक्ष वर्षांपूर्वी सागरात Lobe-Finned Fish वास्तव्य करत होते. या माशांच्या कल्ल्यांचे रुपांतर कालांतराने पायासारख्या दिसणार्या अवयवांमध्येहोऊ लागले. या नवीन शरीररचनेमुळे हे मासे समुद्राच्या तळाशी रांगत आपले जीवन जगू लागले. पण याचवेळी आपली पृथ्वी अनंत भौगोलिक बदलांमधून आणि वातावरणामधून जात होती. या अचानक पण बराच काळ टिकणार्या बदलांमुळे पृथ्वीवरील पाण्याची पातळी कमी अधिक होऊ लागली. पाण्याची पातळी कमी झाल्यावर पाण्यात श्वास घेणार्या जीवांना आपले जीव गमवावे लागले. या सर्व कालखंडात, ज्याला ‘डेवोनिअन कालखंड’ म्हणतात, त्यात बर्याच प्रजातींचा नाश झाला. परंतु, ’ङेलश-ऋळपपशव ऋळीह’ या वर्गात मोडणार्या जीवांमध्ये कमी पाणी आणि प्राणवायू असणार्या या नवीन परिसंस्थांमध्ये तग धरून ठेवण्यासाठी काही बदल झाले. यातील सर्वात महत्त्वाचा बदल होता, तो फुप्फुसांसारख्या असणार्या अवयवांची निर्मिती.
या ऐतिहासिक उत्क्रांतीमुळेहे जीव हवेतील प्राणवायू सहजतेने वापरू लागले आणि साधारण 370 ते 345 दशलक्ष वर्षांपूर्वी पहिल्या उभयचर प्राण्याची निर्मिती झाली. ही उत्क्रांती आपल्याला अधिक महत्त्वाची म्हणावी लागेल. कारण, इथूनच पृथ्वीवरील भूभागावर नांदणार्या चतुष्पाद जैवविविधतेची सुरुवात झाली. या काळात पृथ्वीवर झाडांच्या काही पूर्वजांची निर्मिती झाली होती. त्याचसोबत पाठीचा कणा नसणारे जीवसुद्धा पृथ्वीच्या भूभागावर उत्क्रांत होत होते. नव्याने उदयाला आलेल्या उभयचरांनी मग या परिसंस्थेचा ताबा घेतला आणि तत्कालीन अन्नसाखळीमध्ये वरचे स्थान मिळवले. या उत्क्रांतीमध्ये त्यांना काही किंमतसुद्धा मोजावी लागली. ती ही की, प्रजननासाठी आणि आपली कवच नसलेली अंडी घालण्यासाठी त्यांना पुन्हा पाण्याचा आधार घ्यावा लागत होता. आपण पाहिले तर आजसुद्धा बहुतांश उभयचर आपली अंडी पाण्यामध्येच घालतात.
‘उभयचर’ या शब्दाचा अर्थच असा आहे की, जे आपले अर्धे जीवन पाण्यात आणि अर्धे जीवन जमिनीवर व्यतित करतात. कालांतराने उभयचर प्राण्यांची उत्क्रांती तीन वर्गात झाली एक म्हणजे बेडूक आणि मंडूक (Frogs and Toads), Salamanders व Newts आणि सापासारखे दिसणारे Caecilians. यापैकी मानवी संस्कृतीमध्ये बेडूक या प्राण्याबद्दल अधिक उत्सुकता दिसते. कारण, पावसाळ्यात त्यांचे येणारे आवाज आणि त्यांच्या रंगांमध्ये असणारी कलात्मक विविधता. प्राचीन ग्रीक आणि इजिप्शियन संस्कृतीमध्ये बेडूक हे प्रजननक्षमतेचे चिन्ह मानले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये ‘युगिनी जलकामिनी’ या देवीचे वाहन बेडूक, असे नमूद केलेले दिसते.
बेडूक हे शीतरक्ती प्राणी आहेत. याचाच अर्थ ते त्यांच्या शरीराचे तापमान बाहेरील वातावरणानुसार बदलू शकत नाहीत. भूभागावर ध्वनिसंपर्क साधणार्या प्राण्यांची सुरुवात या बेडूक मंडळींकडूनच झाली.पण हे बेडूक नेमक्या पावसाळ्यात रात्रीच मोठमोठ्याने आवाज करून आपली झोप का मोडतात? याचं कारण त्यांच्या आधी सांगितलेल्या इतिहासात लपलेलं आहे. बेडकांना प्रजननासाठी पाण्याची गरज असते. बेडकांच्या अंड्यांची व अंड्यातून बाहेर पडणार्या 'Tadpoles' ची वाढ ही पाण्यामध्ये होते. पावसाळ्याच्या दिवसात पाणी साचलेल्या डबक्यांमध्ये सुरुवातीला नर एकत्र जमतात व स्वतःची जागा निश्चित करतात. सूर्यास्तानंतर नर बेडूक आवाज करायला सुरुवात करतात. माणसाला जसे स्वरयंत्र आहे, तसेच बेडकालाही आहे. बेडकाच्या गळ्याखाली एक किंवा दोन मोठ्या पिशव्या असतात, स्वरयंत्रणेतून येणारा आवाज आणि हवा या पिशव्यांमध्ये येते. पण हे उगाचच आवाज करतात का? तर नाही, हा आवाज मादीला आकर्षित करण्यासाठी असतो.
पाण्याच्या डबक्या शेजारी जेव्हा हे नर एकत्र येतात तेव्हा आवाजांचा गलका होतो. दुसर्या नरासोबत स्पर्धा करण्यासाठीसुद्धा बेडूक आवाज करतात. आवाजाने आकर्षित झालेल्या मादीसोबत बेडूक प्रजनन करतो व मादी पाण्यामध्ये अंडी घालते. पाण्यामध्ये अंडी घालणार्या बेडकांची अंडी ही आकाराने लहान व संख्येने जास्त असतात. भारतामध्ये आणि जगाच्या इतर भागांमध्ये पाण्याबाहेर अंडी घालणार्या बेडकांच्या प्रजातीसुद्धा पाहायला मिळतात. बेडकांची अंडी कवचरहित असल्यामुळे त्यांच्या वाढीसाठी हवामानात अधिक आर्द्रतेची गरज असते.
त्यामुळे, पाण्याबाहेर अंडी घालणारे बेडूक हे जास्त पाऊस पडणार्या व दमट हवामान असणार्या प्रदेशात जास्त दिसून येतात. भारतामध्ये सह्याद्रीच्या रांगेत व ईशान्य भागात अशा बेडकांची विविधता पाहायला मिळते. भारतामध्ये उभयचरांच्या 470 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. त्यामधील 90 टक्क्यांहून अधिक प्रजाती या बेडूक आणि मंडूक या वर्गातील आहेत. उभयचरांच्यासंपूर्ण जीवनाबद्दल अजूनसुद्धा विज्ञानाला फारच कमी माहिती आहे आणि त्यामुळे अजून बर्याच प्रजातींची वैज्ञानिक नोंद जीवशास्त्रात झालेली नाही.
Northern Dancing Frog ( Micrixalus Uttarghati )
पावसाळा संपत आला आणि जंगलातील झर्यांचे पाणी कमी झाले की, हे बेडूक प्रजननासाठी बाहेर येतात. आकाराने अगदी लहान असलेला हा बेडूक दिवसा व रात्री झर्यातील छोट्या दगडांवर बसून मेटालिक आवाज देतो. मादीला आकर्षित करण्यासाठी व दुसर्या नरांना आपल्या जागेतून हाकलून देण्यासाठी आवाज काढताना हे बेडूक मागील एक पाय उंचावतात, काही वेळा हवेत पाय फिरवून समोरील नराला ही माझी जागा आहे, असा संदेश देतात. हे झर्यातील छोट्या कणांच्या वाळू खाली अंडी देतात. अंडी देताना मादी मागच्या दोन पायांनी छोटा खड्डा करून त्यामध्ये अंडी देते. महाराष्ट्रात आजपर्यंत फक्त आंबोलीच्या जंगलात हे बेडूक आढळून आले आहेत.
Wrinkled Frogs (Genus - Nyctibatrachus)
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात पावसाळ्यात जे झरे वाहतात, त्या झर्यांमध्ये दिसणारा हा बेडूक. या प्रजातीच्या तीन जाती महाराष्ट्रात आढळतात. या बेडकाचा नर वाहणार्या झर्यांच्या वर असणार्या फांद्या, मोठी पाने किवा झर्यातील मोठे दगड यांच्यावर बसून आवाज देतो. जिथे नर आवाज द्यायला बसतो तिथेच आकाराने थोडी मोठी व संख्येने कमी अशी पारदर्शक अंडी घातली जातात. या अंड्यांमधून बाहेर येणार्या ’ढरविेश्रशी’ झर्यातील पाण्यात पडतात व पुढील जीवनचक्राला सुरुवात करतात.
Malabar Gliding Frog
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात पावसाळ्यात झाडावर राहणारा, हिरव्या रंगाचा हा बेडूक. रात्रीच्या वेळी नर झाडांच्या फांद्यांवर बसून आवाज देतात. आवाजाने मादी आकर्षित झाल्यावर नर तिच्या पाठीवर बसतो. अंडी घालण्याआधी नर व मादी पायाने झाडाची पाने ओढून घेतात. एकत्र केलेल्या पानांना घरट्याप्रमाणे रूप येते. जंगलातील डबक्यांच्यावर असणार्या झाडांची पाने एकत्र करून त्यामध्ये मादी अंडी घालते. अंड्यातून वाढ झालेल्या ’ढरविेश्रशी’ खाली असणार्या डबक्यात पडतात व पुढील जीवनचक्र पूर्ण करतात. या बेडकांच्या बोटांमध्ये त्वचेचा मोठा पडदा असतो, एका झाडावरून दुसर्या झाडावर जाताना ग्लायडरप्रमाणे या पडद्याचा उपयोग होतो.