‘मृणालिनीताई’ नावाचे पर्व...

29 Oct 2022 20:39:18
joshi 2

ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे वयाच्या 95व्या वर्षी गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. स्वा. सावरकरांसोबत त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. त्यांनी लिहिलेली ‘अवध्य मी! अजिंक्य मी!!’ ही कादंबरी, ‘राष्ट्राय स्वाहा’, ‘मुक्ताई’, ‘वेणास्वामी’, ‘आनंदाचे डोही आनंदतरंग’, ‘श्री शिवगोरक्ष’, ‘श्री माँ शारदामणी’ अशी अनेक पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मृणालिनी जोशी यांच्या निकटवर्तीय विनया मेहेंदळे यांनी या शब्दसुमनांजलीतून उलगडलेले ‘मृणालिनीताई’ नावाचे पर्व...



 ही गोष्ट आहे 70च्या दशकातली! महाराष्ट्रातली एक तरुण आणि सुस्वरुप स्त्री पंजाबमधल्या एका खेड्यात संध्याकाळी जाऊन पोहोचली. हुतात्मा भगतसिंग यांच्या मातोश्री विद्यावतीदेवी यांना भेटायचं होतं. पत्रव्यवहारही झाला होता. पण, गाव नवं, प्रांत नवा, भाषा वेगळी. अशा ठिकाणी पत्ता विचारल्यावर त्या बाहेरगावी गेल्याचं समजताच डोळ्यापुढे मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. आता?? पण, आपण करत असलेल्या कामावर निष्ठा होती. त्याचबरोबर या कामी परमेश्वर पाठीशी उभा राहणार, हा विश्वासही होता. विद्यावतीदेवींच्या घराशी पोहोचताच त्या दारातच भेटल्या आणि “तू येणार म्हणून लगेच परत आलेस” अशा शब्दांत स्वागत झालं आणि भगतसिंगांच्या घराला मराठी माहेरवाशीण मिळाली! हा प्रसंग मृणालिनीताई जोशी यांच्या तोंडून ऐकताना अंगावर शहारा आला होता. मृणालिनी जोशी अत्यंत सात्त्विक, सोज्वळ आणि तितकंच तेजस्वी असं व्यक्तिमत्त्व!



मृणालिनीताई भाग्यवानच! अगदी लहान वयात त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहवास लाभला. त्याचं घर शेजारीच होतं; त्यामुळे त्यांचा त्या घरात मुक्त वावर असायचा. हा ॠणानुबंध शेवटपर्यंत कायम होता. त्यामुळे मृणालिनीताईंकडून त्यांच्या आठवणी ऐकताना वेगळ्याच सावरकरांचं दर्शन होत असे. एक आठवण त्या नेहमी सांगत.





सावरकरांच्या उत्तरायुष्यात त्या भेटायला गेल्या होत्या. तेव्हा ते म्हणाले, ’‘चल बागेत फिरु या.” आणि मग फिरताना ते वेलीला, फुलाला हळूवारपणे हात फिरवायचे. मृणालिनीताईंनी विचारलं,’‘तात्या, हे काय?” ते म्हणाले, ‘’अगं, अंदमानामध्ये असताना आयुष्यात ही फुलं- पानं कधी दिसतील तरी का, असं वाटायचं. आज मी ते अनुभवतोय.” प्रखर तेजस्वी क्रांतिकारक सावरकर हे तितकेच कविमनाचे हळवे होते, हे त्या आवर्जून सांगत.




याच प्रेरणेतून, संस्कारांतून मृणालिनीताईंनी ‘इन्कलाब’ कादंबरी लिहिली. त्यासाठी अपार परिश्रम घेतले. एका ध्यासानं पछाडल्यावर मग कुठलेच अडसर वाटेत येत नाहीत, याचा अनुभव घेतलेल्या मृणालिनीताई इतक्या समरस झाल्या की, त्या क्रांतिकारकांपैकीच एक झाल्या आणि त्यांच्या लेखणीनंही तो अनुभव वाचकांनाही दिला.





joshi 3



‘इन्कलाब’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्यांनी वनवास पत्करले, यमयातना सोसल्या, वधस्तंभावर चढून मृत्यूला मिठी मारली, त्या ज्ञात-अज्ञात महाभागांचा स्वतंत्र भारताला विसर पडला. किंबहुना, त्यांच्या कार्याविषयी गैरसमज पसरवला गेला. या माणसांना पिस्तुलं, बॉम्ब उडवायची हौस नव्हती, पण बहिरी राजसत्ता असल्यानं स्फोट घडवावे लागले. ही माणसं गुन्हेगार नव्हती, उलट मनानं, वृत्तीनं कवी होती. स्वतंत्रतेच्या ध्यासासाठी अस्थींचा कुंचला करून रक्तरंगानं त्यांनी स्वप्नं चित्रीत केली. मृणालिनीताईंनी हे तरुणांना या पुस्तकाद्वारे सांगितलं.




मृणालिनीताईंनी त्यानंतर अनेक पुस्तके लिहिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ’अवध्य मी अजिंक्य मी’, 1857चे स्वातंत्र्यसेनानी कुंवरसिंह राणांवर ‘रक्तकमल’, ‘सूर्यमुखी’ ही मोजकी उदाहरणे! याच मालिकेतलं अतिशय गाजलेलं पुस्तक म्हणजे ‘राष्ट्राय स्वाहा!’राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. मा. स. तथा गोळवलकर गुरुजींच्या जीवनावरील ही कादंबरी वाचताना जे गुरुजींना भेटले आहेत किंवा ज्यांनी त्यांना बघितलंय, त्यांना पुनःप्रत्ययाचा अनुभव येतो.पण, गुरुजींना त्या कधीच भेटल्या नव्हत्या, हे पटतच नाही. कलाकाराचा परकायाप्रवेश म्हणजे काय, याचं हे उत्तम उदाहरण!



मृणालिनीताई राष्ट्र सेविका समितीच्या सेविका! समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका व सरस्वतीबाई तथा ताई आपटे यांचं चरित्रलेखन त्यांनी करायचं ठरवलं, तेव्हा त्या परिवारातल्या सर्वांना भेटल्या. ताईंची नात म्हणून मीही त्यांना भेटले. त्यातून निर्माण झालेल्या ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या पुस्तकाच्या आवृत्त्या तर निघाल्याच, पण त्याची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरेही प्रसिद्ध झाली. ताईंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी लिहिलेल्या ‘वैष्णवीव्रती’ या पुस्तकाला अतिशय जिव्हाळ्यानं प्रस्तावनाही लिहून दिली.



मृणालिनीताई जितक्या हळव्या तितक्याच निग्रहीही होत्या. उत्तरायुष्यात त्यांच्या विचारधारेनं अध्यात्ममार्ग स्वीकारला. वैयक्तिक आयुष्यात त्यांनी वानप्रस्थाश्रम अवलंबला. स्वतःच्याच घरात एका खोलीत त्या स्वतंत्रपणे राहून त्यांनी लिखाण, साधना याला पूर्णपणे वाहून घेतलं. ‘प्रपंचापासून अलिप्त राहा’ सांगणं सोपं, पण कृतीत उतरवणं महाकर्मकठीण! पण, तेही त्यांनी केलं. पण, कठोरपणे नाही, तर प्रेम, जिव्हाळा कायम राखून!



याही मार्गात त्या भाग्यवान होत्या. स्वामी स्वरुपानंदांच्या त्या भगिनी होत्या. अनेक साधुसंतांना त्या भेटल्या होत्या. त्यांची साधना होतीच आणि त्यामुळे त्यांचा या मार्गातला अधिकारही मोठा होता. त्यांनी नंतर वेणास्वामी, मुक्ताबाई, स्वामी स्वरुपानंदांवर ‘अमृतसिद्धी’, श्रीमती शारदामणी, पू शंकर महाराजांवर ‘शंकरलीला’, गोरक्षनाथांवर ‘शिवगोरक्ष’ अशी अनेक पुस्तके लिहिली



 
एवढी मोठी ग्रंथसंपदा असूनही त्या साहित्यिक मेळ्यापासून अलिप्तच राहिल्या. पुरस्कार, प्रसिद्धीची लालसा त्यांना कधीच नव्हती.मी त्यांना अधूनमधून भेटायला जात असे. त्यांना भेटल्यावर, त्यांच्याशी बोलल्यावर एक प्रकारचं समाधान तर मिळायचं, पण प्रेरणाही मिळे. कधी ध्यान कसं लावायचं तर कधी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, कधी कर्माचा सिद्धांत अशा विविध विषयांवर त्या बोलत असत.




त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं कळलं होतं, तेव्हा नुसतं भेटावं म्हणून चार महिन्यांपूर्वी मी, माझ्या मैत्रिणी शुभदा जोशी आणि प्रतिमा कुलकर्णी आम्ही गेलो होतो. त्या खूप थकल्या होत्या. आवाजही खोल गेला होता. पण, विविध विषयांवर त्या अगदी भरभरून बोलल्या. आम्ही भारुन गेलो होतोच, पण एकेक शब्द मनात साठवत होतो. निघताना म्हटलं, ‘’आता परत तुमची प्रकृती सुधारल्यावर भेटू.” तेव्हा मात्र त्यांनी निग्रहानं सांगितलं, ‘’आता अजिबात भेटायचं नाही. हे शरीर लाकडासारखं होतंय. हातातली बांगडी दंडापर्यंत जातेय.” हे ऐकल्यावर खचायला झालं. ‘अंतर्मनानंही शेवटची भेट’ असा संकेत दिला. जड अंतःकरणाने घरी आले आणि त्या बोलल्या ते आठवून डायरीत लिहून काढलं.



जे आहे त्याला सामोरं जाणं आणि आपली कर्तव्यकर्म करणं, हेच आपल्याला करता आलं पाहिजे.स्वतःचा निष्पक्षपातीपणे विचार केला, तर गुण-दोष आपोआप कळतात त्यातून आपणच सुधारायला हवं.उगीच पारायणं करत बसण्यापेक्षा श्लोक ओवीवर चिंतन करावं. उगीच ही जागा, ती वेळ अशा कर्मबंधात अडकू नये. ‘एकोहम् बहुस्याम्’ हा मंत्र लक्षात ठेवावा.

‘मृणालिनीताई’ हे पर्व काळाच्या पडद्याआड गेलं खरं. पण, आमच्या अंतःकरणात त्या चिरंजीव आहेत.
-विनया मेहेंदळे


Powered By Sangraha 9.0