"काही लोक बांधावर जातात जाऊद्या, मी सगळ्यांना कामाला लावलं!"

29 Oct 2022 16:36:15
eknath


नंदुरबार
: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदुरबार दौऱ्यावर असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न तापलेला असताना उद्धव ठाकरे यांनी याच आठवड्यात औरंगाबादचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पहाणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.



नंदुरबार नगरपरिषद इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात नंदुरबारचा रखडलेला सात कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला आहे. या सोहळ्यात बोलताना शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. “जून, जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदतीचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी जमा करण्यात आले आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्याचेही आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचं प्रोत्साहन अनुदान सरकारकडून देण्यात येत आहे. सरकारने तीन महिन्यात ७२ निर्णय घेतल्याचं सांगताना ४०० जीआर काढले." अशी माहिती शिंदेंनी यावेळी बोलताना दिली.


दरम्यान, शिंदे म्हणाले की, "काही लोक बांधावर जातात जाऊद्या, मी सगळ्यांना कामाला लावलं. आम्ही सत्तेत येण्यापूर्वी विकासाची गती मंदावली होती. सत्ता येताच विकासाला चालना दिली. तीन महिन्यांपूर्वी जनतेच्या मनातील सरकार आलं. आमचं सरकार आल्यानंतर पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झाले. सरकारकडून विकासाला गती देण्याचं काम झालं. गेल्या तीन महिन्यांमध्ये आम्ही अनेक मोठे निर्णय घेतले. आम्ही शेतकरी हाच केंद्रबींदू माणून काम करत आहोत. आतापर्यंत आम्ही नुकसानग्रस्तांना 6 हजार कोटींची मदत दिली." असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0