पाकिस्तानातील कापड उद्योगाची फाटकी दशा...

27 Oct 2022 19:45:12
cotton


एकीकडे भारतात दिवाळीनिमित्त कापड उद्योगामध्ये प्रचंड मोठी उलाढाल पाहायला मिळाली, तर दुसरीकडे शेजारी पाकिस्तानात मात्र महापुरामुळे कापड उद्योगाचे कंबरडे पुरते मोडले आहे. त्यानिमित्ताने पाकिस्तानातील कापड उद्योगाची झालेली फाटकी दशा मांडणारा हा लेख...
यंदाच्या वर्षी पाकिस्तानात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात जवळपास सर्वच क्षेत्रांचे अतोनात नुकसान झाले. विशेषत: मोठ्या प्रमाणात पिके जमीनदोस्त झाल्यामुळे पाकिस्तानची अन्नसुरक्षाही धोक्यात आल्याचे चित्र आहे. पाकिस्तानातील सर्वात मोठ्या नगदी पिकांपैकी एक म्हणजे कापूस. तसेच, या कापसावर अवलंबून असलेल्या आणि तेथील सर्वात मोठा उद्योग मानल्या जाणार्‍या कापड उद्योगालाही या महापुराने पूर्णपणे उद्ध्वस्त केले. कापसाच्या नुकसानीमुळे प्रभावित झालेल्या कापड उद्योगामुळे एकूणच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही क्षेत्रांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


नुकत्याच आलेल्या भीषण पुरामुळे पाकिस्तानचा तब्बल एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला. 1 हजार, 600 हून अधिक लोकांचा या महापुरामुळे मृत्यू झाला. तसेच, देशातील एकूण कापसाच्या पिकापैकी सुमारे 35 टक्के कापूस पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले. त्यातच पाकिस्तानवर कर्जाचा सतत वाढत जाणारा बोजा, रुपयाची वारंवार होणारी घसरण आणि त्यातच कमालीच्या वाढलेल्या महागाईमुळे, या देशाचे एकंदरच आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे आणि चलनसाठाही दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तेथील ‘जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे बाजारात आलेली अनपेक्षित मंदी आणि चांगल्या प्रतीचा कापूस न मिळाल्याने अनेक गिरण्यांचे टाळे तात्पुरते का होईना, पण बंद करावे लागले आहे.

कापूस, जे पाकिस्तानमधील सर्वात मोठे नगदी पीक आहे, त्याचे उत्पादन येथील अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. कापसाचे उत्पादन क्षेत्र विशेषकरून बलुचिस्तानच्या अंतर्गत भागापासून ते मर्दान खोर्‍याच्या उंच प्रदेशापर्यंत पसरलेले आहे. पण, कापसाचे मुख्य उत्पादन क्षेत्र म्हणून पाकिस्तानातील पंजाब प्रांताकडेच बघितले जाते. एकटा पंजाब प्रांत पाकिस्तानातील एकूण कापूस उत्पादनापैकी सुमारे 70 टक्के उत्पादन घेतो. त्यापैकी सुमारे 95 टक्के वाटा या प्रांतातील केवळ 14 जिल्ह्यांचा आहे. पंजाबचा ‘कापूस पट्टा’ म्हणून ओळखला जाणार्‍या या प्रदेशाने भात आणि ऊस या स्पर्धात्मक पिकांना मागे टाकत, या भागातील सर्वात मोठ्या कापूस पिकाची जागा घेतली आहे.


cotton 1


पाकिस्तानातील कापूस उत्पादनाचे हे केंद्र भौगोलिकदृष्ट्या सिंधू खोर्‍याच्या मध्यभागी स्थित आहे. पंजाबच्या पश्चिम सीमेजवळील मियांवली आणि भाक्करपासून सुरू होऊन आग्नेयेला साहिवाल आणि बहावलनगरपर्यंत आणि दक्षिणेला राजनपूरपर्यंत हे कापूस लागवडीचे क्षेत्र पसरलेले आहे.

पाकिस्तान हा जगातील पाचवा सर्वांत मोठा कापूस उत्पादक आणि कच्च्या कापसाचा तिसरा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. तसेच, कापसाचा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक आणि सुती धाग्याचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार म्हणूनही पाकिस्तानकडे बघितले जाते.

पाकिस्तानमधील सुमारे 13 लाख शेतकरी 30 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये कापसाची लागवड करतात, जी देशाच्या एकूण लागवडीयोग्य जमिनीच्या 15 टक्के आहे. कापूस आणि कापूस उत्पादने पाकिस्तानच्या ‘जीडीपी’मध्ये दहा टक्के आणि देशाच्या एकूण परकीय चलनाच्या कमाईत 55 टक्के इतके भरीव योगदान देतात. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये उत्पादित होणारा कापूस आणि त्याच्या उत्पादनांचा देशांतर्गत वापरामध्येही 30 ते 40 टक्के वाटा आहे. उर्वरित कच्चा कापूस, सूत, फॅब्रिक आणि तयार वस्त्रांच्या स्वरूपात निर्यात केला जातो.



कापूस उत्पादन हा पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्राचा आधार आहे. कापसावर प्रक्रिया करण्यापासून ते त्याच्या विविध उत्पादनांच्या निर्मितीपर्यंत उद्योगांचे मोठे जाळे पाकिस्तानमध्ये विणले गेले आहे. आज पाकिस्तानमध्ये सुमारे 400 कापड गिरण्या, 70 लाख स्पिंडल्स, 27 हजार यंत्रमाग गिरणी क्षेत्रात (15 हजार शटललेस लूम्ससह), 2 लाख, 50 हजार यंत्रमाग, नॉन-मिल सेक्टरमध्ये, 700 निटवेअर युनिट्स, चार हजार गारमेंट युनिट्स आणि फिनिशिंग युनिट्स
आहेत. (प्रतिवर्ष 12 कोटी चौरस मीटर शुद्धीकरण क्षमतेसह), सुमारे एक हजार जिनिंग युनिट्स, कापूस बियाण्यांपासून तेल काढण्यासाठी सुमारे 300 युनिट्स, तसेच असंघटित क्षेत्रातील 15 हजार ते 20 हजार देशी, लहान प्रमाणात तेल काढण्याचे कारखाने येथे पाहायला मिळतात. या आकडेवारीवरून असे दिसून येते की, हा प्रदेश पाकिस्तानमधील इतर कोणत्याही आर्थिक क्षेत्रापेक्षा अधिक महत्त्वाचा आणि तितकाच संपन्न देखील आहे.

पाण्याची दिवसेंदिवस कमी होणारी भूजल पातळी आणि परिणामी सतत वाढत जाणारी पाणीटंचाई, हे पाकिस्तानमधील कापूस उत्पादनासाठी एक मोठे संकट ठरले आहे. पाकिस्तानच्या शेतजमिनीच्या वापराच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, पाकिस्तानचे बहुतांश कापूस उत्पादन लहान शेतजमिनीतून होते, ज्यापैकी 85 टक्के शेतजमीन ही दहा हेक्टरपेक्षा खूपच लहान आहे. हेही इथे लक्षात घेतले पाहिजे की, लहान शेतकरी हे तुलनेने मोठ्या उत्पन्नाची पिके घेण्यासही असमर्थ ठरतात, ज्याचा एक महत्त्वपूर्ण नकारात्मक परिणाम उत्पादनाच्या अस्थिरतेत दिसून येतो.


दुसरीकडे तापमानात झालेली मोठी वाढ आणि पर्जन्यमान घटल्याने कापसासाठी घातक संयोग निर्माण होत आहे. साधारणपणे, कापूस वाढीसाठी इष्टतम तापमान हे 28.5 ते 35 अंश सेल्सिअस असते. परंतु, कापूस पिकाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पाकिस्तानमधील या भागांचे तापमान हे साधारण 41 ते 47 अंश सेल्सिअस दरम्यान असते. नवाबशाहसारख्या ठिकाणी तर हे तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे, जे केवळ पिकासाठीच नाही, तर मानवाच्या आरोग्यासाठी, अस्तित्वासाठीही तितकेच घातक आहे.


तसेच यावर्षी कापूस उत्पादनात घट होण्यामागे पाकिस्तानातील महापूर हे प्रमुख कारण आहे. जुलैमध्ये सुरू झालेल्या पाकिस्तानच्या नवीन आर्थिक वर्षातील कापूस उत्पादन 11 दशलक्ष गाठींच्या उद्दिष्टापासून 6.5 दशलक्ष गाठी (प्रत्येकी 170 किलो) इतके कमी अंदाजित केले आहे.


उत्पादनातील या तीव्र घसरणीचा परिणाम असा होऊ शकतो की, पाकिस्तानला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्राझील, तुर्की, अमेरिका, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका आणि अफगाणिस्तान या देशांमधून कापूस आयात करण्यासाठी सुमारे तीन अब्ज खर्च करावे लागतील. त्याचबरोबर पाकिस्तानची सर्वात महत्त्वाची निर्यात वस्तू म्हणून सुती कापडाच्या स्थितीलाही मोठा फटका बसू शकतो. कारण, निर्यातीसाठी योग्य असलेली पाकिस्तानची कापड उत्पादन क्षमता जवळपास 30 टक्के कापूस आणि उर्जेच्या कमतरतेमुळे मागे पडली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला, जे आपल्या उत्पादनापैकी जवळपास 60 टक्के निर्यात करते, देशांतर्गत क्षेत्रातही तोटा सहन करावा लागू शकतो.


आयातीमुळे आधीच वाढलेल्या कपड्यांच्या किमती, कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारपेठेत अपुरी आणि सरासरीपेक्षा कमी मागणी, यामुळे कापडाच्या उच्च किमतींमुळे देशांतर्गत नुकसान होऊ शकते. त्यामुळे या उद्योगासाठी तेथील प्रांतीय आणि केंद्र सरकार आगामी काळात नेमक्या काय उपाययोजना करते, त्यावर या उद्योगाचे
भवितव्य सर्वस्वी अवलंबून आहे.



-एस. वर्मा
(अनुवाद : विजय कुलकर्णी)
Powered By Sangraha 9.0