परवाच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथे एक तासाचा धावता दुष्काळ पाहणी दौरा केला. अडीच वर्षांनंतर घराबाहेर अर्थात मुंबईबाहेर पडून महाराष्ट्रात काय सुरू आहे, याची वरवरची पाहणी करण्याचे कष्ट उद्धव ठाकरेंनी घेतले, यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच!
‘व्हीव्हीआयपी’ सुरक्षा, दौर्यासाठी बनवावा लागणारा माहौल आणि शेतकर्यांचे खरे अश्रू यामुळे ठाकरे शेतकर्यांची वेदना जाणून घ्यायला आणि त्यावर निराकरण करायलाच जणू बांधावर पोहोचलेत, अशी एक प्रतिमा माध्यमांकडून रंगवण्यात आली होती. पण, एक साधा आणि सरळ प्रश्न असा की, ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना बांधावर यायला कुणी अडवलं होतं? अडीच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात अपवादात्मक कोकणचा एक दौरा तो ही अवघ्या तासाभरात उरकलेला, पंढरपूरची एक वारी हे असे काही अपवाद सोडले, तर ठाकरे ‘मातोश्री’च्या बाहेर पडलेच नाही आणि आता सत्ता गेली तर त्यांना थेट शेतकर्यांचा बांध आठवला आहे, त्याचा आसूड आठवला आहे. असो. त्यात नावीन्य काहीच नाही.
भाजपचा प्रभाव आणि मोदींच्या करिष्म्यावर ठाकरेंच्या सेनेने जिंकलेल्या 56 जागा आणि त्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उठवत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीस्वतःच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ कशी पडेल, याची व्यवस्थित काळजी घेतली. अखेरीस बर्याच काथ्याकूट झाल्यावर महाविकास आघाडी या कडबोळ्याचे ते मुख्यमंत्री बनले. पण, तेव्हापासून त्यांचा सर्वसामान्य शिवसैनिक आणि महाराष्ट्राशी असलेला ‘कनेक्ट’ तुटला आणि त्याची परिणती ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद जाण्यात झाली.
वास्तविक, ठाकरे हे काही शेतीची माहिती असणारे किंवा ग्रामीण भागातील बारीकसारीक आणि महत्त्वाचे तपशील माहीत नसलेले आणि तो जाणून घेण्यात स्वारस्यही नसलेले राजकीय घराणे. त्यांचे लक्ष शहरी भाग आणि शहरीकरणाशी संबंधित विषय हाच होता आणि त्यातच त्यांना काय ते स्वारस्य. त्यामुळे कधी शेती न करणारे, शेतीत न उतरणारे, न समजणारे, पण निवडणूक आणि राजकीय संधी मिळताच शेतकरी असल्याचा आव आणणार्या या शहरीबाबूने संभाजीनगरमध्ये मारलेला हा सुपरफास्ट फेरफटका केवळ राजकीय स्टंट होता, हे वेगळे सांगणे नकोच.
हम नहीं सुधरेंगे!
एका व्यक्तीच्या हातून जर काही गडबड झाली, तर त्याला आपण चूक झाली म्हणून दुर्लक्षित करू शकतो. दुसर्या वेळी जर त्याच व्यक्तीकडून त्याच चुकीची पुनरावृत्ती झाली तर अपवादात्मक परिस्थितीत आपण माफही करू शकतो. पण, जर तीच व्यक्ती एकच चूक वारंवार करत असेल, तर त्याला चूक नाही मूर्खपणा किंवा अपराध संबोधित करणे उचित ठरते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना हा नियम चपखलपणे लागू होतो. शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर बंडखोरांनी केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंची कार्यशैली आणि कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क यावर मुख्यत्वे आघात केले होते. ’मातोश्री’मध्ये आम्हाला येऊ दिलं जात नाही, ‘वर्षा’वर आम्हाला भेट मिळत नाही, ठाकरे आमचं ऐकत नाहीत, अशा असंख्य तक्रारी आमदारांकडून करण्यात आल्या होत्या. तक्रार करणार्या आमदारांना ‘गद्दार’ म्हणून आपल्या अपयशाला झाकण्याचा तोकडा प्रयत्न ठाकरेंनी केला, पण तोही आता फोल ठरताना दिसत आहे.
शिवसेनेतील बंडानंतर शिंदे ठाकरेंमध्ये भरतमिलाप करण्यासाठी अवास्तव मोठेपण मिरवणार्या आणि ठाकरेंशी एकनिष्ठ राहण्याच्या घोषणा करणार्या दीपाली सय्यद या कथित कडवट हिंदुत्ववादी ठाकरे गटाच्या महिला नेत्याने ठाकरेंवर आणि ‘मातोश्री’वर गंभीर आरोप केले आहेत. ‘मातोश्री’वर आपला आवाज दाबला गेल्याची तक्रार करत त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचे सूतोवाचही केले आहेत. तसेच, ठाकरेंनी सत्ता गेल्यावर महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा सत्ता असताना जर केला असता तर ही वेळच आली नसती असा थेट आरोप केला आहे.
साडेतीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत झालेल्या उद्रेकाचा लाव्हारस अडीच वर्षांपासून पोटात उसळत होता, पण त्याला कट्टर शिवसैनिक आमदारांनी पक्षनिष्ठेच्या बंधनामुळे सहन केलं होतं. पण, जेव्हा सहनशीलतेचा अंत झाला, तेव्हा आमदारांनी कडेलोट करत नेतृत्वावरच तोफ डागली आणि बंडाचे निशाण फडकविले होते. पण, दीपाली सय्यद असोत व इतर कुणी, ही मंडळी मुळात शिवसैनिक नसून पक्षांतराच्या कोलांटउड्या मारून आलेले नेते आहेत. त्यामुळे 40 आमदार आणि 12 खासदारांच्या पाठोपाठ सय्यद आणि इतर मंडळी एकच कारण देऊन ठाकरेंना सोडत असूनही ठाकरेंचा होरा ‘हम नहीं सुधरेंगे’ असाच कायम आहे, जो ठाकरे गटाला लयास न्यायला कारणीभूत ठरणार आहे.