खंडग्रास सूर्यग्रहणाच्याच दिवशी व्हॉट्सअॅपला लागलेले ग्रहण जगभरातील कोट्यवधी ‘युझर्स’साठी डोकेदुखीचे कारण ठरले. जगातील प्रमुख संदेशवाहक अॅप म्हणून ओळख असलेल्या व्हॉट्सअॅपची सेवा अशी गटांगळ्या खाईल यावर कुणाचाही विश्वास बसेना. मंगळवार, दि. 25 ऑक्टोबर दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास अचानक व्हॉट्सअॅप डाऊन झाल्याची बातमी धडकली. पण, तत्पूर्वी अनेकांनी आपले मोबाईल, इंटरनेट चालू-बंद करून पाहिले. अखेर बंद झाल्याच्या वृत्तानंतर सर्वांची खात्री पटली.
दीड तासानंतर दुपारी 2 वाजून 6 मिनिटांनी सेवा पूर्ववत झाली आणि व्हॉट्सअॅपची सेवा पूर्ववत झाली. पण, नेमकी काय गडबड झाली याबद्दल केंद्र सरकारनेही तातडीने कंपनीकडे अहवाल मागविला. भारतात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये अशीच स्थिती आली. जगभरात दोन अब्ज युझर्स असणार्या व्हॉट्सअॅपने अशा प्रकारे नांगी टाकल्याने प्रत्येक युझर्सची कामे अडकून पडली होती. या सगळ्या घडामोडींनंतर आपले अशा अॅप्सवर असलेले अवलंबित्व पुन्हा लक्षात आले.
किंबहुना, ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आपल्या दैनंदिन वापराशिवाय व्यावसायिक कामांसाठीही व्हॉट्सअॅपवर असलेले अवलंबित्व काहीअंशी वाढलेलेच आहे. सुरुवातीच्या काळात ‘अॅण्ड्रॉईड’ प्रणाली विकसित झाली नव्हती तेव्हा फक्त मोजक्या लोकांच्या हातात असणार्या या अॅपने अवघ्या काही वर्षांत लोकप्रियता मिळवली. चीनसारख्या देशात बंदी असतानाही ‘व्हीपीएन’द्वारे दोन कोटी लोक या अॅपचा वापर करत असल्याची आकडेवारी आहे. 2010 मध्ये हे अॅप भारतात आले. त्यानंतर आजपर्यंत 40 कोटींहून अधिक ‘युझर्स’ची नोंद आहे, तर जगभरात व्हॉट्सअॅपचे तब्बल दोन अब्ज युझर्स आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्ग असणार्या या ‘जाएंट’ कंपनीचा ‘सर्व्हर’ बंद पडला तर काय किती मोठा गोंधळ होईल, याची कल्पना यावरुन आलीच असेल. गेल्या वर्षीही 4 ऑक्टोबर रोजीच सहा तास व्हॉट्सअॅप ठप्प झाले होते. या प्रकाराने भांडवली बाजारात कंपनीचे समभागही गटांगळ्या खाऊ लागले होते. व्हॉट्सअॅपवरील संदेशवहनाच्या गोपनीयतेबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते.
तसेच, चॅट्सचा वापर करून संबंधित जाहिराती देण्याबद्दलचा विचारही कंपनी करत होती. मात्र, याचा उलटा फटका कंपनीला बसू लागला. अनेकांनी हा मंच सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण, कालांतराने कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातबाजीनंतर त्यानंतर कुठे कंपनीचे गाडी रुळावर आली. व्हॉट्सअॅपच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, त्याचे उत्तर भविष्यातील व्हॉट्सअॅपच्या रणनीतीवर अवलंबून आहे. या सगळ्यात आपल्याला अॅपवर अवलंबून असण्याची सवय अशावेळी चिंताजनक आहे. व्हॉट्सअॅपला पर्याय काय, असा प्रश्न ज्यावेळी येतो तेव्हा इतर सोशल मीडिया संदेशवाहक अॅपची नावेही पुढे केली जातात. मात्र, ती खरेच तितकीशी प्रभावी आहेत का? व्हॉट्सअॅपला हद्दपार करणे आता आपल्याला शक्य आहे का? ज्या चीनमध्ये व्हॉट्सअॅपवर अधिकृतरित्या बंदी आहे, तिथेही दोन कोटी ‘युझर्स’ व्हॉट्सअॅपकडे आहेत. अशा कंपन्यांच्याच हातीच खर्या अर्थाने प्रत्येकाच्या नाड्या असतात. उदा. द्यायचे झाले, तर ‘मेटा’ या कंपनीकडे फेसबुक, इन्स्टाग्रामसह व्हॉट्सअॅप या तिन्ही अॅपचे स्वामित्व आहे. त्यामुळे जेव्हा कधीही त्या कंपन्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा या कंपन्यांचा निर्णय ‘युझर’ म्हणून आपल्यालाही मान्यच करावा लागेल.
तसेच अशा कंपन्यांच्या सरकारांनी त्यांना बंधनकाराक केलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही कंपन्यांना करावी लागेल. उदा. ‘पब्जी’ आणि ‘बीजीएमआय’ या दोन कंपन्यांच्या सर्व्हरवरुन होत असलेल्या डेटाचोरीमुळे एकाएकी भारताला बंदी घालावी लागली होती. डेटाचोरी मुद्दा तर वेगळा, पण ज्यावेळी भूमिका घेण्याची वेळ येईल तेव्हाही या कंपन्या अमेरिकेच्याच बाजूनेच उभ्या राहतील. असा फटका बसलेला देश म्हणजे रशिया. युक्रेन-रशिया युद्धात अमेरिकेने विरोधात भूमिका घेतल्यानंतर गुगलसह बड्या कंपन्यांनी सेवा देण्यास नकार दिला किंवा बंधने लादली. परिणामी कामकाज ठप्प झाले. भविष्यात अशी वेळ कधी आपल्याबाबत झाली तर काय होईल़? याचा हा ‘टीझर’ तर नाही ना? त्यामुळे अशा अॅप्सवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नेमकं काय केलं जाऊ शकतं याचा विचार होणे गरजेचे आहे.