स्वतः गायक असलेल्या, ‘स्वरांजली’ संस्थेच्या माध्यमातून संगीत कार्यक्रम करणार्या आणि इतरही कलाकारांना प्रोत्साहन देणार्या राजेश कुलकर्णी यांच्याविषयी...
आम्ही छान गाता’ असे कौतुक हौशी कलाकारांचे होत असते. पण या कलाकारांना अनेक कारणांमुळे आपली कला जोपासता येत नाही. त्यामुळे हे कलाकार आपली कला हरवून बसतात. अशा पुष्कळ लोकांना पुन्हा उमेद देणारी व्यक्ती म्हणजे राजेश कुलकर्णी. राजेश यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
राजेश यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकचे. त्यांचा जन्म हुबळी येथे झाला. नोकरीनिमित्त त्यांचे वडील गुरूराज कुलकर्णी मुंबईत आले. ते रासायनिक कंपनीत काम करत होते. नोकरी करत असतानाच त्याठिकाणी एक अपघात घडला. त्या अपघातानंतर त्यांच्यावर काम करण्यासाठी बंधने येऊ लागली. त्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. राजेश यांची आई छाया या मुलुंड येथील कन्नड शाळेत कार्यरत होत्या. राजेश यांच्या वडिलांनी नोकरी सोडल्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी त्यांच्या आईवर आली. राजेश व त्यांची बहीण संगीता या दोघांचेही आई काम करत असलेल्या शाळेतच शिक्षण होत होते. आईसोबतच ते सकाळी मुलुंडला जात असत. शाळा संपल्यावर तिकडेच थांबून आईसोबत पुन्हा डोंबिवलीला परत येत असत. राजेश यांच्या आई संगीतात पारंगत आहेत. कलेचा हा वारसा त्यांच्या आईकडून राजेश यांच्याकडेदेखील आला. एके दिवशी राजेश गाणे गुणगुणत होते. ते गाणं संगीताच्या मैत्रिणीने ऐकले. तिने राजेश उत्तम गात असल्याचे सांगितले.
राजेश यांचे महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे झाले. त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण घेतले. इंजिनिअरिंग करीत असताना ते नेहमी अव्वल येत असत. त्यांच्या या हुशारीमुळेच त्यांना शिक्षण पूर्ण होताच नोकरी देण्याचे आश्वासन मिळाले होते. त्यानुसार उत्तम गुण मिळाल्याने शिक्षण पूर्ण होताच त्यांना नोकरी मिळाली. कौटुंबिक जबाबदारी आईवर असल्याने लवकरात लवकर नोकरी मिळविणे त्यांच्यासाठी गरजेचे होते. ज्ञान आणि कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी मार्केर्टिंगमध्ये जम बसवला. हनसल या कंपनीमध्ये त्यांनी काम केले आहे. अविश्रांत मेहनत, प्रामाणिकपणा आणि व्यवसायातील सखोल माहिती या आधारावर ते कंपनीत अध्यक्षपदापर्यंत पोहोचले. व्यवसायाच्या निमित्ताने ते देश-विदेशात भ्रमण करत असतात. वयाच्या 15व्या वर्षी त्यांच्यावर मायकल जॅक्सनचा प्रभाव पडला.
‘नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या ‘स्कील फॉर ग्रीन जॉब कमिटी’चे ते अध्यक्ष झाले. तसेच सौरऊर्जातज्ज्ञ म्हणून त्यांची ‘इंडिया रिजनल मॅनेजर’ म्हणून नेमणूक झाली. व्यवसायात यश मिळत असतानाच त्यांनी आपला गाण्याचा छंद जोपासला. लहानपणी आईने गायलेली गाणी त्यांनी ऐकली होती. भजनेही ऐकली होती. राजेश यांनादेखील गाण्यात रस होता. आईकडून मला गोड गळा मिळाला, असे राजेश सांगतात.राजेश हे स्वतः दर्जेदार गायक आहेत. किशोर कुमारची गाणी ते चांगली गातात. शिवाय मोहम्मद रफी, सुरेश वाडकर, सोनू निगम, आर. डी. बर्मन यांच्या गाण्याची छापही त्यांच्या गाण्यात दिसून येते. त्यांची पत्नी मीनल हीदेखील चांगली गायिका आहे. त्यांची दोन्ही मुले त्यांना साथ देतात. त्यांचा एक मुलगा बारावीनंतर संगीत महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. राजेश यांचे गायक मित्र विशाल, विवेक आणि मीनल यांच्या सहकार्यामुळे त्यांनी डोंबिवली मिलाप नगर येथे ‘स्वरांजली’ या नावाने एक संस्था स्थापन केली आहे.
या संस्थेत 30 ते 70 वयोगटातील 100 कलाकार संगीत शिकण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी येतात. या संस्थेमार्फत आजवर विविध संकल्पना आधारित 65 जाहीर कार्यक्रम सादर केले. नुकताच दि. 14 ऑक्टोबर रोजी किशोर कुमार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक कार्यक्रम सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सादर करण्यात आला. वाद्यवृंदासह आणि ‘कराओके’वर अशा दोन्ही पद्धतीने गाण्याचे कार्यक्रम सादर केले जातात. ज्या हौशी कलाकारांना अनेक कारणांमुळे गाता येत नाही, त्यामुळे ते आपली उमेद हरवून बसतात, त्या कलाकारांना उमेद देण्याचे काम राजेश करतात. ‘स्वरांजली’च्या माध्यमातून ही सर्व कला ते लोकांसमोर आणतात. ‘स्वरांजली’ संस्थेतर्फे ‘कराओके’ आणि वाद्यवृंदासह अशा दोन्ही पद्धतीने गायला शिकवले जाते. विविध क्षेत्रांतील म्हणजे शिक्षक, डॉक्टर्स, गृहिणी, पोलीस सेवेतील लोक, तरुण मंडळी असे गायक शिकायला येतात. या संस्थेतील कलाकार देश पातळीवर पोहोचावे, अशी त्यांची इच्छा आहे. त्या दृष्टीने राजेश आणि सहकारी सतत प्रयत्नशील असतात. नवनवी उपकरणे घेऊन ‘स्वरांजली’ अद्ययावत करण्याचा प्रयत्न चालू असतो.
राजेश यांना वाचन, प्रवास व लेखन हे ही छंद आहेत. असे हे संगीतप्रेमी कुटुंब डोंबिवली परिसरात खूपच नावाजलेले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.