![thane thane](https://www.mahamtb.com/Encyc/2022/10/23/thane_202210231924396802_H@@IGHT_522_W@@IDTH_695.jpg)
ठाणे: कोविड काळातील दोन वर्षानंतर नव्या सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केल्यामुळे सर्वच भारतीय सण मोठ्या जल्लोषात साजरे होत आहेत. दिवाळीचाही सण दोन वर्षानंतर उत्साहात साजरा करण्यात येत असुन दिवाळी पहाट च्या निमित्ताने सोमवारी सकाळी ठिकठिकाणी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी तरुणाई सज्ज झाली आहे. ठाणे शहरात तर तब्बल अकरा ठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम होत आहेत.यंदा दिवाळी पहाटच्या निमित्ताने संपुर्ण तलावपाळी परिसराला झळाळी देण्यात आली असुन डिजे व ढोल ताशांच्या गजरात मोठ्या प्रमाणात युवावर्ग एकवटण्याची चिन्हे दिसत आहेत.
सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या ठाणे शहरात `दिवाळी पहाट' कार्यक्रम दरवर्षी अनोख्या पद्धतीने साजरे करण्यात येतात. ठाणेकरांना दीपावलीच्या पहाटेची मंगलमय सुरुवात सोमवारी (दि. २४) होत आहे. तलावपाळी वरील दिवाळी पहाट चे आयोजन करण्यावरून बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव सेनेत निर्माण झालेल्या वादावर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. आणि मासुंदा तलाव येथील दिवाळी पहाटच्या आयोजनाचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले. दरम्यान, उद्धव सेनेचे खा.राजन विचारे यांनाही हाकेच्या अंतरावर गडकरी रंगायतन नजीकच्या डॉ. मूस रोड चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी मिळाली आहे.तर, तलावपाळीवरील रंगो बापूजी चौकात शिंदे गटाच्याच महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्यावतीने दिवाळी पहाट होत असल्याने संपुर्ण तलावपाळी परीसर तरुणाईने फुलुन जाणार आहे.
भाजपचे संजय वाघुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्यावतीने राममारूती रोडवरील टीजेएसबी बॅंकेच्यासमोर ब्रास बॅण्डवर नागरिकांना जुन्या-नव्या हिंदी-मराठी गीतांबरोबरच देशभक्तीपर गीतांची धून ऐकावयास मिळणार आहे.
नौपाडा, तलावपाळीला वाहनांना नो एन्ट्री
दिवाळी पहाट निमित्ताने सोमवारी तलावपाळी, नौपाडा, राममारुती रोड परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत. सोमवारी सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत. नो एन्ट्री केलेल्या मार्गाऐवजी वाहनांना गडकरी चौक, टेंभी नाका , घंटाळी चौक ते तीन पेट्रोल पंप तसेच अल्मेडा चौक परिसरातुन पर्याची मार्ग सुचवण्यात आले आहेत. त्यामुळे, पर्यायी मार्गांवर वाहनांची कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजेश मढवी फाउंडेशनची दिव्यांगासोबत दिवाळी पहाट
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याहेतु डॉ. राजेश मढवी फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग मुलांसोबत दिवाळी पहाट साजरी करण्यात येत आहे. यात दिव्यांगांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा आणि दिव्यांगासोबत दिवाळी फराळाचा आस्वाद घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विश्वास मतिमंद केंद्र, जव्हेरी कर्णबधिर विद्यालय, कमलिनी कर्णबधिर विद्यालय, जागृती पालक संस्था, श्रीमाॅ बालनिकेतन शाळा, स्नेहदीप, सेंट जॉन स्कूल, स्नेहालय संस्था, राजहंस फाउंडेशन, होली क्रॉस शाळा, तसेच अत्रे कट्ट्याचे १०० दिव्यांग विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत.
दिवाळी पहाट कुठे कुठे ?
बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट) आयोजीत मासुंदा तलावपाळी येथे दिवाळी पहाट
खा. राजन विचारे आयोजित मूस रोड चौक गडकरी रंगायतननजीक दिवाळी पहाट
शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांची चिंतामणीनजीक (रंगो बापुजी चौक)
भाजप संजय वाघुले - राममारुती रोड (टीजेएसबी बँकेनजीक)
भाजपचे राजेश जाधव यांच्या ब्रम्हांड कट्टा घोडबंदर रोड
भाजपचे अॅड. अल्केश कदम यांच्या एव्हरेस्ट गृहसंकुलात
वृंदावन सोसायटीत दिवाळी पहाट
रावसाहेब इंदिसे प्रतिष्ठान - उपवन तलाव
मनसे दीप सकाळ - कळवा स्टेशन परिसर
दि ब्रदर्स प्रतिष्ठान - न्यू इंग्लिश स्कूल,नौपाडा
डॉ.राजेश मढवी फौंडेशन - राममारुती रोड येथे दिव्यांग दिवाळी पहाट
कोपरी अष्टविनायक चौकात दिवाळी पहाट