प्रकाशपर्वाची पर्वणी...

22 Oct 2022 21:14:34
diwali 1



संपूर्ण भारतात दिवाळी हा राष्ट्रीय सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रांतागणिक याचे स्वरूप आणि प्रथा वेगवेगळ्या असल्या, तरी त्यामागचा उद्देश मात्र समान आहे. आज जसे दिवाळीचे स्वरूप दिसते अगदी तसे तंतोतंत वैदिक काळात आढळत नाही. परंतु, दिवाळीतील अनेक प्रथांचे बीज वैदिक परंपरेत आढळते. त्याविषयी सविस्तर....


निसर्ग, मानवी मन आणि संस्कृती यांचं एक अनोखे समीकरण आहे. निसर्गातील बदल मनाला उल्हासित करतात आणि हाच आनंदसोहळा सण-उत्सवाच्या रूपाने साजरा केला जातो.

वसंताच्या आगमनाचा गुढीपाडवा असो किंवा शरद चांदण्याची कोजागरी, भारतीय संस्कृतीतील सर्व सण-उत्सव निसर्गाशी नाते जपतात. या आनंद सोहळ्याला जेव्हा आर्थिक समृद्धीची जोड मिळते तेव्हा सणांचा शिरोमणी दिवाळी सण साजरा केला जातो.

पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी दिवाळी हा सण येतो. शरद ऋतूच्या आल्हादायक वातावरणात पाऊस थांबून थंडीची चाहूल लागलेली असते. शेतीचा खरीप हंगाम संपल्याने बळीराजा निवांत असतो. तसेच मुबलक धान्य उत्पन्न झाल्याने धनाचीही प्राप्ती होणार असते.

आपल्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेत याचे परिणाम सगळ्याच समाज घटकांवर दिसतात. अर्थचक्राला मिळालेली गती समाजाची क्रयशक्ती वाढवते. सणाच्या निमित्ताने खरेदी केली जाते. एरवी ज्यांचा आनंद घ्यायला मिळत नाही, त्याचा आनंद घेणे म्हणजे दिवाळी अशी सोपी व्याख्या असल्याने मुबलक दिवे लावणे, नवीन कपडे घालणे, चविष्ट फराळ खाणे, फटाके फोडणे अशा अनेक प्रथा दिवाळीशी निगडित आहेत. संपूर्ण भारतात हा राष्ट्रीय सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रांतागणिक याचे स्वरूप आणि प्रथा वेगवेगळ्या असल्या, तरी त्यामागचा उद्देश मात्र समान आहे.

आज जसे दिवाळीचे स्वरूप दिसते अगदी तसे तंतोतंत वैदिक काळात आढळत नाही. परंतु, दिवाळीतील अनेक प्रथांचे बीज वैदिक परंपरेत आढळते. अनेक गृह्य संस्कारांचे रूपांतर विविध सण-उत्सवात झालेले दिसते. विविध महिन्यांत केले जाणारे ‘अष्टक’, ‘पार्वण’, ‘श्राद्ध’, ‘श्रावणी’, ‘आग्रहायणी’, ‘चैत्री’, ‘आश्वयुजी’ या सात पाकयज्ञांतील ‘पार्वण’, ‘आश्वयुजी’ व ‘आग्रहायणी’ या तीन यज्ञांचे एकीकरण व रूपांतर होऊन दीपावलीचा उत्सव सुरू झाला असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. ‘पार्वण’ हा पाकयज्ञ पितरांच्या तृप्ततेसाठी केला जात असे. त्यातही नवीन धान्य घरात आल्यावर आश्विन अमावास्येला केला जाणारा ‘पार्वण’ पाकयज्ञ विशेष महत्त्वाचा असावा.

‘आश्वयुजी’ हा इंद्र आणि धनधान्याची वैदिक कृषी देवता सीता यांना उद्देशून केला जाणारा पाकयज्ञ, तर ‘आग्रहायणी’ हा नवीन धान्यांद्वारे केला जाणारा पाकयज्ञ होय. पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण, यमदीप दान विधी, आकाशदीप लावणे, नवीन धान्याची मिष्टान्नं बनविणे, धन-धान्य यांचे पूजन करणे त्या आधी घराची साफसफाई करणे, या दिवाळीतील प्रथांचे मूळ या वैदिक परंपरेत असावे.पुढे कृषीदेवतेच्या पूजनाऐवजी धनधान्य आणि समृद्धीची देवता लक्ष्मीचे पूजन सुरु झाले असावे.

आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी आपल्या दिवंगत पूर्वजांना मशाली दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी, असे ‘वर्षक्रियाकौमुदी’, ‘धर्मसिंधु’ इ. ग्रंथामध्ये सांगितले आहे. पितरांना स्वर्गातून आपले घर दिसावे, यासाठी लावल्या जाणार्‍या आकाशदीपाचे हे मूळ रूप असावे.




diwali 2
 


आश्विन कृष्ण त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत पाच दिवसांच्या सणांचे धार्मिक कृत्ये आणि माहात्म्य सांगणार्‍या कथा पुराणात आढळतात. आश्विन कृष्ण द्वादशीस, गोवत्सद्वादशीस गाई-गुरांना वसु म्हणजे संपत्ती समजून त्यांना ओवाळून दिवाळीची सुरुवात होते. धनत्रयोदशीला आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचे तसेच धनधान्य यांची पूजा केली जाते. अपमृत्यू टाळण्यासाठी तसेच पितरांच्या तृप्तीसाठी यमाला उद्देशून यमदीपदान केले जाते.

नरकासुर वध करणार्‍या कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस ‘नरक चतुर्दशी’ हा सण साजरा केला जातो. सूर्योदयाच्याआधी अभ्यंगस्नान हे या दिवसाचे प्रमुख कृत्य. अमावस्येला प्रदोषकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. बलिप्रतिपदेला बळीराजाची पूजा करतात. ब्रह्माच्या एका दिवसात म्हणजे कल्पात 14 मन्वंतरे होतात. या प्रत्येक मन्वंतराचा इंद्र, सप्तर्षी इत्यादी वेगवगेळे असतात, असे मानले जाते. पुरंदर हा सध्याच्या वैवस्वत मन्वंतराचा इंद्र असून विरोचनपुत्र बळी हा पुढील सावर्णि मन्वंतराचा इंद्र होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी ‘ईडा पीडा जाऊ दे बळीचे राज्य येऊ दे’ अशी प्रार्थना केली जाते. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.

दिवाळी हा दिव्यांचा उत्सव. ‘दीप्यते दीपयति वा स्वं परं चेति।’ जो स्वतः प्रकाशतो आणि इतरांना उजळवतो, तो दिवा होय. अग्नीचा शोध ही मानवी प्रगतीची मुहूर्तमेढ मानली जाते. सर्व प्राचीन संस्कृतीत रक्षण करणार्‍या आणि प्रकाश देणार्‍या अग्नीची पूजा केली जात होती. अग्नीचे सुरक्षित आणि लहान प्रारूप म्हणजे दिवा होय. अश्मयुगात इसवी सन पूर्व सात हजारमध्ये दिव्याचा प्रथम शोध लागला.

दगडाची खोबणी करून प्राणिजन्य चरबी आणि कातडीची वात पेटवणे हे दिव्यांचे प्राथमिक रूप होते. पुढे शिंपले माती, धातू इत्यादी वापरून सुबक दिवे करण्यात येऊ लागले. ‘दिव’ या संस्कृत धातूचा प्रकाशणे असा अर्थ होतो. त्यापासून ‘दिवा’ आणि ’देव’ असे शब्द बनले आहेत. ‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्’ असं म्हणत दिव्यांना देवता मानून पूजन करणे, हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. दिवे हे भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत. देवघरात नंदादीप, पूजेत निरंजन, लग्नात शकुनदीप अशी त्यांची विविध रूपे आहेत. भारतीय संस्कृतीत जन्माच्या वेळी जिवतीसाठी दिवा पेटवला जातो, तर माणूस मेल्यावरदेखील पिठाचा दिवा लावला जातो.


जन्मापासून मृत्यूपर्यंत रोजच्या देवपूजेपासून तर लग्नापर्यंत आयुष्याच्या प्रत्येक घटनेला दिवे साक्षी असतात. या दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी.वात्स्यायनाच्या कामसूत्रात ‘यक्षरात्री’ या गुप्तकाळातील मोठ्या सणाचा उल्लेख येतो. त्याने ’यक्षरात्री’, ‘कौमुदीजागर’ व ‘सुवसंतक’ या तीन सणांना ’सणांचे महामणि’ असे म्हटले आहे.

सातव्या शतकांतील ‘नागानंद’ या हर्षवर्धनलिखित नाटकात या सणाला ‘दीपप्रतिपदुत्सव’ असे नाव आढळते. ‘नीलमत पुराण’ या सहाव्या ते आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या काश्मीरचा इतिहास सांगणार्‍या ग्रंथात दीपमाला उत्सवाचे तपशीलवार वर्णन आहे. माळा-पताके लावणे, दिव्यांची रोषणाई करणे प्रियजनांना, ब्राह्मणांना आणि सेवकांना नवीन वस्त्रे भेट देणे, उत्तम वस्त्रे-आभूषणे घालणे, स्वादिष्ट मेजवानी करणे असे दिवाळीच्या आजच्या स्वरूपाशी जुळणारे वर्णन या ग्रंथात आढळते.

दहाव्या शतकातील ‘यशस्तिलकचंपू’ या सोमदेव सुरी लिखित ग्रंथात दीपोत्सवानिमित्त घराला नवीन रंग देणे, घर सजवणे, घराच्या बाहेर दिव्यांच्या रांगा लावणे, द्यूत खेळणे इत्यादी प्रथांचा उल्लेख आहे. अलबेरूनी या दहाव्या शतकातील पर्शियन विद्वानाने आपल्या ’तहकिक-ए-हिंद’ या ग्रंथात दिवाळीचं सविस्तर वर्णन केलं आहे.

‘ज्ञानेश्वरी’, ‘रुक्मिणी स्वयंवर’ इत्यादी ग्रंथात दिवाळीचे अनेक उल्लेख येतात. ‘लीळाचरित्रा’त श्रीचक्रधरांनी भक्तांसमवेत दिवाळी सण साजरी करताना अभ्यंगस्नान, ओवाळणी अशा प्रथांचा उल्लेख आहे. चौदाव्या शतकातील ’आकाशभैरवकल्प’ या ग्रंथात दिवाळीबद्दल वर्णन करताना फटाक्यांचा उल्लेख आहे. महादजी शिंदे यांनी सवाई माधवराव पेशव्यांना लिहिलेल्या पत्रात कोटा येथील दिवाळीनिमित्त केलेल्या फटाक्यांच्या दारूकामाविषयी सांगितले आहे.

दिवाळी हा जसा दिव्यांचा अणि रोषणाईचा उत्सव आहे, तसाच तो रुचकर मिष्ठान्नांचा सण म्हणूनदेखील ओळखला जातो. मुबलक अन्न उपलब्ध असताना शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करून शारीरिक बळ वाढवणे, हा या मागचा खरा हेतू. वर्षभर न खाल्ले जाणारे पदार्थ खास दिवाळीत करून खाण्याची प्रथा सुरु झाली असावी. यातील अनेक पदार्थांची आद्य रूपे वैदिक काळापासून आढळतात, तर काही पदार्थांची नावे अकराव्या शतकातील ‘क्षेमकुतूहल’, ‘भोजनकुतूहल’ इत्यादी भोजनविषयक ग्रंथात आढळतात.


diwali 3
 

‘चक्रिका’ (चकली), ‘मधुशीर्षक’ (खाजे), ‘सम्पाव’ (सारोटी), ‘चणकपुरीका’ (बेसनाच्या पुर्‍या), ‘सेविका’ (शेवया) असे अनेक पदार्थ विविध ग्रंथात आढळतात. ‘लड्डूक’ किंवा ‘मोदक’ या नावाने संस्कृत साहित्यात येणार ‘लाडू’ हा फराळातील मुख्य पदार्थ. अगदी प्राचीन काळापासून संपूर्ण भारतीय उपखंडात लाडू बनवला जातो.


राजस्थान येथील उत्खननात सिंधू-सरस्वती संस्कृतीतील सातू, गहू, मूग यांनी बनवलेल्या लाडवांचे अवशेष सापडले आहेत. सुश्रुत शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना तीळगुळाचे लाडू खाण्यास देत असे. ‘न पूयते विशीर्यते’ अशी व्याख्या असणारा आणि अगदी वैदिक साहित्यात उल्लेख असणारा ‘अपूप’ हे अनारशाचे आद्यरूप म्हणता येईल. ‘शष्कुली’ म्हणजे आपण करतो ती करंजी होय. हिलाच ‘गुजिया’ (उत्तर प्रदेश), ‘कार्चिका’ (तामिळनाडू), ‘घुघरा’ (गुजरात), ‘पुरुकीया’(बिहार) अशी प्रांतगणिक विविध नावे आहेत.


भारताच्या विविध भागांत ‘चकुली’, ’चकरी’, ‘मुरुक्कू’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या चकलीचे मूळ दक्षिण भारतात आहे. उत्तरेमधला ‘सक्करपारी’ या पदार्थाच्या नावाचा अपभ्रंश म्हणजे शंकरपाळे होय. दिवाळीचा फराळ त्याशिवाय अपूर्ण आहे, तो चिवडा मात्र त्यामानाने बराच आधुनिक म्हणता येईल. लक्ष्मीबाई धुरंधरांच्या 1910 मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकात ‘छबिना’ नावाने चिवडा आढळतो. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ भारताच्या समृद्ध पाककलेचा परंपरेचे दर्शन घडवतात.

दिवाळी हा सण फक्त भारतातच नाही तर भारतीय उपखंडातील आणि आग्नेय आशियातील अनेक देशांत साजरा केला जातो. नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, मॉरिशस, गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, सुरीनाम, मलेशिया, सिंगापूर आदी देशांमध्ये दिवाळी विविध प्रकारे साजरी केली जाते. या देशांमध्ये दिवाळीनिमित्त अधिकृत सुट्टीही दिली जाते.

नेपाळमध्ये दिवाळी सण ‘तिहार’ किंवा ‘यमपंचक’ नावाने प्राण्यांची पूजा करून साजरा केला जातो. काग तिहारला कावळ्यांची ‘कुकुर तुहार’ला कुत्र्यांची, तर ’गाय तिहार’ला गाईची पूजा केली जाते. इंडोनेशियात मुख्यत: बाली बेटांमध्ये देवळांना दिव्यांची रोषणाई आणि पारंपरिक नृत्य करत दिवाळी साजरी केली जाते.


मलेशियामध्ये दिवाळी ‘हरी दिवाळी’ म्हणून साजरी केली जाते. अनेक ठिकाणी रामायण आणि महाभारत यातील कथा बाहुल्यांच्या खेळाद्वारे दाखवल्या जातात. थायलंडमध्ये दिवाळी ‘लुई क्रॅथोंग’ म्हणून साजरी केली जाते. केळीच्या पानांपासून बनवलेले दिवे नदीत सोडले जातात. याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून संयुक्त राष्ट्रसंघ याच सोबत अमेरिका, इंग्लंड आणि जगातील इतर देशांत दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी होऊ लागली आहे.


भारतीय संस्कृतीतील काही सण हे उपवास, व्रताचरण यांच्या माध्यमातून धर्म आणि मोक्ष या पुरुषार्थांची ओळख करून देत असतात. दिवाळी हा सण अर्थ आणि काम या पुरुषार्थांचे द्योतक आहे. धर्ममार्गाने उत्तम संपत्ती मिळवावी. पण, या संपत्तीचा मद डोक्यावर चढू देऊ नये. ‘तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्।’ हे सूत्र लक्षात ठेवत या संपत्तीचा उपभोग घ्यावा, हे दिवाळी सुचवते.


भारतीय संस्कृतीत प्रकाश म्हणजे फक्त उजेड इतका मर्यादित अर्थ नाही, तर प्रकाश म्हणजे ज्ञान असे मानले जाते. जसे अंधारात लावलेला दिवा सभोवताल उजळतो, त्या योगाने सभोवतालच्या वस्तू दिसायला लागतात. तसे जन्मोजन्मीच्या अज्ञानात ज्ञान प्राप्त झाले की, जीवन उजळून निघते. म्हणून माऊलीसुद्धा दिवाळीचे वर्णन करताना म्हणतात - मी अविवेकाची काजळी। फेडोनी विवेक दीप उजळी॥ ते योगिया पाहे दिवाळी। निरंतर॥ असा ज्ञानाचा दिवा प्रत्येकच्या बुद्धीत प्रज्वलित होत घरोघरी प्रकाशाचे दिवे लागावेत. परंपरांच्या या प्रकाशात भारतीय संस्कृतीचे अंगण उजळून निघावे याच दिवाळीच्या शुभेच्छा !!!




-विनय जोशी

Powered By Sangraha 9.0