गोपीचंद पडळकर
मुंबई : 'राष्ट्रवादीतील बहुतांश मंडळी भाजपात येण्याचा विचार करत असून येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा दिसेल,' असा मोठा गौप्यस्फोट भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर आता पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून मोठा राजकीय भूकंप होणार का या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पाटील यांनी देखील या संदर्भात एक विधान करून पवार कुटुंब फोडण्याचे प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता. त्यातच आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांना बळ मिळाले आहे.
नुकताच सांगलीच्या जत तालुक्यामधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांसह अनेकांवर टीका केली. त्यावेळी ते बोलत होते.
बारामतीतही भाजपचा झेंडा दिसेल
पडळकर म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वी पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की शरद पवारांनी महाराष्ट्राचा एक दौरा केला तर राज्यात सत्ता परिवर्तन होते. परंतु, जेव्हापासून भाजपचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रात फिरायला सुरुवात झाल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश सुरु झाले आहेत. याच प्रकारे जर जनतेचा भाजपाला पाठिंबा कायम राहिला तर २ ते ३ वर्षांच्या कालावधीत बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरही भाजपचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही.
९० टक्के नेते म्हणतील भाजपात चला
ज्या प्रकारे भाजपाला महाराष्ट्राच्या जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून येत्या काळात राष्ट्रवादीची काय अवस्था होणार हे सांगायची गरज नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे कुठलाही विचार नाही. भाजपचे संस्कार सांगतात की राष्ट्र प्रथम पक्ष नंतर आणि अखेरीस आपण ही भाजपच्या राष्ट्रवादाची संकल्पना आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही वाटचाल करत आहोत. त्यामुळे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस विसर्जित करण्याची वेळ येईल तेव्हा ९० टक्के नेते भाजपात चला म्हणतील आणि तेव्हा प्रत्यक्ष स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयावर भाजपचा झेंडा फडकेल,' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.