जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी !

22 Oct 2022 20:55:23
 
Jaydatta Kshirsagar
जयदत्त क्षीरसागर
 
 
 
बीड : आधी काँग्रेस मग राष्ट्रवादी आणि अखेरीस शिवसेना असा प्रवास करून शिवसेनेत स्थिरस्थावर झालेले मराठवाड्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. बीडच्या स्थानिक शिवसेनेतील ठाकरे गटाच्या नेत्यांनी याबाबत शनिवारी संकेत देत क्षीरसागरांचा ठाकरे गटाच्या सेनेशी काहीही संबंध राहिलेला नसल्याचे म्हटले आहे. रविवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना त्याच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा आणखी एक हेवीवेट नेता ठाकरेंपासून दुरावला आहे.
 
 
शिंदेंना कार्यक्रमाचे निमंत्रण ठरले कारण
 
२ दिवसांपूर्वी बीड नगरपरिषदेच्या विकास कामांच्या संदर्भात एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबईतून दृक्श्राव्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह क्षीरसागर उपस्थित होते. तेव्हापासूनच क्षीरसागरांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेरीस ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या घोषणेमुळे क्षीरसागरांचा शिवसेनेतील प्रवास संपला असून शिंदेंना कार्यक्रमाला निमंत्रण देणे त्याला निमित्त ठरले आहे.
 
 
शिवसेनेत प्रवेश आणि क्षीरसागरांची गोची
 
बीडच्या क्षीरसागर घराण्यातील सदस्य असलेले जयदत्त क्षीरसागर मागील ४० वर्षांपासून सक्रिय राजकारणात असून अनेक वर्षे ते विधिमंडळाचे सदस्य राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी अनेक महत्त्वाची मंत्रीपदे देखील भूषवलेली आहेत. ओबीसी समाजाचे एक मोठे नेते आणि शरद पवारांच्या निकटवर्तीयांपैकी एक मोठे नेते म्हणून जयदत्त क्षीरसागरांकडे पाहिले जात होते.
 
 
परंतु, त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीने २०१९ विधानसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर क्षीरसागर यांची मोठी गोची स्थानिक राजकारणात झाल्याचे दिसून येत होते. त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना सातत्याने पेव फुटत होते. अखेरीस ठाकरे गटाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0