आग पूर्व युरोपात, धग पूर्व आशियात

21 Oct 2022 21:30:08
aag


आपल्याकडच्या ‘इंटेलेक्चुअल’ असल्याचा आव आणून उपदेशपर अग्रलेख खरडणार्‍या ‘मेनस्ट्रीम’ वृत्तपत्रांच्या संपादकांनी नीट कळावं म्हणून की काय, जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांनी अधिक उघडपणे म्हटलंय, ‘आज उक्रेनमध्ये घडतंय, तेच उद्या पूर्व आशियात घडू शकतं.’



चंदिगढ हा उच्चार चूक; चंडिगढ हा उच्चार बरोबर. बॉम्बे, खॅलखॅटा, ढेली हे उच्चार चूक; मुंबई, कोलकाता, दिल्ली हे उच्चार बरोबर. तसेच युक्रेन हा उच्चार चूक; उक्रेन हा उच्चार बरोबर. अगदी काटेकोरपणे बोलायचं तर स्वतः उक्रेनियन लोक त्या शब्दाचा उच्चार ‘उक्रईना’ असा करतात.

भारताचे परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर हे मोठे विद्वान गृहस्थ आहेत. त्यांना सहा भाषा येतात. ते बोलतानानेहमी ‘उक्रेन’ असा उल्लेख करतात. आपण मराठी माणसं मात्र बेधडक चुकीचे उच्चार करीत असतो. याला मुख्य जबाबदार आपली प्रसारमाध्यमं आहेत. इंग्रजी प्रसारमाध्यमं मस्तवालपणे मुद्दाम ज्या चुका करतात, त्या आपली माध्यमं कसलाही विचार न करता तशाच ठोकत असतात.


तर ते पाहा टोकियो. (मूळ जपानी उच्चार तोक्यो) जपानची राजधानी असणार्‍या शहर टोकियोमधला एक नामांकित काफे. अशा मोठ्या काफेमध्ये बर्‍याचदा वाद्यवृंद असतो,तशा वाद्यवृंदाच्या मंचावर पाठीमागच्या पडद्यावर चक्क उक्रेन देशाचा भलामोठा ध्वज लावलेला आहे आणि की बोर्ड हे वाद्य वाजवीत हयाशी योशिमासा हे गृहस्थ जॉन लेननचं शांतिगीत गात आहेत.


‘कल्पना करा की, स्वर्ग आणि नरक अस्तित्वात नाहीत. कल्पना करा की, देशादेशांच्या सीमारेषा अस्तित्वात नाहीत. कल्पना करा की, हे माझं हे तुझं ही भावनाच अस्तित्वात नाही. मग सगळं जग एक होईल. एकत्र नांदेल’असा आशय व्यक्त करणारी जॉन लेननची ‘इमॅजिन’ या शब्दाने सुरू होणारी ही तीन कवनं फार प्रसिद्ध आहेत. त्यांना पाश्चिमात्य देशांमध्ये शांतिगीत किंवा शांतिमंत्राचाच दर्जा मिळालेला आहे.


आता इथे जॉन लेनन आणि त्याचं शांतिगीत ही काय भानगड आहे, हे बघायला हवं. जॉन लेनन हा एक ब्रिटिश कवी, गायक आणि संगीतकार होता. आपल्यासारखेच आणखी तीन कलावंत साथीदार बरोबर घेऊन त्याने ‘बीटल्स’ हा रॉक संगीत सादर करणारा वाद्यवृंद निर्माण केला. या ‘बीटल्स’ नी 1970च्या दशकात पश्चिमी देशांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांच्या संगीताने लोक वेडे झाले. त्यांच्या अफाट लोकप्रियतेने सर्व सीमा ओलांडल्या. हे कलावंत लोक जोपर्यंत प्रस्थापित झालेले नसतात, तोपर्यंत ते आपलं क्षेत्र सोडून इतरत्र लुडबूड करीत नाहीत. पण, एकदा का ते लोकप्रिय झाले की,त्यांना मिशा फुटाव्यात तशी राजकीय मतं फुटायला लागतात. आता ‘बीटल्स’ चे तेच झाले. युरोपप्रमाणेच अमेरिकेतदेखील लोकांनी डोक्यावर घेतलं म्हटल्यांवर जॉन लेेननने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना अमेरिकेने व्हिएतनामबरोबर चालवलेलं युद्ध बंद करण्याचा उपदेश केला.


झालं! प्रसारमाध्यमांना आणि त्यातही डाव्या प्रसारमाध्यमांना नवा हिरो मिळाला.कारण, त्या कालखंडात अमेरिका-सोव्हिएत रशिया यांच्यातलं शीतयुद्ध अगदी कळसावर पोहोचलं होतं. त्यांनी जॉन लेननला एकदम शांतिदूत वगैरे बनवून टाकलं. अगोदर सांगितलेली लेननची तीन कवनं एकदम जागतिक शांततेचे जणू मंत्रच म्हणून ओळखली जाऊ लागली. आता एवढी अफाट लोकप्रियता मिळाल्यावर दुसरं काय होणार? डोकं ढगात तरंगायला लागणार. तसंच झालं. ‘आम्ही येशू ख्रिस्तापेक्षाही जास्त लोकप्रिय आहोत,’ असं लेनन जाहीरपणे सांगू लागला.


ते कसंही असो, त्याची ती तीन कवनं आजही पश्चिमी देशांमध्ये लोकप्रिय आहेत.ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही, अशा देशांमध्ये सुद्धाती शांतिमंत्र म्हणून आजही गायली जात असतात. पण मग जपान या पौर्वात्य देशाच्या राजधानीत ती का बरं गायली गेली? तीसुद्धा उक्रेन देशाच्या झेंड्यासमोर? आणि गाणाराजो ह्याशी योशिमासा हा माणूस म्हटलं, तो कोण आहे माहितेयं का? तो जपानचा विद्यमान परराष्ट्रीय आहे.


जपान हा अतिशय स्वाभिमानी देश आहे. आपल्यासारखं इंग्रजी ही संगणकासाठी उपयुक्त भाषा आहे, म्हणून इंग्रजीचे लाड करीत न बसता त्यांनी हर प्रयत्ने करून जपानी भाषा तिची अवघड अशी चित्रलिपी संगणकावर आणली.


मग अशा स्वाभिमानी देशाचा खुद्द परराष्ट्रमंत्री पाश्चिमात्य वळणाच्या एका काफेमध्ये उक्रेन देशाच्या झेंड्यासमोर इंग्रजी भाषेतलं शांतिगीत गातोय, ही काय भानगड आहे? अशा घटना काही योगायोगाने घडत नसतात. हिरो गंमत म्हणून कुठल्या तरी हॉटेलात गेला आणि ऐनवेळी तिथल्या वाद्यवृंदाबरोबर एक फाकडू गाणं हाणून हिरॉईन पटवून घरी आला, असं घडायला तो काही हिंदी चित्रपट नव्हे. जपानी परराष्ट्र खात्याने योजनापूर्वक हा कार्यक्रम घडवून आणला होता. त्यातून जपानला सर्व संबंधितांना संदेश द्यायचा होता की, आम्ही उक्रेनच्या पाठीशी आहोत.


आता तुम्ही म्हणाल, यात काय नवीन आहे? उक्रेनवर रशियाने आक्रमण केलेलं आहे. अमेरिका, तिचे पश्चिम युरोपीय मित्र देश आणि आशियातले मित्र म्हणजे जपान आणि दक्षिण कोरिया हे उक्रेनच्या बाजूने असणार, हे उघडच आहे. पण, आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा एकंदरीतच राजकारण हे एवढं साधं नसतं. या कार्यक्रमाद्वारे जपानने आपल्या मित्रांना आणि शत्रूंनाही संदेश दिलाय की, ‘आम्ही जागे आहोत.’ आपल्याकडच्या ‘इंटेलेक्चुअल’ असल्याचा आव आणून उपदेशपर अग्रलेख खरडणार्‍या ‘मेनस्ट्रीम’वृत्तपत्रांच्या संपादकांनी नीट कळावं म्हणून की काय, जपानचे पंतप्रधान किशिदा फुमिओ यांनी अधिक उघडपणे म्हटलंय, ‘आज उक्रेनमध्ये घडतंय, तेच उद्या पूर्व आशियात घडू शकतं.’


जपानचा हा इशारा स्पष्टपणे चीन, उत्तर कोरिया आणि रशिया यांच्याकडे आहे. जपान हा पूर्व आशियातला एक तेजतर्रार देश आहे. इराण, भारत, चीन इत्यादी मोठमोठे देश पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज आदी पाश्चिमात्त्य राष्ट्रांच्या कह्यात जात असताना, चिमुकल्या जपानने स्वत:चं तसं होऊ दिलं नाही. पण, पाश्चात्य विद्या, पाश्चात्य विज्ञान-तंत्रज्ञान वेगाने आत्मसात करून जपान सैनिकीदृष्ट्या समर्थ बनला. आता त्याला पाश्चिमात्त्य राष्ट्रांप्रमाणे आपलंही साम्राज्य असावंसं वाटू लागलं. 1904 साली चिमुकल्या जपानने झार सम्राटांच्या अवाढव्य रशियावर चक्क आक्रमण केलं आणि रशियाचा काही प्रदेश जिंकला. मग 1910 साली जपाने कोरियावर हल्ला चढवून तो ही देश जिंकला. (आजचे उत्तर कोरिया नि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश.) 1931 साली जपानने चीनवर हल्ला चढवून त्याचा मांचूरिया हा प्रांत जिंकला. 1941 साली जपानने अमेरिकेच्या ‘पर्ल हार्बर’ या आरमारी तळावर जबरदस्त हल्ला चढवून जर्मनीच्या बाजूने दुसर्‍या महायुद्धात पदार्पण केलं. जपानला संपूर्ण आग्नेय आशियासह भारतावरही ताबा मिळवायचा होता. 1945 साली हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या अणुबॉम्ब स्फोटांनी जपानच्या या साम्राज्य लालसेचा दारुण शेवट झाला. अमेरिकेचा सेनापती जनरल डग्लस मॅकआर्थर याच्यासमोर जपानने बिनशर्त शरणागती स्वीकारली.



युरोपात ज्याप्रमाणे दोस्त राष्ट्रांनी जर्मनीची सैनिकी शक्ती संपवली; तशीच आशियात अमेरिकेने जपानची सैैनिकी शक्ती संपवली. अणुस्फोटांनी झालेल्या भीषण विध्वंसामुळे खुद्द जपानी राजनेते इतके हादरले होते की, एकेकाळी ‘युद्ध करणे हा आमचा नैसर्गिक अधिकार आहे,’ असं मोठ्या गर्वाने सांगणारे जपानी राजकारणी, ‘आम्ही जगभरच्या न्याय आणि शांती यांच्यावर प्रेम करणार्‍या लोकांवर विश्वास ठेवतो,’ असं म्हणू लागले. अमेरिकेने जपानमध्ये अंतर्गत सुरक्षा आणि न्यायव्यवस्था यांच्याकरिता फक्त पोलीस दल शिल्लक ठेवलं. जपानने व्यापलेल्या आग्नेय आशियामधल्या एकेका देशाला स्वातंत्र्य मिळू लागलं.



पण, सरळ चालेल तर ते राजकारण कसलं? युरोपात ज्याप्रमाणे स्टॅलिनच्या सोव्हिएत फौजांनी पूर्व जर्मनी व्यापला नि अखेर जर्मनीची फाळणी करून पूर्व जर्मनी हा नवा साम्यवादी देश बनवला; तोच प्रकार इकडे पूर्व आशियात झाला. जपानच्या ताब्यातला कोरिया देश मुक्त करण्यासाठी दक्षिणेकडून अमेरिकन फौजा, तर उत्तरेकडून सोव्हिएत फौजा घुसल्या. आता त्याच दोघांमध्ये युद्ध पेटणार, असा रंग दिसू लागला. अखेर जर्मनीप्रमाणेच कोरियाची फाळणी होऊन सोव्हिएत प्रभावाखालचा उत्तर कोरिया नि अमेरिकन प्रभावाखालचा पण लोकशाही व्यवस्थेचा दक्षिण कोरिया असे देश निर्माण झाले. कोरिया प्रकरण जरा थंडावतंय, तेवढ्यात म्हणजे 1949 साली चीनमध्ये साम्यवादी क्रांती झाली. मोओ-त्से-तुंग किंवा माओ झेडाँग याने चँग-कै-शेक याचं लोकशाही सरकार उलथबलं. चँग-कै-शेक चीनच्या मुख्य भूमीच्या पूर्वेला असलेल्या ‘फोर्मोसा’ या बेटावर पळाला. म्हणजे आता पूर्व आशियात सोव्हिएत रशिया, उत्तर कोरिया आणि चीन असे तीन सलग साम्यवादी देश बनले. मग अमेरिकेने सत्ता समतोल राखण्यासठी ‘फोर्मोसा’ बेटात तैवान हा लोकशाही देश निर्माण केला. तसेच, जपानलाही पुन्हा बळ पुरवून पूर्व आशियाई राजकारणात आपला दबाब कायम राखला.



2013 सालापासून या राजकारणाला आणखी वेगळं वळण लागलं. कारण, या वर्षापासून चीनने आपलं आरमारी बळ वाढवायला सुरुवात केली. नवी सैन्य भरती, नव्या युद्धनौका, नव्या अत्याधुनिक पाणबुड्या बांधत चीनने पॅसिफिक महासागर क्षेत्रातल्या अमेरिकन अधिसत्तेला आव्हान द्यायला सुरुवात केली. आता सामरिक स्थिती कशी आहे पाहा. पॅसिफिकमध्ये अनेक बेटांवर अमेरिकन आरमाराचे छोटे-मोठे तळ असले, तरी अमेरिकेची मुख्य भूमी चीनपासून दूर पॅसिफिक सागरापल्याड आहे, तर अमेरिकेचे मित्र असणारे तैवान, दक्षिण कोरिया आणि जपान चीनच्या अंगणातच आहेत. 2018 पासून चीन वारंवार तैवानला भेवडावून दाखवतो आहे. तसंच जपानसह इतरही आग्नेय आशिया देशांच्या सागरी सरहद्दींचा तो वारंवार भंग करतो आहे. या देशांच्या ताब्यातल्या अनेक बेटांवर तो स्वतःचा हक्क सांगतो आहे. आता उक्रेन प्रकरणानंतर रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचाही कल चीनच्या बाजूने दिसू लागला आहे.


हा धोका ओळखलेल्या जपानने पहिली गोष्ट कोणती केली असेल, तर ती म्हणजे ‘राष्ट्रीय सुरक्षा नीती’ची आखणी. सोव्हिएत रशिया, चीन आणि उत्तर कोरिया यांच्या तोंडावर उभं राहण्यासाठी अमेरिकेने 1945 साली पुन्हा जपानला सैन्य उभारण्याची परवानगी दिली. पण, ते सैन्य आहे आपलं बेताचंच. भूदल, वायुदल आणि नाविक दल स्वतंत्रपणे आपपलं काम करतात. त्यांच्यात कसलाही समन्वय नाही. नव्या राष्ट्रीय सुरक्षा नीती धोरणाने सर्वप्रथम हा समन्वय घडवून आणण्याकडे लक्ष पुरवलं आहे.


 
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अणुस्फोटांनी हादरलेला सर्वसामान्य जपानी नागरिक जो आतापर्यंत शांततेला पाठिंबा देत होता, तो आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी आता मनाने सज्ज होऊ लागला आहे.







Powered By Sangraha 9.0