मुंबई : सध्या भारतीयांना वेड लावायला टी - २० विश्वचषक स्पर्धा येत आहे. या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेची ऑफिशिअल कार भारतातील प्रमुख कार उत्पादक कंपनी असणाऱ्या निसान कंपनीकडून देण्यात येणार आहे. जगातील सर्वच प्रमुख क्रिकेट स्पर्धांच्या बक्षिसांच्या प्रयोजकत्वात किंवा पूर्ण स्पर्धेच्या प्रमुख प्रायोजकत्वात कार उत्पादन कंपन्या कायम पुढाकार घेत असतात. या विश्वचषकासाठी मॅग्नाइट सब - कॉम्पॅक्ट एसयूव्हीही ही कार असणार आहे. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या प्रायोजकत्वासाठी निसान कंपनीने आयसीसीशी करार केला आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक बक्षिसांच्या प्रायोजकत्वासाठीही कार कंपन्या पुढाकार घेत असतात.
याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे या स्पर्धांसाठी येणारा प्रेक्षकवर्ग आणि त्याहून अधिक म्हणजे भारतातून या स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणावर असणारे दर्शक. क्रिकेटसाठी भारतातून सर्वात मोठा प्रेक्षकवर्ग मिळतो. त्यामुळे जास्तीतजास्त ब्रॅण्ड्स लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या स्पर्धांचा वापर करता येतो. म्हणून या स्पर्धांच्या प्रायोजकत्वासाठी कार कंपन्यांकडून कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. याच कारणांसाठी जागतिक पातळीवर होणाऱ्या सर्वच मोठ्या क्रिकेट स्पर्धांना भारतातील कार उत्पादक कंपन्या प्रायोजकत्व देत असतात.