नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवादी आणि अंमली पदार्थांचे तस्कर यांच्या जाळ्याविरोधात मंगळवारी सहा राज्यांमध्ये छापेमापी केली. एनआयएने भारतात आणि परदेशात स्थित दहशतवादी, गुंड आणि अंमली पदार्थ तस्कर यांच्या रचनेविरोधात ही कारवाई केली आहे.
दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी याप्रकरणी युएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल केले होते. त्या प्रकरणांची दखल घेऊन एनआयएने कारवाई केली आहे. परदेशात स्थित असलेले आणि भारतातील वेगवेगळ्या तुरुंगात बंद असलेले गुंड हे वेगवेगळ्या स्तरावर आपले जाळे चालवत असून सातत्याने गुन्हे करत असल्याचे तपासात समोर आले होते. गुंडांचे दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध, दहशत निर्माण करणारा अपप्रचार करण्याचे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिल्ली पोलिसांना आढळून आले होते. त्याचप्रमाणे पाकिस्तान, कॅनडा, मलेशिया, ऑस्ट्रेलिया येथे राहून भारतामध्ये हिंसक कारवाया आणि तस्करी होत असल्याचेही पुढे आले होते.
याआधारे एनआयएने दिल्ली – उत्तराखंड, एनसीआर, पंजाब, राजस्थान, चंदीगढ, हरियाणा,बिहार या राज्यांमधील सुमारे ५० ठिकाणी छापेमारी केली. या टोळ्या ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या माध्यमातून गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी निधीही गोळा करत होत्या. त्यांचे संपूर्ण जाळे संपवण्यासाठी एनआयएने आज फाजिल्का, फरीदकोट, मुक्तसर साहिब, मोगा, तरन तारण, अमृतसर, लुधियाना, चंदीगड, पंजाबमधील मोहाली जिल्ह्या, पूर्व गुरुग्राम, भिवानी येथे ठिकाणी छापे टाकले. हरियाणातील यमुनानगर, सोनीपत आणि झज्जर जिल्हे, राजस्थानमधील हनुमानगढ आणि गंगानगर जिल्हे आणि द्वारका, बाह्य उत्तर, ईशान्य, उत्तर पश्चिम आणि दिल्ली/एनसीआरमधील शाहदरा येथे छापे टाकण्यात आले.
एनआयएने गोल्डी ब्रार (कॅनडा), लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया, वरिंदर प्रताप उर्फ कला राणा, कला जथेडी, विक्रम ब्रार, गौरव पटियाल उर्फ लकी पटियाल, नीरज बवानिया कौशल चौधरी, टिल्लू ताजपुरिया, अमित डागर, दीपक कुमार, टिनू, संदीप, इरफान, पहेलवान, आशिम, हाशिम बाबा, सचिन भांजा यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे.
एनआयएने पीएफआयप्रकरणी बिहारमधील फुलवारी शरिफ येथे गझवा-ए-हिंदशी संबंधित मरगुब अहमद उर्फ दानिशच्या घरावर छापा टाकला. दानिशला यापूर्वीच अटक करण्यात आली असून तो गझवा-ए-हिंद व्हॉट्सअॅपचे समुह चालवत असे. फुलवारी शरीफच्या मुनीर कॉलनीसह दोन ठिकाणी एनआयएने पीएफआय आणि गजवा-ए-हिंदशी संबंधित संशयितांच्या घरांवर छापे टाकले. एनआयएच्या पथकाने गझवा-ए-हिंद आरोपी मरगुब दानिशच्या घरातून अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत.