२०२४ मध्ये भाजपचे बहुमताचे सरकार आणण्याची जबाबदारी आमची
18 Oct 2022 20:58:28
राहुल लोणीकर
मुंबई : 'भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पद देणे ही माझ्यासाठी नक्कीच मोठी बाब आहे. माझ्यापूर्वी देशाच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेल्या अनेकांनी या पदावर काम करून पदाची उंची वाढवलेली आहे. त्यामुळे ही जबाबदारी निभावणे माझ्यासाठी अत्यंत मोठी बाब आहे. भाजपचा महाराष्ट्रातील प्रभाव तसाच कायम ठेवण्यासाठी आणि २०२४ मध्ये भाजपचे बहुमताचे सरकार आणण्याची जबाबदारी युवा मोर्चा देखील निभावेल,' असा विश्वास भाजप युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष म्हणून राहुल लोणीकर यांच्या नावाची नुकतीच घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या प्रदेशाध्यक्ष पदी झालेली नियुक्ती आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर लोणीकर यांनी 'मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यावर काय भावना आहेत ?
भाजप युवा मोर्चा माझ्यासाठी नवीन नाही. मी गेली अनेक वर्षे भाजप युवा मोर्चामध्ये सक्रियपणे कार्यरत असून यापूर्वी मी विद्यार्थी आघाडी, प्रदेश उपाध्यक्ष, महामंत्री आणि आता युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पक्षातील सर्वच वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला संधी त्याचे नक्कीच सार्थक करेल अशी ग्वाही या निमित्ताने देऊ इच्छितो.
राज्यात राजकीय संघर्ष सुरु असताना प्रदेशाध्यक्ष पदी निवड होणे कितपत आव्हानात्मक आहे ?
'काही महिन्यांवर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने भाजप युवा मोर्चाचे संघटन बळकट करणे आणि त्याची व्याप्ती वाढवणे ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब असणार आहे. भाजप हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिलेला आहे नव्हे तर तो विक्रमच भाजपने मागील ८ वर्षांमध्ये प्रस्थापित केला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून येत्या काळात भाजपला तळागाळात रुजवणे, सरकारची जनताभिमुख कामे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि युवा मोर्चाचे संघटन मजबूत करून त्याचा पक्षाला फायदा करून देणे ही आव्हाने माझ्यासमोर असून संघटनेला सोबत घेऊन ही कामे करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.'
राज्यात सुरु असलेल्या राजकीय संघर्षात युवा मोर्चाची भूमिका काय ?
'मुळातच राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर भाजप युवा मोर्चाने भाष्य करणे उचित ठरणार नाही. परंतु, ३ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो निर्णय घेतला, तो अत्यंत धाडसी आणि सर्वसामान्य शिवसैनिकांना अपेक्षित असा होता. सामान्य शिवसैनिकांची भावना जोपासण्याचा आणि त्यानुसार भाजपशी नैसर्गिक युती करण्याचा त्यांचा निर्णय अतिशय योग्य होता, त्यातून बाळासाहेबांचे विचार शिंदेंनीच जोपासले हे स्पष्ट आहे. काँग्रेसशी कदापि युती न करण्याची भूमिका घेणाऱ्या बाळासाहेबांच्या वंशजांनी त्यांचा पक्षच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला होता आणि आजही परिस्थिती तीच आहे. त्यामुळे भाजपशी युती करण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्णय बाळासाहेबांना अभिप्रेतच आहे,' अशी भावना राहुल लोणीकर यांनी शिवसेनेतील अंतर्गत वादावर बोलताना व्यक्त केली आहे.
युवा मोर्चाचे पुढचे व्हिजन काय असणार ?
भारत हा युवकांचा देश म्हणून आपली कीर्ती प्रस्थापित करत आहे. देशाची पुढील वाटचाल ही युवकांच्या योगदानावर अवलंबून असून युवकांचे स्थान या जडणघडणीत महत्त्वाचे राहणार आहे. देशावर ६० वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसच्या राजवटीची आणि भाजपच्या ८ वर्षांच्या सुशासन पर्वाची तुलना करून त्याचे चुकीचे मूल्यांकन १८ ते २५ वयोगटातील तरुणांच्या डोक्यात भिनवण्याचे काम काही घटकांकडून केले जात आहे. या युवकांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणाऱ्या घटकांना बाजूला सारणे आणि त्या लक्षावधी तरुणांना भाजपशी जोडणे हे आमचे लक्ष असून युवा मोर्चा म्हणून आम्ही त्यासाठी तत्पर आहोत.'