मुंबई : मराठा समाजातील युवकांच्या सामाजिक आणि आर्थिक उत्थानासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात याबाबत घोषणा केली होती. अखेरीस सोमवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारकडून या बाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून २६ जिल्हांतील सुमारे ३० हजारांहून अधिक युवक आणि महिलांना आत्मनिर्भर बनविण्यात पुढाकार घेण्यात आला होता. त्यावेळेसही महामंडळाची जबाबदारी अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याच खांद्यांवर टाकण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे मराठा समाजातील युवकांसाठी नवनवीन योजना निर्माण होतील आणि त्यातून मराठा समाजाचा आर्थिक विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठा समाजाला प्रगत करण्याचे स्वप्न पूर्ण करणार !
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील या हिंदुत्ववादी सरकारने माझ्यावर सोपवलेली ही जबाबदारी निश्चितच मोठी आहे. राज्यातील एक लाख मराठा युवकांना उद्योजक बनवण्याचा संकल्प आम्ही घेतला असून येत्या दीड वर्षात तो सिद्धीस जाईल यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत महामंडळाच्या योजना पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. मराठा समाजासाठी बनवण्यात आलेल्या योजनांना व्यापक स्वरूपात विस्तारणे आणि त्यातून अधिकाधिक लाभ पोहोचवणे यावर आमचा फोकस असेल. महामंडळाचे कार्य विस्तारून मराठा समाज आर्थिकदृष्ट्या प्रगत करणे हे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत.'
- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र