ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे (गायमुख) चौपाटीला दोन वर्षातच अवकळा

17 Oct 2022 17:47:41
 

गायमुख चौपाटीवर स्वच्छतागृहाचे डर्टी पिक्चर, वीजेअभावी अंधाराचे साम्राज्य


ठाणे,

  ठाण्यातील घोडबंदर रोडवरील बाळासाहेब ठाकरे (गायमुख) चौपाटी दोन वर्षांपूर्वी सुरू झाली. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी या चौपाटीला अवकळा आली आहे. या चौपाटीवरील शौचालयांची दुरवस्था झाली असुन वीजेचे खांब असूनही वीजच नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे चौपाटीवर अनुचित प्रकार घडू शकतात. गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता चौपाटीही सुरक्षित नसल्याचा आरोप  मनसे जनहित व विधी विभागाकडून करण्यात आला आहे.


  ठाण्यातील गायमुख येथे ठाणे महापालिका आणि महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यांच्या सहयुक्त विद्यमाने मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर चौपाटी विकसित करण्यात आली. ठाण्यातील ही पहिलीच चौपाटी असुन या चौपाटीचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ऑगस्ट २०१९ ला करण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या वतीने या प्रकल्पासाठी तसेच जोडकामांसाठी सुमारे ४० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. ठाण्यातील नागरिकांना मनोरंजन व विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी ही चौपाटी विकसित करण्यात आली. शिवाय चौपाटीला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले असून दोन वर्षातच चौपाटीची झालेली दुरावस्था धक्कादायक आहे.

 कोट्यवधी खर्चूनही चौपाटी अंधारात 

चौपाटीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे सुरक्षारक्षकही दिसून येत नाही. चौपाटीवर लावण्यात आलेले विद्युत खांब सुस्थितीत आहेत मात्र विद्युत प्रवाह सुरू नाही. त्यामुळे या अंधाराच्या साम्राज्यात पर्यटक खाडीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौपाटीवरील स्वच्छतागृहात वीज व पाण्याची व्यवस्था नाही शिवाय प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. जे नळ बसविण्यात आले होते तेही गायब झालेले आहेत.तर रात्री इथे मद्यपी लोकांचा सर्रास वावर असून जागोजागी दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. ठाणेकरांसाठी एकमेव लाभलेल्या चौपाटीवर अनेकजण विरंगुळ्यासाठी येत आहेत. पण अवघ्या दोन वर्षातच त्याची दुरावस्था झालेली पहायला मिळते.


नूतन आयुक्तांनी दखल घ्यावी

गायमुख चौपाटीची झालेली दुरवस्था ही खूपच धक्कादायक असून यास महारष्ट्र मरीटाईम बोर्ड तसेच ठाणे महापालिका प्रशासन जबाबदार आहे. ठाण्यातील या महत्वाकांक्षी प्रकल्पांविषयी पालिका प्रशासन किती जागृत आहे याची कल्पना नव्या आयुक्तांना यावी. हीच अपेक्षा आहे.

- स्वप्नील महिंद्रकर, शहर अध्यक्ष,मनसे जनहित व विधी विभाग 

Powered By Sangraha 9.0