सर्पमित्र व प्राणीमित्रांनी केली दुर्मिळ अलबिनो जातीच्या सर्पाची सूटका
ठाणे: ठाण्यातील सर्पमित्र किशोर साळवी यांनी एका "तस्कर’’’ जातीच्या (दुर्मिळ अलबिनो) सर्पाची सुटका केली. तस्कर हा भारतात आढळणारा बिनविषारी सर्प असुन त्याचे रंगरूप लोभस असते.या सर्पाला जीवदान देऊन त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.अशी माहिती वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे प्राणीमित्र पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर शिरसाठ यांनी दिली.
कळवा पारसिकनगर येथील गॅलक्सी टॉवर समोरील भंगारवाल्याच्या दुकानात हा दुर्मिळ साप आढळल्याची माहिती मिळताच जीवोहम चॅरिटीजचे सभासद सर्पमित्र साळवी यांनी ताकाळ धाव घेत सापाची सूटका केली. पशुवैद्यक डॉ. किरण शेलार यांनी सापाची सुदृढता तपासून त्याला वनअधिकारी संदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे जीवोहमचे अध्यक्ष चंद्रकांत कंग्राळकर यांनी सांगितले. अश्या प्रकारचे सर्प क्वचित पाहण्यास मिळतात. असे साप रेस्क्यु करणे ही सर्पमित्रांसाठी पर्वणीच असते.असेही कंग्राळकर यांनी यावेळी सांगितले.
निसर्गाचा अदभुत अविष्कार असलेला 'तस्कर'
तस्कर (Trinket snake) हा भारतात आढळणारा निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट स्नेक म्हणतात, रेस्क्यू केलेल्या अलबिनो सापाची लांबी साधारणपणे १ फुट आहे. रंगद्रव्य (मेलॅनिन) च्या कमतरतेमुळे इतर सापांपेक्षा हा वेगळा दिसतो. रंगहीन असल्यामुळे त्याला अलबिनो असे म्हणतात. सरडे, पाली, उंदीर हे त्यांचे खाद्य आहे.निसर्गाने सापाच्या शरीरावर केलेली नानाविध रंगांची उधळण अदभुत आहे. त्यामुळे,या सापांना निसर्गात बेमालूमपणे मिसळून शिकार करता येते.शिवाय स्वतःचा बचाव देखील करता येेतो.तस्कर साप दुर्मिळ असल्याने क्वचितच आढळतात त्यामुळे अश्या सापांचे संरक्षण व संगोपन होऊन त्यांचे जतन होणे गरजेचे आहे.
- ज्ञानेश्वर शिरसाठ, प्राणीमित्र पोलीस