राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील बहुजन चळवळीचे ‘स्वयंघोषित पुढारी’ म्हणवल्या जाणार्याज छगन भुजबळ यांच्या ७५व्या जन्मदिनाच्या औचित्यावर मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिल्लक राहिलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि इतर मातब्बर मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमात सत्कारमूर्ती भुजबळांवर कौतुकाचा वर्षाव करताना उद्धव ठाकरेंनी जी काही स्तुतिसुमने उधळली आहेत, त्यावरून बाळासाहेबांनी उल्लेख केलेले ‘लखोबा’ हेच का? असा प्रश्न सर्वसामान्य पण कडवट शिवसैनिकाला पडल्याशिवाय राहिला नसेल.
‘मंडल-कमंडल’चा वाद आणि राजकीय महत्त्वाकांक्षांना फुटलेले धुमारे भुजबळांना शिवसेनेतून काँग्रेसमध्ये घेऊन गेले. मात्र, त्यांच्यातील मूळ आक्रमक शिवसैनिक त्यांच्या कार्यशैलीतून सातत्याने दिसत होता, हे नाकारून चालत नाही. असो. ‘भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते केव्हाच मुख्यमंत्री झाले असते’ असे नेहमीप्रमाणे एक मोघम विधानदेखील याच कार्यक्रमात केले खरे, पण त्यात वास्तविकता किती याचा मागमूसही त्यांनी घेतला नाही किंवा तो त्यांनाही आला नसावा.
विरोधी पक्षनेते पद मिळालं नाही म्हणून भुजबळ शिवसेनेलाच ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यामुळे ज्या व्यक्तीला विरोधी पक्षनेते पद देताना शिवसेनेने बाजूला सारले, त्यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असता का? याचे उत्तर अभ्यास न करतादेखील देता येऊ शकेल. तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे ५० आमदार घेऊन बंड करून मुख्यमंत्री झाले. पण, ही कथित क्रांती भुजबळांनी ३० वर्षांपूर्वीच केली होती.
भुजबळ असोत राणे असोत राज ठाकरे असोत वा एकनाथ शिंदे, ही सगळी मातब्बर मंडळी शिवसेनेतील उद्धव ठाकरेंच्या एककलमी नेतृत्वाच्या जाचाला कंटाळूनच बाहेर पडली होती. जेव्हा राज्यात शिवसेनेशिवाय सत्ता येत नाही, हे स्पष्ट झाले तेव्हा उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे मुख्यमंत्रिपद ठेवले आणि पक्षप्रमुख पदाची वस्त्रेदेखील इतरांकडे दिली नाही, हा इतिहास. त्यामुळे भुजबळ, तुम्ही सेनेत कायम राहिले असते आणि शिवसेनेची सत्ता येण्याची परिस्थिती निर्माण झाली असती, तर उद्धव ठाकरे आणि मंडळींनी तेव्हाच तुमचाही ‘एकनाथ शिंदे’ करून टाकला असता, हे वास्तव तुम्हालाही नाकारून चालणार नाही!
ऐसी श्रीमंती सर्वांसी लाभो!
'महाराष्ट्र सदन’ घोटाळ्यात अडीच वर्षे कारागृहात राहिलेले आणि त्यानंतर लगेचच राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न नागरीपुरवठामंत्री म्हणून शेखी मिरवणार्यात छगन भुजबळांचा अभीष्टचिंतन सोहळा परवा अगदी भव्यतेने साजरा करण्यात आला. यावेळी भुजबळांनी आपल्या मळलेल्या आणि भ्रष्टाचार तथा गैरप्रकाराचे भरगच्च आरोप लागलेल्या कारकिर्दीचे जणूकाही सिंहावलोकन करावे, अशा अविर्भावात वर्णन करत आपल्या कथित संघर्षाची गाथा सर्वांसमक्ष मांडली. त्यावेळी बोलताना भुजबळांनी आपण आर्थिक बाबतीत इतके श्रीमंत कसे झालो, याबाबत खुलासा करताना आम्ही मोठमोठ्या कंपन्यांना भाज्या विकायचो, मेहनत करायचो म्हणून आम्ही इतके श्रीमंत आहोत, असं छातीठोकपणे सांगितलं.
म्हणजे भाजी विकून एखादा व्यक्ती देशभरात संपत्तीचे जाळे उभारू शकतो, याचा परिपाठच भुजबळांनी घालून दिला आहे. याला समांतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे पवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केलेल्या उल्लेखात शेतीतून आलेल्या शंभर कोटींच्या उत्पन्नाची बाब निवडणूक आयोगासमोर सांगितली होती. म्हणजे एका बाजूला शेतीमालाला हमीभाव मिळत नाही म्हणून मरेस्तोवर कष्ट करणारे शेतकरी आहेत आणि दुसरीकडे मात्र शेतीत वांगी पिकवून आणि त्या भाज्या विकून कोट्यधीश होणारी ही नेतेमंडळी.
व्यवस्था आणि तिची वास्तविकता म्हणजे काय, याची ही मूर्तिमंत उदाहरणे. भाजी विकून शेकडो कोटींचे साम्राज्य उभारणार्या भुजबळांनी कमावलेली संपत्ती मोजायला आणि त्याची किंमत ठरवायला पाच दिवस लागले होते म्हणे. असो. बाळासाहेबांना ‘टी बाळू’ म्हणून उल्लेखित करणारे आणि त्यांना कारागृहात घालण्याचे कृत्य करणारे भुजबळ आता ठाकरेंसाठी महत्त्वाचे ठरले आहेत, त्याला ‘राजकीय लाचारी’शिवाय दुसरा शब्द मराठी शब्दकोशात सापडणार नाही. तेलगीने ‘भुजबळ-पवार म्हणजे आमचा गॉड’ असे म्हटले होतं. आपण कशाला बोला? जाऊ द्या. सारांश काय तर भाज्या विकून शेकडो कोटी कमावणारे ‘मफलर हिरो’ भुजबळ आणि १०० कोटींच्या भाज्या पिकवणार्याप सुप्रियाताई पाहिल्या की, ऐसी श्रीमंती सर्वांसी लाभो, हीच भावना प्रत्येकाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.