रशिया-युक्रेन युद्धातील अण्वस्त्र धमकी - धोक्याची घंटा

15 Oct 2022 21:58:06

रशिया-युक्रेन
 
 
 
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी अण्वस्त्रांच्या वापराची धमकी दिल्यानंतर अमेरिकेच्या जपानवरच्या अणुयुद्धाची आठवण होणे अगदी स्वाभाविक. आता पुतीन हे रशियन हितसंबंधांच्या आड येणार्‍यांना धडा शिकवण्याची धमकी देत आहेत. युक्रेन युद्धाचा त्यांना समाधानकारक वाटणारा अंत अद्याप दूरच असल्यामुळे ही धमकी प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता सर्वांनीच गृहीत धरायला हवी.
 
 
कमी क्षमतेचे, लहान अणुबॉम्ब
 
 
रशियाने अण्वस्त्रांचा वापर समजा केलाच, तर तो युक्रेननजीकच्या काळ्या समुद्रात, समुद्रतळाशी स्फोट घडवून घबराट वाढवण्यापुरता असेल, असा अंदाज काही तज्ज्ञ व्यक्त करतात. तसेच हा स्फोट निर्जन ठिकाणीच घडवला जाईल. यामुळे कमी क्षमतेचे, लहान अणुबॉम्ब हा पुन्हा एकदा चर्चेतला विषय ठरला आहे. रशिया कदाचित कमी क्षमतेचेही अण्वस्त्र वापरेल आणि क्षेपणास्त्राद्वारे ते डागले जाईल- तसे झाल्यास हिरोशिमाच्या एकतृतीयांश संहार होऊ शकतो. कमी क्षमतेचे अण्वस्त्र मर्यादित प्रदेशाला बेचिराख करू शकते. त्याने तत्काळ होणारी हानी जरी प्रचंड नसली तरी, किरणोत्साराचा धोका मात्र संहारक असू शकतो. जमिनीवरूनच सोडली जाणारी ही क्षेपणास्त्रे रशियाच्याच भूमीवरूनही युक्रेनमधील लक्ष्यापर्यंत मारा करू शकतात. मात्र, प्रत्यक्षात अण्वस्त्राचा वापर ही रशियाची धमकीच राहण्याची शक्यता सर्वाधिक आहे असे वाटते.
 
 
अमेरिकेने शीतयुद्धाच्या काळात ‘कमी क्षमतेच्या अण्वस्त्रांची चाचपणी सुरू केली होती. अमेरिकेकडे/‘नाटो’कडे 1970च्या दशकात 7 हजार, 400 हून अधिक अण्वस्त्रे होती आणि रशियाकडे त्यावेळी ‘नाटो’पेक्षा कमी अण्वस्त्रे होती. अमेरिकेने 1970च्या दशकात स्वत: पाठीवरील ‘मावेल इतक्या- आकाराचा आणि साधारण 70 पौंड म्हणजे 31 किलो वजनाचा-अणुबॉम्ब निर्माण केले होते. एखाद्या जीपवरूनही हा बॉम्ब डागता येईल, अशी क्षमता अमेरिकेने तयार ठेवली होती.
 
 
रशियाचा आण्विक धोका रोखण्यासाठी जागतिक कारवाईची गरज
 
 
गेल्या काही आठवड्यात युक्रेनच्या सैन्याने रशियावर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर भूभाग पुन्हा ताब्यात घेतला आहे. यामुळे रशियन सैन्याला दीर्घकाळ ताब्यात असलेल्या अनेक भागांचा ताबा सोडावा लागला आहे.
दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या चार भागांचा ताबा घेतल्याची घोषणा केली आहे. रशियाच्या ताब्यातील भागांचं रक्षण करण्यासाठी लहान अण्वस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो, असं पुतीन आणि इतर वरिष्ठ रशियन अधिकार्‍यांनी सुचवलं होतं.
 
 
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले, “पुतीन त्यांच्या नागरिकांना अण्वस्त्रांचा वापर करण्यासाठी तयार करत आहेत, हे धोकादायक आहे.”
 
 
रशियानं अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, “यामुळे जग निर्णायकीच्या उंबरठ्यावर आलं आहे. शीतयुद्धाच्या वेळी क्युबामध्ये जी वेळ आली होती त्यानंतर आत्ता ही वेळ येऊन ठेपली आहे.”
 
 
झेलेन्स्की म्हणाले की, “रशियाच्या धमक्या म्हणजे संपूर्ण जगासाठी धोका आहे. युरोपमधील सर्वांत मोठे अणुकेंद्र ‘झापोरीझिया’ अणुऊर्जा प्रकल्पाला रशिया ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकल्प रशियात समाविष्ट करण्याचा पुतीन यांचा प्रयत्न आहे,”असा दावा झेलेन्स्की यांनी केला आहे.
 
 
जग तत्काळ रशियाच्या व्याप्तीची कृती थांबवू शकतं. जग रशियानं अणुऊर्जा प्रकल्प सोडावा यासाठी सर्वकाही करू शकतं असे ते म्हणाले.
 
 
फक्त अमेरिकेकडेच अण्वस्त्रे होती. दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेने अण्वस्त्रांचा वापर केला; त्यावेळी फक्त अमेरिकेकडेच अण्वस्त्रे होती. नंतर अनेक देश अण्वस्त्रधारी बनले. त्यामुळे दहशतीचा समतोल निर्माण झाला. परिणामी, अण्वस्त्रधारी देशात प्रत्यक्ष युद्ध होणार नाही, असा सिद्धांत मांडला गेला. परंतु, कारगिल युद्धाने तो खोटा ठरवला. युक्रेनमध्ये युरोपमधील सर्वांत मोठा अणुप्रकल्प असूनही रशियाने या देशावर आक्रमण केले.
 
 
रशिया-युक्रेन युद्धाच्या सात महिन्यांच्या काळात काही वेळा या युद्धाचे रुपांतर आण्विक युद्धात होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.
 
 
रशियाकडून धमक्या दिल्या गेल्या, ‘नाटो’ ही लष्करी संघटना या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाली, तर आम्ही त्याचा प्रतिकार अण्वस्त्रांनी करू.
 
 
1990-91च्या पूर्वी युक्रेन हा सोव्हिएत संघाचा भाग होता. तेव्हा, रशियाचे अनेक न्युक्लिअर प्लांट युक्रेनमध्ये होते. तसेच, रशियाची काही अण्वस्त्रेही युक्रेनमध्येच होती. युरोपमधील सर्वांत मोठा आण्विक प्रकल्प हा युक्रेनमध्येच आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये या प्रकल्पाच्या भोवतालच्या काही इमारतींना आग लागण्याच्या घटना घडल्या.
 
 
रशियाने हा न्युक्लिअर प्लांट उडवण्याची धमकी दिली असल्याच्या बातम्याही मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या. पुन्हा एकदा अण्वस्त्र आणि अण्वस्त्रांमुळे निर्माण होणारी असुरक्षितता आणि अणुयुद्धाची चर्चा सुरू झाली आहे.
 
 
अण्वस्त्र हल्ल्यांची धमकी देऊन ‘ब्लॅकमेलिंग’ करण्याचे प्रकारही झाले आहेत. उत्तर कोरियाने अणुहल्ल्याची धमकी देऊन अमेरिकेकडून पैसे उकळल्याच्या घटनाही घडल्या आहेत. परंतु, संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य असणारा रशिया अणुहल्ल्याची धमकी देत असल्यामुळे याचे गांभीर्य अधिक आहे.
 
 
 

रशिया-युक्रेन

 
 
 
अण्वस्त्र स्पर्धेची सुरुवात रशिया आणि अमेरिकेमुळे
 
 
अण्वस्त्र स्पर्धेची सुरुवात रशिया आणि अमेरिका यांच्यामुळे झाली. दुसर्‍या महायुद्धादरम्यान 1945 मध्ये नागासाकी आणि हिरोशिमा या जपानच्या शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. त्यानंतर रशियाने अणुबॉम्बची निर्मिती केली. नंतर हायड्रोजन बॉम्ब, रासायनिक अस्त्रे, जैविक अस्त्रे बनवण्यात आली. यातून एक भयंकर स्पर्धा जगात आकाराला आली. त्यानंतर रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान यांसारख्या देशांकडे अण्वस्त्रे आली. परंतु,याचा परिणाम असा झाला की, 1945 ते 2022 या काळात एकदाही अणुबॉम्बचा किंवा अण्वस्त्रांचा वापर केला गेला नाही.
 
 
यामागे जग एक सिद्धांत मांडला आहे. त्यानुसार दुसर्‍या महायुद्धात अण्वस्त्रांबाबत अमेरिकेला प्रतिस्पर्धी नव्हता. त्यामुळे यामध्ये समतोल नव्हता. नंतरच्या काळात अन्य देशांकडे अण्वस्त्रे आल्यामुळे ‘बॅलन्स ऑफ टेरर’ निर्माण झाला. थोडक्यात, एकाहून अधिक राष्ट्रांकडे अण्वस्त्रे आल्यामुळे परस्परांचा धाक निर्माण झाला. यावरून ‘म्युच्युअली अ‍ॅश्युअर्ड डिस्ट्रक्शन’(‘मॅड थिअरी)’ मांडण्यात आली. ‘मॅड’ या संकल्पनेवरील आधारित आजवरची विश्वरचना होती. याचा अर्थ दोघांचाही खात्रीलायक परस्पर विध्वंस. म्हणजेच, अमेरिका आणि रशिया या दोघांकडेही अण्वस्त्रे असल्यामुळे अमेरिकेने अणुहल्ला केल्यास रशियाही त्याला जशास तसे प्रत्युत्तर देईल, अशा स्थितीत दोघांचेही नुकसान होऊ शकते.
 
 
कारगिल संघर्षाने युद्ध घडणार नाही, या सिद्धांताला पहिला छेद केवळ अण्वस्त्र संघर्षच नव्हे, तर अण्वस्त्रधारी देशांमध्ये एकंदरीतच युद्ध घडणार नाहीत, असा समज दृढ झाला. अमेरिका-रशिया यांच्यात तेव्हापासून आतापर्यंत प्रत्यक्ष युद्ध न झाल्यामुळे हा समज अधिक दृढ बनला. भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून या सिद्धांताला छेद दिला गेला. 1998 मध्ये भारताकडे अण्वस्त्रे आली. त्यानंतर पाकिस्ताननेही स्वत:ला अण्वस्त्रधारी देश म्हणून जाहीर केले. परंतु, 1999 मध्ये कारगिल संघर्षाने या सिद्धांताला पहिला छेद दिला गेला.
 
 
एकविसाव्या शतकात विकसित होऊ लागलेला अणुशस्त्रे प्रसार धोक्याची घंटा आहे. अण्वस्त्राचा वापर खरोखरच रशियाने केला, तर रशियावर निर्बंध लादण्याची संधी ‘नाटो’ व अमेरिका सोडणार नाहीच, शिवाय चीन वा भारतासारख्या देशांवरही रशियाशी कोणतेही संबंध न ठेवण्यासाठी दबाव आणला जाईल. हे परिणाम रशियालाही नकोच आहेत.
 
 
 
 
रशिया-युक्रेन
 
 
 
अण्वस्त्रांचा प्रसार आणखी वाढणार
 
 
रशिया-युक्रेन संघर्षानंतर अण्वस्त्रांचा प्रसार आणखी वाढणार आहे. कारण, रशियाने आक्रमण केल्यानंतर अमेरिका आपल्या मदतीला येईल याची युक्रेनला खात्री होती. परंतु, अमेरिका प्रत्यक्ष मदतीला आला नाही. जपानच्या राज्यघटनेमध्ये असणार्‍या ‘कलम 9’नुसार या देशाला स्वत:चे लष्कर विकसित करण्याचा अधिकार नाही. पण, आज जपान घटनादुरुस्ती करून लष्करीकरण करत आहे. दक्षिण कोरियानेही अण्वस्त्रांसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ऑस्ट्रेलियानेही आण्विक पाणबुडीसाठी इंग्लंडसोबत करार केला आहे. या सर्वांतून एक अण्वस्त्र स्पर्धा आकाराला येऊ लागली आहे, अशा चिंताजनक परिस्थितीमध्ये रशियाकडून अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या जाणे हे जगाच्या शांततेसाठी, स्थैर्यासाठी अत्यंत धोकादायक आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0