कोण आहेत बाळ्यामामा? ज्यांनी केलायं बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश?

    14-Oct-2022
Total Views |

1

 


ठाण्यात शिंदे गटाची ताकद वाढली... सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामाकडे भिवंडी लोकसभेच्या संपर्क प्रमुुख पदाची धुरा

 


ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिलेल्या सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, यांनी अखेर बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळ्या मामा शिंदे गटात जाणार असल्याचे वृत्त दहा दिवसांपूर्वीच दै.मुंबई तरुण भारत ने दिले होते.गुरुवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन शिवसेना- भाजप युती सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला.

शिवसेनेकडून त्यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीचे पत्र बाळ्यामामा यांना सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, माजी आमदार अशोक पाटील, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के,शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, शहापूर शहरप्रमुख आकाश सावंत आणि शिवसेनेचे मुरबाड-शहापूर तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाळ्या मामा यांनी सहाव्यांदा पक्ष बदलला असला तरी ते पुन्हा शिवसेनेत परतल्याने शिंदे गटाची ठाणे जिल्ह्यात ताकद वाढली आहे.मात्र, वारंवार पक्ष बदलणाऱ्या बाळ्या मामा यांना सत्तेची लालसा असल्याची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष असलेल्या सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी ३ ऑक्टो. रोजी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवला होता. वैयक्तिक कारणाने जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हात्रे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले होते.


कोण आहेत बाळ्यामामा ?

  भिवंडीच्या राजकिय पटलावरील बडे प्रस्थ अशी ख्याती असलेल्या बाळ्या मामा यांनी वारंवार पक्ष बदलले आहेत.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बाळ्यामामा यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यानंतर पुढे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली. त्यांची ही भूमिका शिवसेनेला मान्य नव्हती. त्यानंतर शिवसेनेने बाळ्यामामा म्हात्रे यांच्यावर कारवाई केली. तेव्हा तब्बल दोन वर्ष बाळ्यामामा निर्णय प्रक्रियेपासून दूर राहिले. त्याचदरम्यान पक्षाकडून दुर्लक्षित राहिल्याची भावना निर्माण झाल्याने नाराज बाळ्यामामानी २०२१ मध्ये शिवसेना सोडली होती.त्यानंतर, काँग्रेसला चुचकारत पुन्हा राष्ट्रवादीची कास धरली होती.मात्र, राज्यात सत्तांतर होताच राष्ट्रवादीलाही रामराम ठोकुन आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.




 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.