खरे म्हणजे, रशियावर प्रश्न विचारुन भारताला कोंडीत पकडावे, असे पाश्चात्यांना वाटत असते. त्या वाटण्यातूनच असे प्रश्न उपस्थित होत असतात, पण भारत त्यात अडकत नाही. उलट पाश्चात्यांनाच तोंडावर पाडत असतो, जसे आता झाले.
भारताला रशियाविरोधात उसकवण्यासाठी पाश्चात्य देश सातत्याने काम करत असतात. चालू वर्षाच्या फेब्रुवारीत आपल्याला चहुबाजूंनी घेरण्याचे पाश्चात्यांचे राजकारण लक्षात आलेल्या रशियाने युक्रेनविरोधात संघर्ष पुकारला. त्यातही भारताने रशियाविरोधात भूमिका घेऊन युक्रेनला पाठिंबा द्यावा, अशी पाश्चात्यांची इच्छा होती. भारताने मात्र तसे न करता वेळोवेळी शांततामय मार्गाने, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवला जावा, असेच म्हटले. त्यादरम्यान, अमेरिकेसह पाश्चात्यांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याचे प्रयत्न केले. त्यानुसार, भारतासह जगभरातील देशांनी रशियाकडून कच्चे तेल व हत्यारे खरेदी करु नये, असे पाश्चात्यांचे म्हणणे होते.
अर्थात, भारताने त्याला काडीचीही किंमत दिली नाही अन् रशियाकडून कच्च्या तेलासह शस्त्रास्त्रखरेदी सुरुच ठेवली. त्यालाच अनुसरून, ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेलेल्या परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना, “भारत रशियन हत्यारांवरील अवलंबित्व कमी करून रशियाबरोबरील संबंधांचा पुनर्विचार करेल का,” असा प्रश्न विचारण्यात आला. पण, पत्रकाराने विचारलेला प्रश्न विरतो न विरतो तोच, एस. जयशंकर यांनी पाश्चात्यांना रोखठोक शब्दांत सुनावले. “भारताकडे सोव्हिएत संघ आणि रशियन हत्यारांची संख्या अधिक आहे. कारण, पाश्चात्यांनी आमच्या भौगोलिक क्षेत्रातील पसंतीचा सहकारी म्हणून एका लष्करी हुकूमशाहीची (पाकिस्तान) निवड केली आणि दशकानुदशकांपर्यंत भारताला शस्त्रपुरवठा केला नाही,” असे एस. जयशंकर म्हणाले. खरे म्हणजे, रशियावर प्रश्न विचारुन भारताला कोंडीत पकडावे, असे पाश्चात्यांना वाटत असते. त्या वाटण्यातूनच असे प्रश्न उपस्थित होत असतात, पण भारत त्यात अडकत नाही. उलट पाश्चात्यांनाच तोंडावर पाडत असतो, जसे आता झाले.
पाश्चात्य देशांनी भारताला दुबळे करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. पण, भारताला कमअस्सल ठरवण्याच्या धोरणाचे परिणाम आज त्यांनाच भोगावे लागत आहेत. आपण मदत न केल्यास भारत कधीही आर्थिक व संरक्षण क्षेत्रात भरारी घेऊ शकत नाही, अशा अहंकारात पाश्चात्य नेतृत्व वावरत होते. पण, झाले उलटेच, भारताने स्वातंत्र्यापासूनच सावकाश का होईना, पण प्रगतीचे वेगवेगळे टप्पे पार केले. आज तर भारत प्रत्येक आघाडीवर अव्वल असून जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तसेच अनेक देश भारतीय संरक्षण साहित्याची, हत्यारांची आयात करत आहेत. आपल्या संरक्षण गरजांची पूर्तता करण्यासाठी भारत रशियाकडून शस्त्रे खरेदी करत आहे. तेच पाश्चात्यांना आवडत नाही. एकेकाळी भारत रशियाविषयीच्या प्रश्नांवर थेट उत्तर देणे टाळत असे. पण, गेल्या काही वर्षांपासून भारत त्यातही मागे राहिला नसून पाश्चात्यांच्या प्रश्नांना ‘जशास तसे’ उत्तर देण्याचे काम करत आहे. एस. जयशंकर यांनी दिलेले उत्तर त्याचाच दाखला व त्यात खोटे वा चुकीचे काहीच नाही.
पाकिस्तान स्वातंत्र्यापासूनच भारताची कुरापत काढत आला. तथापि, समोरासमोरच्या युद्धात भारताने वारंवार मात दिल्याने पाकिस्तानने घुसखोरीचा, दहशतवादाचा मार्ग स्वीकारला. तरीही त्याला मदत करण्याचे धोरण ना अमेरिकेने बदलले ना पाश्चात्यांनी. भारताची खोड काढण्यासाठी सदैव उत्सुक असलेल्या पाकिस्तानला अमेरिकेसह पाश्चात्यांनी हत्यारे दिली, पैसाही दिला. एका अंदाजानुसार, 1948 ते 2013 पर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला 30 अब्ज डॉलर्सची मदत केली व त्यातली निम्मी मदत पाकिस्तानी लष्करासाठी होती. कारण, अमेरिका पाकिस्तानला सोव्हिएत संघाविरोधातील आपला घनिष्ठ सहकारी मानत असे. पाकिस्तान अमेरिकेला भारताविरोधातील मित्र समजत असे.
अमेरिकेने पाकिस्तानला ‘पॅटन’ रणगाडेदेखील दिले होते, त्याचा वापर पाकिस्तानने 1965च्या भारतविरोधी युद्धात केला. अर्थात, भारतीय सैनिकांनी ‘पॅटन’ रणगाड्यांचाही विध्वंसच केला. 1971च्या युद्धात भारताला अमेरिकेच्या मदतीची गरज होती, तेव्हाही अमेरिकेने भारताऐवजी पाकिस्तानला मदत देत आपले आरमार भारतीय समुद्री हद्दीत पाठवण्याची घोषणा केली होती. रशियाने मात्र भारताची गरज ओळखून तत्काळ युद्धात उडी घेतली अन् आपल्या आरमाराला भारताच्या मदतीसाठी पाठवत असल्याचे जाहीर केले. अमेरिकेने तर नुकतीच पाकिस्तानला ‘एफ-16’ लढाऊ विमानांच्या देखभालीसाठी 45 कोटी डॉलर्सच्या मदतीला मंजुरी दिली. अशा परिस्थितीत भारताने रशियाकडून शस्त्रास्त्र वा ‘एस-400’ क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणे साहजिकच, त्यावर पाश्चात्यांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही आणि जरी आक्षेप घेतला, तरी भारत त्याकडे ढुंकूनही पाहणार नाही.
जागतिक राजकारणात आपल्याजवळ जे असेल त्याच्याशी आपण व्यवहार करतो. भविष्यासह वर्तमान परिस्थितीतही आपल्या हिताचे असेल, असेच निर्णय आपण घेतो, असेही एस. जयशंकर पुढे आपल्या उत्तरादरम्यान म्हणाले. भारत-रशियातील वर्षानुवर्षांपासूनचे संबंध असेच आहेत. युक्रेन युद्धाचे कारण सांगत भारत त्यात खोडा घालू शकत नाही वा अमेरिकेसह पाश्चात्यांच्या दबावाखाली झुकून ते तोडू शकत नाही. ऑस्ट्रेलिया दौर्याआधी युरोप दौर्यावर असतानाही एस. जयशंकर यांनी पाश्चात्यांना चांगलेच सुनावले होते. तेव्हाही, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करुन युक्रेनविरोधातील युद्धादरम्यान रशियाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असल्याचे म्हटले गेले.
त्यावर ताडकन उत्तर देत एस. जयशंकर यांनी, भारत आपल्या देशातील जनतेचे हित पाहतो व भारताला स्वस्तात कच्चे तेल मिळत असेल, तर ते आम्ही नक्कीच खरेदी करु, असे म्हटले होते. तसेच युरोपीय देश रशियाकडून नैसर्गिक वायू खरेदी करतात, तो युक्रेनविरोधात रशियाला बळ देण्यासाठीच का, असा रोकडा सवालही विचारला होता. या सगळ्यातून एकच अर्थ निघतो तो म्हणजे, नव्या भारताचे परराष्ट्र धोरण आपले स्वतःचे आहे. ते दुसर्याला काय वाटते, यावर आधारलेले नाही, त्यावर कोणाचेही दडपण नाही, जे भारताच्या हिताचे असेल ते करणार, या सूत्रानुसार ते सुरू आहे. ‘आत्मनिर्भर भारता’चे याहून निराळे उदाहरण ते काय असू शकते?