‘प्रारंभ’जननी अरुंधती

13 Oct 2022 09:55:27

Dr. Arundhati Bhalerao

 
 
 
‘प्रारंभ कला अकॅडमी’ या सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थेच्या संस्थापिका तसेच लेखिका, ‘सेन्सॉर बोर्डा’च्या ज्युरी अशा हरहुन्नरी डॉ. अरुंधती भालेराव यांची कर्तृत्वगाथा...
 
 
 
डॉ. अरुंधती भालेराव यांचा जन्म विदर्भातील वर्ध्याचा. वर्धा म्हणजे गांधीजींचे सेवाग्राम आणि आचार्य विनोबा भावे यांचे पवनार. वर्ध्यातच बालपण, शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले. आई शिक्षिका, तर वडील प्राध्यापक असल्याने घरात शैक्षणिक वातावरण होते. वडील शशिकांत ठोंबरे कलासक्त असल्याने त्यांची ’कलासौरभ’ नावाची नाट्यसंस्था होती. अरुंधती व त्यांच्या दोन्ही बहिणी अभ्यासात तसेच गायनकलेत हुशार होत्या. आईही नाटकात काम करायची. तेव्हा, आई-बाबांसमवेत अरुंधती लहानपणी सायकलवर बसून तालमी पाहायला जात असे. त्यामुळे घरात सर्व जातिधर्माच्या माणसांचा राबता असल्याने कलागुण आणि सांस्कृतिक उपक्रमाचे बाळकडू अरुंधतीला घरातच मिळाले.
वडिलांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांशी घरोब्याचे संबंध असल्याने संघाची शिस्त त्यांना आजही भावते. घरात कुणीच जातपात मानत नव्हते, तरीही काकांनी सावरकरांच्या विचारधारेला वाहून घेतले होते. त्यांचे सासरे प्रा. चंद्रकांत भालेराव हे तर परभणीला झालेल्या 33व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यामुळे माहेरी तसेच सासरी वैचारिक वारसा त्यांना लाभला.
 
 
 
विनोबाजींच्या ‘गीताई’वरील परीक्षांमध्येही अरुंधती नेहमीच सहभाग घेत असत. गाव छोटंसं असलं तरी गावात ‘युवक बिरादरी’ची शाखा होती. या संस्थेत अरुंधतीला आपल्यातील कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना नृत्य व अन्य कला प्रदर्शनात केरळ, बनारस, राजस्थानात अरुंधतीने विद्यापीठाकडून प्रतिनिधित्व केले. पदवीनंतर नागपूर विद्यापीठातून महाराष्ट्रातील ‘बालरंगभूमी - एक चिकित्सक अभ्यास’ या विषयात त्यांनी ‘पीएच.डी’ केली असून पत्रकारितेचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. तसेच बी.एड् पदविकाही प्राप्त केली आहे. मात्र, शास्त्रीय नृत्य शिकण्याची इच्छा अपुरी राहिल्याची खंत अरुंधती व्यक्त करतात. त्यानंतर काही काळ त्यांनी ’ड्रामा टीचर’ म्हणून नाट्यशास्त्र शिकवले. घरात आई-वडिलांचे विचार आधुनिक असल्याने कडक शिस्त असली, तरी अभ्यासाव्यतिरिक्त व्यक्तिमत्वाच्या विकासाला प्राधान्य दिल्यानेच आजचं हे यश संपादित करता आल्याचे अरुंधती आवर्जून नमूद करतात.
 
 
 
2002 सालापासून ‘प्रारंभ कला अकॅडमी’ नावाची सांस्कृतिक, सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेच्या त्या प्रमुख आहेत. या संस्थेद्वारे त्या सहा ते 70 वयोगटातील सर्वांसाठी विविध अभिनव उपक्रम सातत्याने राबवितात. महिला व तरुणांना निवेदन व कथाकथनाचे धडे देणे तसेच महिला महोत्सव आणि उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांना ‘सौदामिनी पुरस्कारा’ने गौरविण्यात येते. ‘प्रारंभ’मध्ये दहा वर्षांपेक्षा अधिक काळ मार्गदर्शन घेणारे अनेक विद्यार्थी आहेत, जे शालेय, महाविद्यालयीन जीवनात व सामाजिक क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. अभिनयातून व्यक्तिमत्त्व विकास होतो, यावर ठाम विश्वास असल्याने त्यांनी अनेक ‘बॅक बेंचर्स’ विद्यार्थ्यांना अभिनयातून व्यक्तिमत्त्व विकासाअंतर्गत व्यासपीठ मिळवून दिले. बालमहोत्सवाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष त्या कार्यक्रम, स्पर्धांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना एकत्र आणत आहेत. अरूंधती यांची स्वतःची ‘ए.बी. इव्हेंट्स अ‍ॅण्ड प्रॉडक्शन्स’ नावाची संस्था असून, या माध्यमातून त्या विविध उपक्रमाचे सातत्याने आयोजन करतात.
 
 
 
आवड असेल सवड मिळतेच. त्यामुळे कुटुंब सांभाळून त्या सर्व छंद जोपासत आहेत. मुंबई आकाशवाणीवर सादरीकरण, शिक्षण, पत्रकारिता, सूत्रसंचालिका, हिंदी-मराठी कार्यक्रमांच्या निवेदिका, समुपदेशन, प्रेरणादायी भाषणे यासह विविध सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्रात आजही कार्यरत असून अनेक वनवासी पाड्यांवरदेखील सेवा देत आहेत. कर्करोग होऊच नये म्हणून जनजागृती त्याचबरोबर आरोग्य शिबिरे राबवतातच, तसेच घरकाम करणार्‍या महिलांसाठीही त्या सक्रिय असतात. याशिवाय ’ठाणे लघुउद्योग भारती’मध्ये महिला युनिटच्या प्रमुख आहेत. सर्वाधिक प्रायोगिक नाट्य प्रयोगाच्या महिला दिग्दर्शिका म्हणून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदलेल्या अरुंधती यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. लेखनाचा व्यासंग जडलेला असल्याने अनेक वृत्तपत्रांमधून लिहिलेल्या लेखमालेवरून ‘आनंदकुळ’ हे पहिले, त्यानंतर ‘अभिनय संस्कार’ अशी त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आईचे कर्करोगाने निधन झाल्याने तिचे अर्धवट राहिलेलं ’झुंज माझी कॅन्सरशी’ हे पुस्तकही त्यांनीच पूर्ण केले, किंबहुना त्याच्या दोन आवृत्या निघाल्या आहेत. आता चौथे पुस्तकही येऊ घातल्याचे अरुंधती सांगतात.राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या ‘वृद्धाश्रम कोअर कमिटी’च्या सदस्या असून ‘सेन्सॉर बोर्डा’च्या ज्युरी आहेत.
 
 
 
नुकतीच डॉ. अरुंधती यांची भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या ‘रिजनल अ‍ॅडव्हायझरी कमिटी’वर सदस्य म्हणून निवड झाली आहे. अशा या सर्वगुणसंपन्न हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै.‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
Powered By Sangraha 9.0