लटकेंना लटकवण्याचा डाव कुणाचा ?

12 Oct 2022 23:05:47
 

ओंकार देशमुख


मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके (अंधेरी पूर्व पोटनिवडणुक) यांच्या आकस्मिक निधनानंतर अंधेरी पूर्व येथे होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत रंगत वाढत आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार आणि रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून तर्क वितर्क लढविले जात असून त्यांच्या उमेदवारीच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या ऋतुजा लटके यांनी नोकरीचा राजीनामा दिला असून तो मंजूर होण्याची प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण होईल, अशी स्पष्टोक्ती मुंबई महापालिका प्रशासनाने केली आहे.
 
 
त्यामुळे लटकेंना पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळणार का ? की त्यांना बाजूला सारून तिसऱ्याच उमेदवाराला मैदानात उतरवले जाणार या चर्चांना उधाण आले आहे. जर महापालिकेकडून लटकेंचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तर त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कायदेशीर बाबींचा अभ्यास न करता लटकेंना उमेदवारी जाहीर करून त्यांना लटकवण्याचा डाव कुणी रचला ? हा सवाल विचारला जात आहे.
 
 
उमेदवारीबाबत स्पष्टोक्ती का नाही ?
ऋतुजा लटके मुंबई महापालिकेत अंधेरी पूर्व भागात परिमंडळ ३ मध्ये कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदावर कार्यरत आहेत. जर त्यांना पदावरून स्वेच्छा निवृत्ती घ्यायची असेल तर एक महिन्याच्या आत प्रशासनाला याबाबत माहिती दिल्यानंतर राजीनामा देऊन त्यांना सेवामुक्त होता येईल. लटके यांनी ३ ऑक्टोबर रोजी राजीनामा दिल्यापासून एक महिन्यात तो मंजूर होईल असे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. मुळात जर लटके यांना उमेदवारी द्यायची होती, तर त्याची पूर्वकल्पना त्यांना का दिली नाही ? तशी स्पष्टोक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी का केली नाही ? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. उमेदवारीबाबत नसलेली स्पष्टोक्ती आणि पक्ष नेतृत्वाकडून घेण्यात आलेली मोघम भूमिका यामुळे लटके देखील आपल्या उमेदवारीबाबत फारश्या गंभीर नव्हत्या असे बोलले जात आहे.
प्रकरण न्यायालयात तग धरू शकेल का ?
नोकरीच्या राजीनाम्यावरून सुरु झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऋतुजा लटके आणि ठाकरे गट न्यायालयात गेला आहे. आपण नोकरीचा राजीनामा दिला असल्या कारणाने निवडणुकीला उमेदवारी मिळण्यात अडचण येऊ नये, अशी भूमिका ठाकरे गट आणि ऋतुजा लटके यांच्याकडून घेण्यात आली आहे. मात्र, पालिकेकडून कायदेशीर दाखले आणि नियमांचे कारण पुढे करून राजीनामा स्विकारण्याच्या प्रक्रियेला एक महिन्याचा कालावधी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पालिकेच्या या मुद्द्याला आव्हान देत ठाकरे गट आणि लटकेंकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेचे नियम आणि कार्यकक्षा लक्षात घेता न्यायालय महापालिकेला राजीनामा स्वीकारण्याचे आदेश देऊ शकेल का ? आणि त्या आधारे हे प्रकरण न्यायालयात तग धरू शकेल का ? हा मुद्दा आज होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होणार आहे.
ठाकरे गटातील अंतर्गत स्पर्धा की सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न ?
ऋतुजा लटकेंच्या उमेदवारीबाबत उपस्थित झालेल्या हरकतींमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लटकेंची उमेदवारी कायदेशीर कचाट्यात अडकू शकते याची कल्पना ठाकरे गटातील कायदे तज्ञांना नव्हती का ? ठाकरे गटाचे काही आमदार स्वतः वकील असूनही त्यांच्याकडून ही चूक झालीच कशी ? लटकेंना पुढे करून कायदेशीर बाबींचा मुद्दा काढून ऐनवेळी दुसऱ्याच उमेदवाराला उमेदवारी देण्याचे तर हे प्रयत्न नव्हते ना ? ठाकरे गटातील अंतर्गत स्पर्धा तर लटकेंच्या फजितीला कारणीभूत ठरली नाही ना ? हा असे सवाल विचारले जात आहेत. तर दुसरी शक्यता म्हणजे लटकेंचे नाव पुढे करून रमेश लटकेंच्या निधनामुळे सहानुभूती आपल्याकडे वळवण्याचा तर ठाकरेंचा प्रयत्न नव्हता ना ? असा सवाल दुसऱ्या बाजूने विचारला जात आहे. त्यामुळे शक्यता आणि अशक्यतांच्या या धुमश्चक्रीत अडकलेली ऋतुजा लटकेंची उमेदवारी ठाकरे गटाच्या गळ्यातील फास बनत चालली आहे, हे मात्र निश्चित..
शिवबंधन वारंवार सैल का होतेय ?
ऋतुजा लटकेंच्या शिंदे गटातील कथित प्रवेशाच्या बातम्या माध्यमांमध्ये सातत्याने झळकलेल्या आहेत. ऋतुजा लटके यांनी मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची वर्षा'वर जाऊन भेट घेतल्याचे देखील बोलले जात आहे. उमेदवारीवरून निर्माण झालेले संशयाचे वातावरण, ठाकरे गटाची बेसावध अन भोंगळ भूम आणि लटके - शिंदे कथित भेटीमुळे ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा शिंदे गटाच्या गळाला लागू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करताना त्यांच्या अविश्वासू आणि बेभरवशीपणाचे दाखले देत टीका केली होती. तशीच काहीशी स्थिती ऋतुजा लटकेंच्या बाबत घडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मनगटावरील शिवबंधन वारंवार सैल का होत आहे ? याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
ही तर लटकेंसोबतची बनवाबनवीच !
'ऋतुजा लटकेंच्या जागी दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत का ? पर्यायी चेहरा पुढे आणण्यासाठीच तर लटकेंसोबत बनवाबनवी सुरु नाही ना ? असे अनेक प्रश्न ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे उपस्थित झाले आहेत. लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी जे राजीनामा पत्र महापालिका आयुक्तांना दिलेले आहेत, ते नियमाला अनुसरून नाही. त्यामुळे लटकेंच्या उमेदवारीबाबत सुरु असलेल्या प्रकारांमधून इतरांच्या नावावर खापर फोडणे आणि प्रशासनावर दोषारोप करणे सुरु आहे. ठाकरेंना स्व. रमेश लटके यांच्या पत्नीला खरोखरच उमेदवारी द्यायची होती का ? की नियमांचे कारण पुढे करत त्यांना अडकवून ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत यावर स्पष्टीकरण येणे आवश्यक आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वच्या उमेदवारीतून लटकेंसोबत बनवाबनवी सुरु आहे, हे स्पष्ट झाले आहे.
- प्रभाकर शिंदे, माजी गटनेते,भाजप, मुंबई महापालिका



Powered By Sangraha 9.0