उज्जैन: महाकालनगरी उज्जैनमध्ये शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ‘महाकाल कॉरिडोर’चे मंगळवार, दि. 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर महाकाल मंदिर पूर्वीपेक्षा अधिक भव्य-दिव्य दिसत आहे. ‘महाकाल कॉरिडोर’ सुरू झाल्यानंतर इथे भाविकांची संख्या अनेक पटींनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उज्जैनमधील ‘महाकाल कॉरिडोर’ 20 हेक्टरमध्ये पसरलेला आहे. वाराणसीतील ‘श्री काशिविश्वनाथ कॉरिडॉर’पेक्षा ‘महाकाल कॉरिडोर’ चारपट मोठा आहे. ‘महाकाल कॉरिडोर’ पौराणिक सरोवर रुद्रसागरच्या काठाशी विकसित करण्यात आला आहे. शिव, शक्ती आणि इतर धार्मिक आख्यायिकांशी संबंधित जवळपास 200 मूर्ती आणि ‘म्युरल्स’ (भित्तिचित्रे) यांच्या माध्यमातून ‘महाकाल कॉरिडोर’ सजवण्यात आला आहे. भगवान शंकराशी संबंधित अनेक अपरिचित कथादेखील या माध्यमातून भाविकांना जाणून घेता येणार आहेत.
कारण, इथे एकूण 92 मूर्ती उभारण्यात आल्या असून प्रत्येक मूर्तीत ‘क्यूआर कोड’ असून तो ‘स्कॅन’ करताच मूर्तीचा इतिहास-भूगोल समजणार आहे. सप्तर्षी, नवग्रह मंडळ, त्रिपुरासुर वध, कमल तालमध्ये विराजित शिव, 108 स्तंभांवर महादेवाच्या आनंद तांडवाचे अंकन, शिवस्तंभ, भव्य प्रवेश द्वारावर विराजित नंदीची विशाल प्रतिमा या ‘कॉरिडॉर’मध्ये असणार आहे. येथे देशातले पहिले ‘नाईट गार्डन’ही उभारण्यात आले आहे.
793 कोटी रुपयांच्या ‘महाकाल कॉरिडॉर’च्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. यात ‘महाकाल पथ’, ’महाकाल वाटिका’, ’रुद्रसागर तलावाच्या किनार्याचा विकास यांचा समावेश आहे. कॉरिडोरमुळे दोन प्रकारे या परिसराचे रूपडे पालटणार आहे. पहिले-दर्शन सोपे होईल. दुसरे-दर्शनासोबतच लोक धार्मिक पर्यटनही करू शकतील. कॅम्पसमध्ये फिरण्याच्या, मुक्कामाच्या, आराम करण्याच्या तमाम सुविधा असतील.