हिंदू देवतांचा अपमान करणार्‍या ‘आप’च्या मंत्र्याचा राजीनामा!

11 Oct 2022 10:38:29
 
aap
 
 
 
आम आदमी पक्षाचा एक मंत्री जाहीर कार्यक्रमात हिंदू देवदेवतांची नालस्ती करतो, यावरून एकाच वादळ उठले. दिल्ली भाजपच्या एका शिष्टमंडळाने नवी दिल्ली पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन हिंदूंच्या देवदेवता आणि श्रद्धांचा अवमान केल्याबद्दल आणि हिंदू आणि बौद्ध समाजामध्ये वैरभाव निर्माण केल्याबद्दल गौतम यांच्याविरूद्ध तक्रार केली. या घटनेवरून उठलेल्या वादळामुळे गौतम हे केजरीवाल मंत्रिमंडळातून बाहेर पडले.
 
 
नवी दिल्लीतील झंडेवाला भागातील आंबेडकर भवनात आयोजित करण्यात आलेल्या अशोक विजयादशमी समारंभात अनेक हिंदू देवदेवतांचा अपमान करणार्‍या आणि तशा आशयाची शपथ घेणार्‍या राजेंद्र पाल गौतम या आम आदमी पक्षाच्या मंत्र्याने अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या कार्यक्रमात काही लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याचे वृत्त आहे.
 
 
या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ ‘व्हायरल’झाला असून त्यामध्ये एक बौद्ध भिक्षू उपस्थित समुदायास एक शपथ देताना दिसत आहे. “माझा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यावर विश्वास नाही आणि देवता म्हणून मी त्यांची उपासना करणार नाही. राम आणि कृष्ण यावर माझा विश्वास नाही आणि त्यांची मी उपासना करणार नाही. तसेच, गौरी, गणपती आणि अन्य हिंदू देवतांवर माझा मुळीच विश्वास नाही आणि त्यांची उपासना मी करणार नाही”, अशी शपथ त्या ठिकाणी उपस्थित असलेल्यांना देण्यात आली. त्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या राजेंद्र पाल गौतम यांनीही ती शपथ घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला. हिंदू देवदेवतांची नालस्ती करून गौतम यांनी धर्म परिवर्तन केले.
 
 
आम आदमी पक्षाचा एक मंत्री जाहीर कार्यक्रमात हिंदू देवदेवतांची नालस्ती करतो, यावरून एकाच वादळ उठले. दिल्ली भाजपच्या एका शिष्टमंडळाने नवी दिल्ली पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन हिंदूंच्या देवदेवता आणि श्रद्धांचा अवमान केल्याबद्दल आणि हिंदू आणि बौद्ध समाजामध्ये वैरभाव निर्माण केल्याबद्दल गौतम यांच्याविरूद्ध तक्रार केली.
 
 
या घटनेवरून उठलेल्या वादळामुळे गौतम हे केजरीवाल मंत्रिमंडळातून बाहेर पडले. मी त्या कार्यक्रमात ‘आप’चा सदस्य किंवा मंत्री म्हणून सहभागी झालो नव्हतो. व्यक्तिगत रूपात मी त्या कार्यक्रमास उपस्थित होतो, असा खुलासा गौतम यांनी केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 22 शपथा देशभर घेतल्या जातात. पण हा मुद्दा उपस्थित करून भाजप घाणेरडे राजकारण खेळात आहे, असे गौतम यांनी म्हटले आहे. माझ्यामुळे आम आदमी पक्ष किंवा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडचणीत येऊ नयेत, असेही आपच्या या नेत्याने म्हटले आहे.
 
 
मात्र, भाजपला हे म्हणणे मान्य नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच राजेंद्र पाल गौतम यांनी ती कृती केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या वक्तव्याबद्दल गौतम यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपने एका पत्रकार परिषदेत केली होती. भारतीय जनता पक्षाकडून टीका होताच गौतम यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
 
 
दरम्यान, गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदू समाजाची मते आपणास मिळणार नाहीत, या भीतीपोटी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला, असे दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटले आहे. असे असले तरी यानिमित्ताने त्यांची हिंदूविरोधी मानसिकता उघड झाली, असेही गुप्ता यांनी म्हटले आहे. गौतम यांचा राजीनामा हा हिंदूंचा आणि भाजपचा विजय असल्याचे गुप्ता म्हणाले.
 
 
डॉ. आंबेडकर यांनी जी घटना दिली, ती सर्व धर्मांमध्ये सद्भाव जपण्यासाठी दिली असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. लोकांनी कोणाच्याही श्रद्धांना धक्का लागेल किंवा त्यांचा अवमान होईल, असे वागू नये. हिंदू हे आपल्या भावासारखे आहेत, असेही आठवले यांनी म्हटले आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात आम आदमी पक्षाच्या मंत्र्याने सामील होऊन हिंदू देवदेवतांचा अपमान करणारी शपथ घ्यावी, हे म्हणजे अतीच झाले. त्या घटनेचे जे तीव्र पडसाद उमटले ते लक्षात घेऊन आणि भावी काळात त्याची जबर किंमत मोजावी लागेल, याचा अंदाज आल्याने अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील त्या मंत्र्यास अखेर राजीनामा द्यावा लागला!
 
 
धर्मांतरासाठी जर्मन चर्चचा पैसा!
 
 
जर्मनीमधील एका चर्चने आसाममध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी निधी पुरविल्याची घटना उघडकीस आली आहे. आसाममधील डायसेस ऑफ तेजपूरने जर्मनीमधील रेव्हरंड फरार यांना जे आभार प्रदर्शन करणारे पत्र पाठविले, त्यावरून हा प्रकार उघडकीस आला आहे. आसाममधील वनवासी भागात आणि चहा मळ्यांच्या भागात ख्रिस्ती मिशनरी मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात; तसेच ईशान्य भारतातही धर्मांतराचे काम त्यांच्याकडून सुरू असते, हे काही नवीन राहिलेले नाही. धर्मांतराच्या कार्यासाठी जर्मनीमधील चर्चकडून ‘डायसेस ऑफ तेजपूर’ला 7500 युरो म्हणजे सुमारे सहा लाख, 55 हजार रुपये इतका निधी देण्यात आला. हा सर्व पैसा दि. 18 जानेवारी, 2018 रोजी भारतात पाठविण्यात आला.
 
 
 
हा जो निधी पाठविण्यात आला त्याचा उपयोग धर्मांतरासाठी करण्यात येणार असल्याचा स्पष्ट उल्लेख त्या आभार प्रदर्शन पत्रात करण्यात आला आहे. कोरोनाचे निर्बंध असण्याच्या काळात शिक्षण, आरोग्यसेवा आणि अन्य सामाजिक सेवांच्या माध्यमांतून धर्मांतराचे कार्य सुरू असल्याचा उल्लेखही त्या पत्रात करण्यात आला आहे. धर्मांतरासाठी विदेशातून निधी पाठविण्याचा प्रकार म्हणजे मिशनर्‍यांचे धार्मिक आक्रमण असल्याचा आरोप ‘वर्ल्ड हिंदू फेडरेशन’ने केला आहे. धर्मांतराविरूद्ध शासनाने कडक कायदे करावेत; तसेच केंद्र सरकारनेही धर्मांतरासाठी अशा संस्थांना निधी कसा काय मिळतो, याची चौकशी करावी, अशी मागणीही फेडरेशनने केली आहे. पैशाच्या बळावर मिशनरी संस्था पूर्वांचलात धर्मांतराचे कार्य जोमाने करीत असल्याचे अशा उदाहरणांवरून लक्षात येते.
 
 
 
 
aap
 
 
 
टिपू एक्सप्रेस नव्हे, वाडियार एक्सप्रेस!
 
 
रेल्वे मंत्रालयाने बंगळुरूहून म्हैसूरपर्यंत धावणार्‍या प्रवासी रेल्वेगाडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचे आधीचे ‘टिपू एक्सप्रेस’ हे नाव बदलून आता त्या गाडीचे नाव ‘वाडियार एक्सप्रेस’ असे करण्यात आले आहे. टिपू सुलतान याने हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले असताना अजूनही अनेकांना टिपूचा आदर्श ठेवावासा वाटतो. टिपूचा आदर्श ठेवणारी मंडळी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागातही आहेत. या रेल्वेगाडीस म्हैसूरचे राजे वाडियार यांचे नाव देऊन भारतीय रेल्वेने टिपूचे नाव त्या गाडीवरून काढून टाकले आहे. म्हैसूरच्या राजघराण्याचे कर्नाटकला आधुनिक राज्य बनविण्यामध्ये मोठे योगदान आहे. तसेच, रेल्वेच्या विकासामध्येही या राजघराण्याचे योगदान मोठे आहे. ते लक्षात घेऊन रेल्वेने त्या प्रवासी गाडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या निर्णयाबद्दल रेल्वे खात्यास धन्यवाद दिले आहेत. टिपूसारख्या जुलुमी सुलतानाचे नाव पुसून टाकून रेल्वे खात्याने एक चांगले पाऊल उचलले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0