शिवसेनेने गेली कित्येक वर्षे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आपलं राजकीय बस्तान बसवण्यासाठी निधीची उभारणी केली, हे आज कुणीही नाकारू शकत नाही. विद्यमान स्थितीत ८० हजार कोटींची बँक डिपॉझिट्स, हजारो कोटींची मालमत्ता आणि ४५ हजार कोटींचे बजेट असलेली ही महापालिका गेल्या २५ वर्षांपासून ठाकरेंच्या हातात होती. याच माध्यमातून सेनेचं संघटनही उभं राहिलं. त्यामुळे यापूर्वी आरोप झाल्याप्रमाणे, हे सत्तास्थानच शिवसेनेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणावा लागेल. मात्र, याच सत्तास्थानाला मुळापासून उखडून टाकण्याचा चंग ठाकरे गटाचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपने बांधला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील अधिकार्यांनी टक्केवारीसाठी जनतेची कामे थांबवली तर ते खपवून घेणार नाही, असा सज्जड दमच दिला. अर्थात, मुंबईत होणारी कामे, त्यासाठी लागणारी मंजुरी, कामांची देयके काढण्यासाठी द्यावा लागणारा वरचा खर्च आणि यासगळ्या बाबींचे मुख्य केंद्र कोणते राहिलेले आहे, हे सबंध महाराष्ट्राला माहिती आहे.
आपल्या प्रतिस्पर्ध्याला नमवण्यासाठी कष्टसाध्य परिश्रम करणे, संघर्ष करणे आणि विजय मिळवणे हे योद्ध्याचे लक्षण मानले जाते. याच परिप्रेक्षात भाजपही मैदानात उतरला असून महाराष्ट्रातील भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली आहे. सातत्याने भाजपकडून ठाकरे गटाला एका मागोमाग एक धक्के दिले जात असल्याने मुंबई महापालिकेची येणारी निवडणूक चुरशीची ठरणार, हे निश्चित.
आधी शिवसेनेत पडलेली उभी फूट, मग राज्यात झालेले सत्तांतर, पक्षाचा अधिकृत दर्जा कुणाला मिळणार यावरून न्यायालयात सुरू झालेली लढाई यामुळे ठाकरे गट आज चहूबाजूने गोत्यात आला आहे. त्यातच फडणवीसांनी आता टक्केवारीवर थेट निशाणा साधून ठाकरेंच्या कमाईचे मुख्य साधनच बंद करण्याचा मनसुबा आखला असून, या माध्यमातून ठाकरे गटाला आणखी एक जोर का झटका मात्र तोही धीरे से देण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होणार का, याकडे मुंबईसह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
त्यांची भूमिका ‘होयबा’चीच!
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मागील काही वर्षांपासून पोरकेपण आलं होतं. सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अध्यक्षपद सांभाळू शकत नव्हत्या, तर जबाबदारीपासून दूर पळणार्या ५२ वर्षीय युवा राहुल गांधींना अध्यक्षपदाच्या घोडीवर बसवण्यासाठी काँग्रेसची मंडळी हातात मुंडावळ्या आणि बाशिंग घेऊन त्यांच्या मागे धावत होती. सरतेशेवटी अध्यक्ष पदासाठी उमेदवारांनी आज अर्ज भरले आणि आता त्यांच्यात लढत होऊन पक्षाला गांधी कुटुंबाच्या बाहेरचा अध्यक्ष मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
पण, काँग्रेस अध्यक्षपदी कर्नाटकचे मल्लिकार्जुन खर्गे हेच निवडले जातील, अशी शक्यता आहे. कारण, खर्गे यांच्या अर्जावर प्रस्तावक म्हणून ३० नेत्यांचा पाठिंबा असून बंडखोर ‘जी-२३’ गटातील जवळपास सर्वच नेत्यांनी त्यावर स्वाक्षर्या केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खर्गे हे गांधी कुटुंबाशी प्रामाणिक आहेत आणि त्यामुळेच त्यांची निवड होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
मूळातच पक्ष आणि संघटनेवर असलेलं एका कुटुंबाचं वर्चस्वआणि त्यातून स्थापित झालेली हुकूमशाही प्रवृत्ती याला कंटाळूनच पक्षात अंतर्गत निवडणूक घेण्याचे ठरले होते. मात्र, अध्यक्षपदासाठी उभ्या राहिलेल्या नेत्यांकडे पाहिलं तर ही निवडसुद्धा औपचारिकच राहणार हे स्पष्ट आहे. स्वतंत्र विचारसरणीच्या शशी थरूर यांना काँग्रेस पक्ष अध्यक्ष होऊ देणार नाही आणि झारखंडचे माजी मंत्री त्रिपाठी यांची उमेदवारी म्हणजे ‘हमारे खत में तुम्हारा सलाम’ अशी आहे.
कारण, त्यांचा राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करण्याइतका वकूबच नाही. मग राहिला राहिले खर्गे, जे गांधी कुटुंबाचे निस्सीम भक्त आहेत. ज्या प्रकारे सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाच्या महान त्यागाचे नाट्य करून मनमोहन सिंग यांना पदावर बसवून स्वतः कारभार हाकला, त्याच प्रमाणे राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीय खर्गे यांना अध्यक्षपदावर बसवून पक्ष ‘रिमोट कंट्रोल’ने चालवतील, हे नव्याने सांगायची गरज नाही.
मुळातच काँग्रेसला अशाच ‘होयबां’ची सवय आहे. मग ते मनमोहन सिंग असोत, पृथ्वीराज चव्हाण असोत किंवा गुजराल. त्यामुळे आताही खर्गे अध्यक्ष झाले तरी त्यांची भूमिका ‘होयबा’चीच राहणार हे, निश्चित!