बांगलादेशी घुसखोरी

01 Oct 2022 21:15:37

Bangladesh
 
जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने तिच्या संघटनेत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना भरती करण्यासाठी त्यांचे आधारकार्डही बेकायदेशीरपणे तयार करुन घेतले होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. आधारकार्ड बनवण्यासाठी तस्करांकडून बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. तसेच या बांगलादेशी घुसखोरांना गोवा आणि अन्य राज्यांमध्ये कामगार म्हणून पाठवण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. आधारकार्ड तयार करण्यासाठी ‘पीएफआय’कडून भारतीय मुसलमान कुटुंबांचा वापरही केला गेला.
 
 
“गोव्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांना अजिबात थारा मिळणार नाही,” असा इशारा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकताच दिला आणि त्यांनी गोव्यातील गुप्तहेर संघटना आणि पोलिसांना बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याच्या कामाला लावले आहे. काही दिवसांतच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही गोवा सरकारच्या वतीने सांगण्यात आले. पण, खरंच हे सगळे इतके सोपे आहे का? पण, किमान गोवा सरकारने ही घुसखोरांना शोधून त्यांना हद्दपार करण्याची मोहीम सुरू केली, याकरिता सर्वप्रथम सावंत सरकारचे अभिनंदनच करायला हवे. परंतु, बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या मूळ देशात म्हणजेच बांगलादेशमध्ये पोहोचण्याकरिता राज्य तसेच केंद्र सरकारलाही प्रचंड मेहनत घ्यावी लागेल, हे नक्की.
भारत-बांगलादेश सीमेपासून म्हणजे भारताच्या पूर्वेकडून देशाच्या पश्चिमेला असलेल्या गोव्यात हे घुसखोर पोहोचेपर्यंत पोलिसांना किंवा सुरक्षा यंत्रणांना याची माहिती न मिळणे, यावरून भारताची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे, ते लक्षात येते.
 
 
बांगलादेशी घुसखोरांना कह्यात घेऊन कोठडीत का डांबले जात नाही?
 
 
गोव्यात वार्का येथे गेली चार वर्षे कुटुंबीयांसह अनधिकृतपणे वास्तव्यास असलेला बांगलादेशी नागरिक मेहराज मुताहर याला दहशतवादविरोधी पथकाने कह्यात घेऊन पोलिसांना पुढील कारवाईसाठी सुपूर्द केले. मेहराज मुताहर हा वार्का येथे भंगार गोळा करण्याचे काम करतो. याविषयी पोलिसांनी गोव्यातील विदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाला कळवल्यावर त्यांनी मेहराज मुताहर याला घरातून बाहेर न पडण्याचे आदेश दिले आहेत. गोव्यातील दहशतवादविरोधी पथकाला गोपनीय माहिती गोळा करत असताना, वार्का येथे वास्तव्यास असलेल्या बांगालदेशी जोडप्याविषयी माहिती मिळाली.
 
 
पथकाने या जोडप्यावर पुढे काही दिवस देखरेख ठेवली. जोडप्याचे अन्वेषण केले असता, त्यांनी बांगलादेशी नागरिक असल्याची स्वीकृती दिली. मेहराज मुताहर 20 वर्षांपूर्वी भारतात आला आणि त्याने उत्तर प्रदेश, तसेच देहली येथे वास्तव्य केले आहे. तो वार्का येथे त्याची पत्नी आणि मुलासह राहातो. मेहराज मुताहर याला घरीच राहाण्याच्या बंधनाचा आदेश दर महिन्याला वाढवण्यात येणार आहे आणि मेहराज मुताहर हा जर बेपत्ता झाला, तर त्याच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात येणार आहे. पण, असे करण्यापेक्षा त्याला कह्यात घेऊन कोठडीत का डांबले जात नाही?
 
 
 
 Bangladesh
 
 
 
‘फास्ट ट्रॅक कोर्ट’द्वारे त्वरित निर्णय
 
 
गेली 20 वर्षे तो भारतात राहात असताना सुरक्षादलांना त्याचा थांगपत्ता लागला नाही, तर तो बेपत्ता म्हणजे पसार झाल्यावर तो पुन्हा त्वरित सापडणार आहे का? परराष्ट्र मंत्रालय बांगलादेश उच्चायुक्तांकडून मेहराज मुताहर याचा बांगलादेश येथील पत्ता आणि तेथील पोलीस ठाण्याचा पत्ता मिळवणार आहे. मेहराज मुताहर याच्याकडे पारपत्र आणि ‘व्हिसा’ नसल्याने त्याला आपत्कालीन प्रवास कागदपत्रे दिली जाणार आहेत. यानंतर मुताहर कुटुंबीयाला बांगलादेश येथे पाठवण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे सुपूर्द केले जाणार आहे.
 
 
ही सर्व प्रक्रिया अतिशय किचकट आणि लांबलचक आहे. याकरिता पोलिसांना खूप मेहनत करावी लागेल आणि हे सगळे कारवाई संपण्याच्या आधीच हा बंगलादेशी गायब झाला, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. म्हणून ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’द्वारे त्वरित निर्णय घेऊन एका आठवड्याच्या आत जर त्याला बांगलादेशमध्ये पाठवले तरच बांगलादेशी घुसखोरीला आळा घालता येईल.
 
 
रोहिंग्या, बांगलादेशी घुसखोर यांना भरती करण्यासाठी...
 
 
जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने तिच्या संघटनेत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांना भरती करण्यासाठी त्यांचे आधारकार्डही बेकायदेशीरपणे तयार करुन घेतले होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. आधारकार्ड बनवण्यासाठी तस्करांकडून बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली होती. तसेच या बांगलादेशी घुसखोरांना गोवा आणि अन्य राज्यांमध्ये कामगार म्हणून पाठवण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. आधारकार्ड तयार करण्यासाठी ‘पीएफआय’कडून भारतीय मुसलमान कुटुंबांचा वापरही केला गेला.
 
 
यासाठी या कुटुंबांना ‘पीएफआय’कडून विविध आमिषे दाखवण्यासह पैसेही देण्यात आले. त्यानंतर ही कुटुंबे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगत आहेत. ज्या व्यक्तीचे आधारकार्ड बनवण्यात येणार आहे, त्याविषयी भारतीय मुसलमान सांगत आहेत की, ‘ही व्यक्ती जेव्हा लहान होती, तेव्हा नातेवाईकांकडे तिला पाठवण्यात आले होते. त्यामुळे तिचे आधारकार्ड बनवू शकलो नाही. आता आमच्याकडे ती परत आल्याने आम्ही कार्ड बनवत आहोत.’
 
 
हे घुसखोर आता नेपाळ मार्गेसुद्धा भारतात घुसखारी करत असल्याचे उघडकीस आले आहे. भारत-नेपाळ सीमेवर अनेक ठिकाणी ते मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. सन 2018 नंतर नेपाळ सीमेवर 500 कोटी रुपये खर्च करून 500 नवीन मदरसे आणि मशिदीही बांधण्यात आल्या आहेत. यासाठी संयुक्त अरब अमिराती, कतार आणि तुर्की या देशांतून अर्थपुरवठा करण्यात आल्याचेही चौकशीअंती समोर आले आहे.
 
 
सीमावर्ती भागात काही काळ अशा घुसखोरांना ठेवून नंतर त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना देशाच्या इतर भागांमध्ये पाठवले जाते. आपल्या देशात अजूनसुद्धा पैशाच्या जोरावरती खोटे ‘डॉक्युमेंट्स’ बनवले कसे जातात, हे पुन्हा पुन्हा बांगलादेशी घुसखोरांविरोधात केलेल्या चौकशीमधून निष्पन्न झाले आहे. हे प्रकार रोखण्यासाठी सर्व जातीधर्माच्या भारतीयांमध्येच देशभक्ती रुजवण्याची प्रचंड गरज आहे, तरच अशा प्रकारच्या गैरकृत्यांना आळा बसू शकतो.
 
 
गोवा ‘नार्को टुरिझम’चा ‘हॉटस्पॉट’
 
 
अभिनेत्री आणि हरियाणामधल्या भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूमुळे गोव्यामधील अफू, गांजा, चरसचा गैरवापर पुढे आला. त्यानंतर किनारपट्टीवरील कार्लिस पब आणि रेस्टॉरंटवर बुलडोझर फिरवण्यात आला. स्कार्लेट कीलिंगपासून सोनाली फोगटपर्यंत अनेक बळी गेले. कालांतराने पुन्हा सामसूम होऊन जाते.गोव्यामधली गुन्हेगारी काही काळापुरता चर्चेचाविषय ठरतो आणि गोव्याची ओळख आता ‘नार्को टुरिझम हॉटस्पॉट’ म्हणून झाली आहे. या गैरव्यवहारांमध्ये याआधी नायजेरियन व रशियन गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होत्या व विदेशींनी गोव्यामध्ये आपले बस्तान मांडले आहे. आता त्यातच भर म्हणून बांगलादेशी घुसखोरी गोव्यामध्ये किती उघडपणे होते आहे, हे स्थानिक माध्यमांच्या बातम्यांमधून पुन्हा पुन्हा समोर येत आहे .
 
 
स्थानिक वृत्तपत्रांतील बातम्यांमधील दाव्यानुसार, मडगाव आणि वास्को रेल्वे स्थानकांवर दर दिवशी रेल्वेने मजुरांचे पूर्ण कुटुंबासह तांडेच्या तांडे उतरतात, ज्यामध्ये अनेक बांगलादेशींचाही समावेश असतो. पण, कोणाचेही त्यांच्याकडे लक्ष नाही. गोव्याच्या सीमेवरती बसेसमधून येणार्‍या संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याकरताही कुठलीही यंत्रणा कार्यरत नाही.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी गोव्यात नव्याने प्रवेश केलेल्या काही राजकीय पक्षांच्या सभांमध्ये गर्दी जमविण्याकरिता परराज्यातील लोकांना आणणारे कंत्राटदार सक्रिय होते, अशा बातम्याही मध्यंतरी समोर आल्या होत्या. बांधकाम क्षेत्रामध्ये परराज्यातील मजुरांपेक्षा बंगलादेशी कामगारच जास्त आहे, हे इथे प्रकर्षाने अधोरेखित केलेच पाहिजे.
 
 
 

Bangladesh 
 
 
 
बांगलादेशी विरुद्ध दहशतवादविरोधी विभाग मोहीम
 
 
गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या दोन महिन्यांपासून व्यापक पातळीवर आरंभली आहे. गोव्याच्या अंतर्गत भागांमध्ये जे छापे मारले गेले, त्यात पकडले गेलेले बांगलादेशी गेली 12 वर्षे गोव्यात वास्तव्य करून असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने आतापर्यंत 22 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. हे घुसखोर खोट्या आधारकार्डच्या साहाय्याने गोव्यात निरनिराळे व्यवसाय करून वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिलाल अन्वर आखोन हा बांगलादेशी नागरिक गेल्या 12 वर्षांपासून वाळपई परिसरात वास्तव्यास आहे. तो भंगार गोळा करण्याचे काम करतो. कह्यात घेतलेला अन्वर हसन हा दोन वर्षांतून एकदा बांगलादेशला भेट देतो. हसन चांद नियान याने चार वर्षांपूर्वी बांगलादेशला भेट दिली होती. स्थानिक देशद्रोहीचे साहाय्य आणि प्रशासनातील भ्रष्टाचार या गोष्टीच बांगलादेशींच्या कारवायांकरिता कारणीभूत ठरल्या आहेत.
 
 
या बांगलादेशी घुसखोरांजवळ भारतीय नागरिकांची ओळखपत्र असलेली आधारकार्डे आहेत, पॅनकार्ड आहेत आणि येथील मतदारयाद्यांमध्येही त्यांची नावे नोंदवलेली आहे. यांना असे राजरोसपणे भारतीय नागरिक बनविण्याचे कर्म केले कोणी? त्यांना आधारकार्ड कशी मिळाली? पॅनकार्ड कशी मिळाली? मतदार याद्यांमध्ये या लोकांचा समावेश कसा झाला? या प्रश्नांचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0