युवा लेखक प्रणव सखदेव (Pranav Sakhdev) यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक’ कादंबरीस साहित्य युवा अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. यानिमित्ताने त्याच्याशी झालेल्या गप्पांमध्ये त्याचे कल्याण येथे गेलेले बालपण, लेखनाचा प्रवास, अकादमी पुरस्कार, भविष्यातील लेखन क्षेत्र याविषयी त्यांच्याशी संवाद साधला.
प्रणव सखदेव ( Pranav Sakhdev ) मूळचे कल्याणकर आहेत. मात्र, आता कामानिमित्त ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांचा जन्म कल्याणमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण कॅप्टन ओक हायस्कूल येथे झाले. माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी मराठी या विषयात पदवी घेतली. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे प्रशिक्षणही घेतले. त्यानंतर त्यांनी काही बड्या दैनिकात काही काळ प्रशिक्षित पत्रकार म्हणून काम केले.
त्यांचे वडील ‘एमएसईबी’मध्ये नोकरी करीत होते. त्यांची आई गृहिणी आहे. दहावीला असताना त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन दिवाळी अंक काढला होता. तेव्हापासून त्यांच्या लेखनाचे बीज अंकुरले. त्यानंतर ते कविता करू लागले. कथा लिहू लागले. रुईया महाविद्यालयात त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांच्यातील सुप्त लेखकाला प्रोत्साहन दिले. सखदेव यांच्या घरी लेखनाची कुठलीही पार्श्वभूमी नाही. वाचनातही त्यांना सुरुवातीला फारसा रस नव्हता. आठवी-नववीला जाईपर्यंत त्यांचे फारसे वाचनही नव्हते. ते क्रिकेट खेळायचे. कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचे ते सभासदही झाले.
त्याठिकाणी त्यांना कोणती पुस्तके वाचायची? कशी वाचायची? याबद्दल मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयात गेल्यावर त्यांचे विश्व अधिकच विस्तारले. साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. जगात खूप काही वेगळे सुरू आहे, याची जाणीव झाली. सखदेव यांचा कल बहुतकरुन पुस्तक संपादन, भाषांतर याकडे असल्यामुळे पुढे ते या क्षेत्रातच रमले. घरातूनही त्यांना या क्षेत्रात जाण्यासाठी पाठिंबा मिळाला.
सखदेव ( Pranav Sakhdev ) यांनी सुरुवातीला ‘निळ्या दाताची दंतकथा’ हा कथासंग्रह लिहिला. ‘नाभीतून उगवलेल्या वृक्षांचे रहस्य’ हा कथासंग्रह, ‘काळे करडे स्ट्रोक’ आणि ‘९६ मेट्रो मॉल’ या दोन कादंबर्या आणि नुकताच ‘दी मित्री रियाझ केळकर’ची गोष्ट हा नवा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. सखदेव नोकरीनिमित्त पुण्यात राहत असले तरी ते पूर्ण वेळ लेखनप्रपंच करणारे आहेत. लेखन आणि अनुवादासह ते पुस्तक प्रकाशन संस्थेत संपादनाचे काम करीत आहेत.
सखदेव यांच्या ‘काळे करडे स्ट्रोक’ या कादंबरीचा मुख्य नायक समीर कल्याणचा आहे. या कादंबरीत दुर्गाडी, कल्याण रेल्वे स्थानक परिसराचा उल्लेख आहे. कल्याणमध्ये मध्यंतरी ‘पूलगेम पार्लर’ होते. तसेच सहजानंद चौकासह डोंबिवलीचाही उल्लेख आहे. कुठलेही पात्र उभारले की, त्याला त्याच्या आजूबाजूचा अवकाश लागतो. आपण बघितलेल्या, अनुभवलेल्यातून ते कागदावर उमटत जाते. सखदेव गेली २२ वर्षे कल्याणमध्ये राहत होते. त्यामुळे पात्रे जीवंत होण्यासाठी कळत-नकळत ते आपल्या अनुभवातील कल्याण लिहीत जातात. कारण, हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे.
कल्याण-डोंबिवलीत इतरांप्रमाणे आगरी समाजाचीदेखील खूप संख्या असल्यामुळे तसेही एक पात्र त्यांच्या कादंबरीत डोकावताना दिसते. बहुतांश कथानक मुंबईचे आहे. २००० सालानंतर ज्या तरुणाईने उदारीकरणाची फळे चाखली, ते मोठे कसे झाले? त्यांचे प्रश्न आणि नातेसंबंध, मानसिकता, भावभावनांची आंदोलने या कादंबरीचा मुख्य गाभा असला तरी तीन पात्रे आहेत. त्यात प्रेमकथाही गुंफली आहे. “साहित्य युवा अकादमीचा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद झाला. या पुरस्काराने नव्याने लिहिणार्यांना प्रेरणा मिळते,” असे सखदेव सांगतात.
पुरस्कार हा एक व्यक्तीलाच मिळतो. पण इतरही लेखकांना यावेळी नामांकन मिळालेले आहे. त्यांची पुस्तकेसुद्धा वाचली गेली पाहिजेत. तरूण पिढीला या क्षेत्रात काम करायचे असेल, तर त्यांनी धैर्याने आणि धीराने सगळ्या गोष्टी हाताळल्या पाहिजेत. लिखाणाची एक बैठक तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त सराव करण्याची गरज आहे. या क्षेत्रात व्यावसायिकदृष्ट्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आर्थिक फायदा लगेचच मिळत नाही. नोकरी करूनही या क्षेत्रात काम करता येते. कथा, कादंबरी लेखन, भाषांतर, अनुवाद, संपादन, पटकथालेखन असे विविध प्रकार या क्षेत्रात हाताळता येतात. फक्त प्राधान्य कशाला द्यायचे, हे ठरवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
सखदेव यांना ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची ‘फेलोशिप’ मिळालेली आहे. साहित्य संघाचा कथाकार ‘शांताराम पुरस्कार’ आदी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. सखदेव यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कथा लिहायला आवडतात. रहस्य कथांमधून ते अनेकदा त्यांना जे सांगायचे आहे, जे सापडले आहे ते मांडायचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना रहस्यकथांमध्ये विविध प्रयोग करता येतात. तसेच भविष्यात वेबसीरिज, पटकथालेखन याला खूप व्यावसायिक स्वरूप प्राप्त होईल, असे सखदेव सांगतात. अशा या हरहुन्नरी लेखक, अनुवादकाला दै. ‘मुंबई तरूण भारत’ कडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.