‘स्विंगमास्टर’ मेघना सिंग

07 Jan 2022 20:02:42

Meghana Singh
 
 
भारतीय महिला क्रिकेटच्या विश्वचषक संघात बिजनोरच्या मेघना सिंगची निवड करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया मेघना सिंगची क्रिकेटमधील आतापर्यंतची कारकीर्द...
भारतीय पुरुष क्रिकेटप्रमाणे आता महिला क्रिकेटलादेखील देशात पसंती मिळू लागली आहे. विशेष म्हणजे फक्त शहरातूनच नव्हे, तर ग्रामीण भागातूनही अनेक महिला क्रिकेटपटू कर्तृत्व आणि जिद्दीच्या बळावर आपल्या गावाचे नाव उंचावत आहेत. अनेक भारतीय महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रासह काउंटी क्रिकेटमध्येदेखील स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहेत. अनेक जिल्ह्यांमधून येणाऱ्या नव्या युवा महिला क्रिकेटपटूंमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाची ‘बेंच स्ट्रेंथ’देखील वाढत आहे. नुकतीच ‘बीसीसीआय’ने न्यूझीलंड येथे होणाऱ्या ‘आयसीसी’ महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली. २०१७मधील ‘आयसीसी’ महिला विश्वचषक स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या या संघाकडून या स्पर्धेत उत्तम कामगिरीच्या अपेक्षा करण्यात येत आहेत. या संघामध्ये एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. तो चेहरा म्हणजे उत्तर प्रदेशमधील बिजनोरमधून आलेली मेघना सिंग. मेघना सिंगने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सप्टेंबर २०२१मध्ये पदार्पण केले. मात्र, आपल्या स्विंग गोलंदाजीने तिने अनेकांना प्रभावित केल्यानंतर विश्वचषक स्पर्धेत तिची वर्णी लागली आहे. जाणून घेऊया तिच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल...
मेघना सिंगचा जन्म दि. १८ जून, १९९४ रोजी उत्तर प्रदेशच्या बिजनोरमध्ये झाला. तिचे कुटुंब बिजनोरमधील कोतवाली देहात या ग्रामीण भागात राहात होते. तिचे वडील विजयवीर सिंग हे बरेली येथील द्वारिकेश साखर कारखान्यात सुरक्षा रक्षकाचे काम करतात, तर आई रीना सिंग या आशा कार्यकर्त्या आहेत. तर तिचे आजोबा निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. विजयवीर सिंग यांच्या पाच मुलांपैकी मेघना सर्वात मोठी मुलगी. तर तिला तीन बहिणी आणि एक भाऊ असून, हा परिवार एकत्र राहात होते. घरातील सर्वात मोठी मुलगी आणि सामान्य कुटुंबातून असल्यामुळे तिच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. मात्र, असे असूनही तिने क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द करायची हे लहानपणीच ठरवले होते. तिचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय राहिले. या संघर्षाच्या काळात तिच्या वडिलांनी नेहमीच तिच्या निर्णयांना पाठिंबा दिला. तिच्या जवळपास कोणीही मुलगी क्रिकेट खेळत नसल्याने मुलांबरोबर क्रिकेटचा सराव करूनच तिने आपले क्रिकेटमधील कौशल्य वाढवले. वयाच्या दहाव्या वर्षापासून तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. वयाच्या बाराव्या वर्षी ती पहाटे चारला उठून कसबा कोतवाली ते बिजनोरमधील नेहरू स्टेडीयम असा अंदाजे २५ किमीचा रस्ता पायी पार करायची. यावेळी सरावादरम्यान उत्तर प्रदेशसाठी अनेक रणजीपटू तयार केलेले प्रशिक्षक लक्ष्यराज त्यागी यांची तिच्या क्रीडा कौशल्यावर नजर पडली. यानंतर २००७मध्ये तिला अकादमीमध्ये मुलभूत प्रशिक्षण देऊन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून तयार केले गेले. एक उत्कृष्ट स्विंग गोलंदाज म्हणून तिची स्थानिक क्रिकेटमध्ये चर्चा सुरु झाली.
२००८मध्ये मेघनाने १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिने अनेक स्पर्धांमध्ये आपली अष्टपैलू चमक दाखवली आणि सर्वांचे लक्ष स्वतःकडे खेचले. २०१४मध्ये मेघनाची मुरादाबाद रेल्वेमध्ये बुकिंग क्लार्क म्हणून निवड झाली. तेव्हापासून तिने मुरादाबाद रेल्वे स्टेडियममध्ये आपल्या शैलीवर काम करत सराव सुरु ठेवला. यानंतर तिने गेले काही वर्ष रेल्वेकडून खेळताना रेल्वेची कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली आपली चमक दाखवली. एवढेच नव्हे, तर रेल्वेला राष्ट्रीय करंडक पटकावून देण्यात मेघनाच्या कामगिरीचादेखील वाटा होता. त्यानंतर तिला भारतीय महिला क्रिकेट ’अ’ संघात स्थान देण्यात आले. इथे स्विंगची जादू दाखवत मेघनाने अनेक बळी आपल्या नावावर केले. शिवाय फलंदाजीमध्येदेखील तिने चुणूक दाखवली. मेघनाने २०१९च्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेदका दमदार कामगिरी केली. तर, २०२०मध्ये दुबईतील ‘टी-२०’ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघात स्थान मिळवले. २०२१मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तिची निवड करण्यात आली. यावेळी तिने भारतीय महिला कसोटी आणि एकदिवसीय संघात पदार्पण केले. मात्र, तिच्या शैलीला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर तिची देशांतर्गत स्पर्धांमधील कामगिरी पाहता तिची निवड ‘आयसीसी’ महिला विश्वचषक स्पर्धेच्या संघात करण्यात आली आहे. मध्यमगती गोलंदाज म्हणून तिची भारतीय महिला संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर तिच्या स्विंग गोलंदाजीची जादू चालावी आणि आगामी काळात महिला क्रिकेटमध्ये तिने आणखी उंच भरारी घ्यावी यासाठी तिला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा...!
Powered By Sangraha 9.0