‘ओमिक्रॉन’नंतर आता फ्रान्समध्ये आढळलेल्या ’खकण’ या विषाणूने धाकधुक आणखी वाढविली आहे. नव्या विषाणूचे उगमस्थान कॅमरुन हा आफ्रिकन देश मानला जातो. याचाच एक अर्थ असा की, या देशातून दाखल होणार्या विमानसेवेवर निर्बंध लागतील आणि पुन्हा एकदा याच देशावर कोरोना प्रसाराचा ठपका ठेवला जाऊ शकतो. पण, या सगळ्यात ज्या ठिकाणाहून कोरोनाचा उगम झाला, त्या चीनमध्ये आता नेमकी काय परिस्थिती आहे?
ज्या वुहान प्रयोगशाळेतून कोरोनाचा उगम झाला, तिथे पुढे काय झाले? पण, विस्तारवादी मानसिकता असलेल्या चीनने जगापुढे काय वाढून ठेवले आहे, याबद्दल विचार करण्यास कुणीच तयार नाही. आजही चीन कोरोनाच्या लढाईत नामनिराळाच दिसतो. जागतिक आरोग्य संघटनेनेही चीनविरोधात कुठलीही ठोस अशी भूमिका घेतलेली नाही. चीन जाहीर करत असलेली कोरोना आकडेवारी आणि लसीकरणाबद्दलची माहिती किती विश्वासार्ह आहे, त्याबद्दलही साशंकता आहेच.
तेथील प्राथमिक परिस्थिती अशी की, मध्य चीनमध्ये ११.७ लाख लोकसंख्या असलेल्या युझोऊ या प्रांतातील नागरिकांना घरातच कोंडून ठेवण्यात आले. का तर त्या भागात तीन जण कोरोना संक्रमित आढळले. तसेच चीनमधील हेनान प्रांतामध्ये टॅक्सी प्रवासावर बंदी लादण्यात आली. शॉपिंग मॉल्स, पर्यटनस्थळांवरही आता असाच शुकशुकाट. चीनमधील गेल्या आठवड्यातील देशभरातील सरासरी रुग्णवाढ ही म्हणायला गेलो तर फक्त दोनशेच्या वर आहे.
तुलनेने भारताचा विचार केल्यास हा आठवड्याभरातील सरासरी आकडा २२ हजारांवर पोहोचला आहे. अमेरिका, युरोप आदी देशांतील रुग्णसंख्येचा आलेखही वाढताच आहे. कोरोना महामारीच्या या काळात जिथे जगभरातील आकडा हजार आणि लाखोंच्या घरात वाढताना दिसतो, तिथे चीनमधील घटत्या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा तरी कसा, असा प्रश्न ना जागतिक आरोग्य संघटनेला पडतो, ना अमेरिकेतील शास्त्रज्ञांना!
खरंच कोरोना आकडेवारी आटोक्यात ठेवण्याचे अस्त्र चीनला सापडले असेल किंवा त्यांनीच जर त्याचा शोध लावला असेल, तर मग जगालाही त्याची माहिती द्यायला हवी, अशी भूमिकाही जागतिक आरोग्य संघटना घेताना दिसत नाही. आता गेल्याच आठवड्यात एका अमेरिकन प्राध्यापकाला न्यायालयात दोषी ठरविण्यात आले होते. हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक चार्ल्स लायबर यांच्या चीनच्या ‘रन रिक्रूटमेंट प्रोग्राम’मध्ये असलेल्या सहभागाबद्दल अमेरिकेत प्रश्न उपस्थित झाले होते. हा उपक्रम जानेवारी २०२० पूर्वीच झाला होता.
अमेरिकेतील संशोधनात हस्तक्षेप करुन चीनला मदत करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. स्वतःच्या देशातील साधी कोरोना आकडेवारीही सुस्पष्ट न देणार्या चीनला इतर देशांत काय चालले आहे, याबद्दलची माहिती चोरी करुन का होईना, मात्र हवीच असते. त्यासाठी तेथील सरकार कायदेच लागू करतात. एक सरळ सोपे उदाहरण द्यायचे झाले, तर चीनमध्ये वापर होणार्या सोशल मीडियाबद्दल विचार करता येईल. तिथे ‘फेसबुक‘, ‘गुगल‘, ‘इन्स्टाग्राम‘, ‘व्हॉट्सअॅप‘ या पैकी कुठलाही पर्याय तुम्हाला वापरता येत नाही.
इतकेच काय तर तेथील इंटरनेट आणि इतर देश वापरत असलेले इंटरनेट यांचा एकमेकांशी संबंधही नाही. त्यामुळे इंटरनेटमुळे जग जोडले गेले, ही संज्ञा चिन्यांसाठी अपवादच ठरते. ते तेथील एका वेगळ्या ‘आभासी’ जगात आहेत, असे म्हटले तरीही वावगं ठरणार नाही. अशीच स्थिती त्यांनी कोरोनाच्या लढाईबद्दलही निश्चित केलेली दिसते. अमेरिकेत एका दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांवर पोहोचली.
भारतासह अन्य देशही ‘ओमिक्रॉन’च्या लाटेचा सामना करीत आहेत. मात्र, लसीकरण मोहीम वेगवान झाल्यानंतरही कोरोना आकडेवारी वाढत आहे. यालाही अपवाद फक्त चीनच. हे कसे काय? या प्रश्नांची उत्तरे तूर्त कुणाकडेच नाहीत. म्हणूनच चीनच्या ‘झिरो कोविड पॉलिसी’कडे काय म्हणून पाहावे, हादेखील प्रश्न आहेच.
म्हणजे एकीकडे केवळ तीन रुग्ण आढळले म्हणून संपूर्ण शहरात टाळेबंदी आणि कोरोनाचा उद्रेक जेव्हा वुहानमधून झाला, त्याचवेळी इतर देशांतील विमानसेवा रद्दही केली जात नाही, हा विरोधाभास चीन कसा स्पष्ट करणार आहे? कोरोनाची किती रुपं आणखी जन्म घेतील, याचे उत्तर कुणाकडे नाही. परंतु, सुरू झालेल्या या जैविक युद्धाचा ‘ओमिक्रॉन’च्या रुपाने दुसरा टप्पा मात्र सुरू झाला आहे.