वाघांचे अस्तित्व धोक्यात?

05 Jan 2022 12:16:24

bengal tiger
 
राजेशाही बंगाल वाघाची प्रजाती ही भारतीय उपखंडातील जंगलाचे खर्‍या अर्थाने वैभव. मात्र, २०२१ साली देशात झालेल्या वाघांच्या मृत्यूची संख्या पाहिली, तर या वैभवाला ग्रहण लागल्याचे दिसते. सरत्या वर्षाला निरोप देताना विदर्भात हाड आणि पंजे गायब असलेल्या वाघिणीचा मृतदेह सापडला होता. नव्या वर्षाच्या दुसर्‍याच दिवशी चंद्रपुरातील भद्रावतीमध्ये एका वाघिणीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तसेच चांद्यामध्ये ‘क्रूड बॉम्ब’ फुटल्याने एका वाघाच्या जबड्याला जबर दुखापत झाल्याची घटना घडली. ‘राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण’ २०१२ पासून देशातील वाघांच्या मृत्यूची आकडेवारी सार्वजनिकरित्या जाहीर करत आहे. तसेच वाघांची गणना करून त्याची नोंद ठेवत आहे. प्राधिकरणाने केलेल्या २०१८च्या गणनेनुसार भारतात २ हजार, ९६७ वाघ आढळले आहेत. भारतात २०१६ मध्ये १२१ वाघांचा मृत्यू झाला होता. यानंतर २०२१ मध्ये १२६ वाघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूचा हा आकडा सर्वाधिक आहे. यामध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक ४४ वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील आकडा ४३ आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये वाघांमुळे माणसांच्या मृत्यूच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक लेखी उत्तर दिले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत मानव-प्राणी संघर्षामुळे राज्यात ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. या ६५ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू वाघांच्या हल्ल्यात झाले आहेत. मागील वर्षी १ जानेवारी, ते ३० सप्टेंबर या कालावधीत ६१ लोकांचा मृत्यू झाला होता. ज्यामध्ये ३१ लोकांचा वाघांमुळे मृत्यू झाला होता. महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येचे वर्गीकरण असमान आहे. राज्यात संरक्षित क्षेत्राबाहेर वाघांचा अधिवास आहे. महत्त्वाचे म्हणजे हा अधिवास कायमस्वरुपी असून त्याठिकाणी व्याघ्रसंख्येमध्ये वाढ होतानादेखील दिसून येत आहे. चंद्रपूर शहर आणि त्याच्या आसपासचा परिसर याचे उत्तम उदाहरण आहे. याचठिकाणी सर्वाधिक मानव-व्याघ्र संघर्ष आहे. त्यामुळे प्रदेशानुरूप वाघांच्या झालेल्या वर्गीकरणानुसार उपाययोजनांची आवश्यकता आहे.
 
 
प्रदेशानुरूप उपाययोजना
महाराष्ट्रातील मानव-व्याघ्र संघर्षाच्या घटनांचे अवलोकन केल्यास त्यामध्ये प्रदेशानुरूप भिन्नता आढळते. मानव-व्याघ्र संघर्षाचे प्रकारही हे प्रदेशानुरूप वेगवेगळे आहेत. गडचिरोली किंवा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आसपासच्या क्षेत्रात वाघांमुळे होणारे मानवी मृत्यू हे संरक्षित क्षेत्रात अपप्रवेश केल्याने होतात. यामध्ये प्रामुख्याने मोह फुलांसाठी किंवा गुरांना चरवण्यासाठी संरक्षित क्षेत्रात गेलेल्या लोकांचा वाघांच्या हल्लात मृत्यू होता. चंद्रपूर शहर आणि आसपासच्या भागात होणारा संघर्ष हा हद्दीच्या लढाईमधील आहे. याठिकाणी वाघांचा विषबाधेमुळे, शिकारीसाठी किंवा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू होतो. २०१८च्या ’राष्ट्रीय व्याघ्र गणने’नुसार या जिल्ह्यात १६० वाघांचा अधिवास आहेत. त्यापैकी ८० वाघांचा अधिवास हा संरक्षित वनक्षेत्राबाहेर आहे. चंद्रपूर शहरानजीक या वाघांचा वावर अधूनमधून निदर्शनास येत असतो. जिल्ह्यात प्रजननक्षम असलेल्या ६३ वाघिणी आहेत. साधारण दोन ते तीन वर्षांनंतर वाघीण बछड्यांना जन्म देते. याअनुषंगाने २०१८ नंतर जिल्ह्यात ७० वाघ वाढललेले असू शकतात. चंद्रपुरातील वाघांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवून त्यावरील उपाययोजनांसाठी जिल्ह्याची चार क्षेत्रांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या क्षेत्रामध्ये जिथे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र आहे आणि मानव-व्याघ्र परस्पर संबंधाची नकारात्मकता कमी आहे, अशा क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. दुसर्‍या क्षेत्रामध्ये वाघांच्या भ्रमणमार्गांच्या परिसराचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये ब्रह्मपुरी, मध्य चांदा या परिसराचा समावेश असून जिथे वाघांचा कायमस्वरुपी अधिवास होणार नाही आणि भ्रमणमार्ग सुरक्षित राहील, या दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगितले आहे. तिसर्‍या क्षेत्रामध्ये छोट्या तुकड्यातील वनक्षेत्रे, वन्यप्राण्यांमुळे पीकनुकसान होणार्‍या आणि विखुरलेल्या गावांसारख्या समावेश करण्यात आला आहे. ज्या ठिकाणीच्या वाघांना निर्णय घेऊन विदर्भातच किंवा राज्याबाहेर स्थानांतरित करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. चौथ्या क्षेत्रात चंद्रपूर शहराचा आसपासचा परिसर म्हणजेच ‘सीएसटीपीएस’ आणि ‘डब्ल्यूसीएल’ या कंपन्यांच्या परिसराचा समावेश करण्यात आला असून येथील वाघ स्थानांतरित करुन व्याघ्र अधिवासाला पूरक असलेला अधिवास नष्ट करण्याची शिफारस मांडण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0