जाहिरात क्षेत्राचा उभरता कलाकार

05 Jan 2022 13:39:43

MANSA 2.jpg


जाहिरातीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करत नवीन वाटा निर्माण करणार्‍या आर्य नागरे याच्या कार्याविषयी...


हो, आयुष्यात याचं नेमकं ध्येय काय आहे, ते शालेय जीवनात त्याला त्याचं आणि त्यामुळे आम्हालाही अजिबात स्पष्ट होत नव्हतं!” घराघरातील मुलांविषयीच्या या नेहमीच्या संवादाप्रमाणेच दीपाली आणि श्रीकांत नागरे आर्यविषयी सांगत होते. अतिशय स्पर्धात्मक, सतत आव्हानांच्या आणि बदलत्या युगातल्या नवनवीन माध्यमांतून व्यक्त व्हायला लावणार्‍या जाहिरात क्षेत्रात वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी आपले स्थान निर्माण करणार्‍या नाशिकच्या आर्य नागरेचा पुढचा प्रवास मात्र लक्षणीय वाटावा, असाच आहे.‘कमर्शियल आर्टिस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दीपाली व श्रीकांत नागरे यांचा आर्य हा भाचा. साधारण ३० वर्षांपूर्वी ’मिडास टच’ नावाने नाशिकमध्ये जाहिरात एजन्सी सुरू करणारे श्रीकांत व त्यांची पत्नी दीपाली दोघंही कला महाविद्यालयात शिक्षण घेतलेले. बालपणापासून या दोघांना कलाक्षेत्रात काम करताना पाहिले, तरी हे आपले क्षेत्र आहे की नाही, याबाबत आर्य मात्र साशंक होता. आपण वास्तुविशारद व्हावे, असेही त्याच्या मनात येऊन गेले.


इयत्ता नववीत असताना शाळेत होणार्‍या एका स्पर्धेतील विविध गटांसाठी ‘लोगो’ बनवून देण्याचे काम अचानक त्याच्याकडे आले आणि त्याच्या जीवनाला तो कलाटणी देणारा क्षण ठरला. सहज म्हणून त्याने बनवलेले ‘लोगो’ सगळ्यांच्या पसंतीस उतरले. इतकेच नव्हे, तर त्याचे सगळ्यांनी भरभरून कौतुकदेखील केले. कलेचा वारसा आणि अभिव्यक्तीचे बाळकडू घरातूनच मिळाल्याचे मग ठळक झाले. शाळेतील स्पर्धांमध्ये आर्यने काढलेले फोटो व्यावसायिक छायाचित्रकारांपेक्षा सरस ठरले. तेव्हा या मुलाकडे जात्याच एक वेगळी नजर आहे, हे जाणवले आणि सुरू झाला कलेच्या क्षेत्रातील आर्यचा प्रवास.२०१५च्या प्रजासत्ताक दिनाला केंद्र सरकारकडून आयोजित जाहिरात स्पर्धेत आर्यने रेखाटलेले चित्र निवडले गेले. तसेच ते देशभरातील सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रकाशितदेखील झाले. या चित्ररूपी जाहिरातीची प्रशंसा देशभरातून झाली आणि आर्यने घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.चित्रकलेच्या ‘एलिमेंटरी’-‘इंटमिजीएट’ या महत्त्वाच्या परीक्षा प्रथम श्रेणीत पार पाडत त्याने सुरुवात केली. पुढे मुंबईत व्यावसायिक शिक्षण पूर्ण करतानाच एकीकडे जाहिरात एजन्सीत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत त्याने शिक्षण पूर्ण केले. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर कोरोनामुळे आर्यला मुंबईतील संधी सोडत नाशिकला परत यावे लागले. अर्थात, तो थांबला नाही. ‘लॉकडाऊन’ दरम्यान घरात असलेल्या सामग्रीतून त्याने नवनवीन प्रयोग करून पाहिले आणि पुन्हा नव्याने संधी केवळ निर्माण केली नाही, तर तिचे सोने केले. नाशिकच्या एका नामांकित सराफी पेढीसाठी आर्यने केलेली जाहिरात हा कौतुकाचा विषय ठरला. आजी आणि नात या नात्याविषयी बोलले जात असते. आजोबा आणि नातीच्या हळूवार हळव्या संवादावर भर देणारी ही जाहिरात एकप्रकारे आर्यच्या प्रगल्भतेची साक्ष देऊन गेली.




कुठल्याही कलाकारासाठी आवश्यक असते, ती सूक्ष्म निरीक्षण क्षमता, तरलता आणि संवेदनशीलता. उपजतच असलेल्या या गुणांना जोड मिळाली ती कलेच्या शिक्षणाची, तंत्रज्ञानाच्या जाणिवेची. एकीकडे ’दाग अच्छे है’ सांगणारा एक प्रोजेक्ट साकारला जात होता आणि एकीकडे घरच्या एजन्सीत काम न करता ‘माझा प्रवास स्वतंत्र असणार’ हा आर्यने घेतलेला निर्णय होता. ही सुरुवात होती नव्या आव्हानांची. मुळातच सतत नावीन्याची मागणी करणारे क्षेत्र, कमी वेळात संपूर्ण आशय मांडणी, व्यवसायाच्या काटेकोर डेडलाईन्स, ‘लॉकडाऊन’, आवश्यक साधनांची - तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता अशा अनेक पातळ्यांवर प्रयत्न करावे लागत होते. लहान वयामुळे एक वेगळीच अडचणही सुरुवातीला येऊ लागली. त्याच्याकडे येणारे बहुतेक मदतनीस वयाने मोठे त्यामुळे हा तरूण मुलगा काय करू शकेल, अशी साशंकता मनात बाळगून असणारे. परंतु, अल्पावधीतच आर्यच्या जाहिरात क्षेत्रातील समज त्यांना जाणवली व तो अडथळा पार पडला.व्यवसायाप्रति असणारी निष्ठा, यश मिळवण्यासाठी आवश्यक जिद्द आणि आपण ज्यांच्यासाठी म्हणून काम करत आहोत, त्यांच्या मागणीप्रमाणे योग्य ते प्रयत्न करण्यासाठी लागणारी मेहनतीची तयारी या गुणसूत्रीवर आधारित टीम नाशिकमध्ये तयार झाली व जाहिराती, ‘लोगो’ डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, फोटोग्राफी अशा अनेक पातळ्यांवर मुशाफिरी सुरू झाली.



 
जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींकडून आपल्या मुलाच्या कल्पनांचे कौतुक होत आहे, अल्पावधीतच यशाची नवनवी शिखरे तो गाठतो आहे, वेबसीरिजसारख्या नव्या माध्यमातून सहदिग्दर्शक म्हणून पाऊल टाकतो आहे. जाहिरात क्षेत्र म्हटलं की मुंबई व पुण्याचं नाव असं मनात येत असताना दिल्ली, बंगळुरू, इंदौर आणि भारतातील अनेक शहरांमधील कंपन्यांना नाशिककडे वळवण्यात आर्य यशस्वी होत आहे, याचा सगळ्यांना अभिमान आहे. प्रत्येकच मुलाचा प्रवास हा ठरलेल्या मार्गाने, ‘करिअर’च्या ठरलेल्या चौकटीतून साचेबद्ध होईल, असे नाही. कित्येकदा ती चौकट मोडणारे तरुण नव्या आकाशाला यशस्वीपणे गवसणी घालतात आणि येणार्‍या पिढीतील नव्या मुलांसाठी आणि उदाहरण ठरतात, हेच आर्यने सोदाहरण स्पष्ट केले आहे.







Powered By Sangraha 9.0